“ये ये सुमित!”, नकाशातून वर बघत आबा म्हणाले.
“कुठे आहात आबा?”, आबांच्या मागे उभे राहून, सुमितने नकाशात पाहत विचारले.
“तुझे आबा असुरांच्या देशात पोचले आहेत! बघ बघ, त्यांच्या डोक्यावर दोन शिंगं पण दिसतील आता!”, दुर्गाबाई आबांना चिडवत म्हणाल्या.
“छे! छे! असुर म्हणजे डोक्यावर शिंग असलेला राक्षस हा कल्पनेचा खेळ आहे! दुर्गाबाई, तरी मी सांगत होतो, नातवंडांबरोबर इतकी cartoons पाहू नका! हे असं होतं त्याने!
“प्राचीन काळी, दक्ष राजाला १३ मुली होत्या. या १३ जणींचे लग्न त्याने कश्यप ऋषींशी लावले. त्यापैकी अदितीची मुले आदित्य म्हणून प्रसिद्धीस आली. दिती, दानू व दनायु यांची मुले दैत्य, दानव व असुर म्हणून प्रसिद्धीस आली. काही नाग, काही गंधर्व म्हणून प्रसिद्धीस आली. आदित्यांमध्ये पुढे – रघु, यदु, कुरु आदि कुळे प्रसिद्धीस आली. सर्व कुळात चांगली - वाईट माणसे होती.”, आबा म्हणाले.
“आबा, दैत्यकुलातील हिरण्यकश्यपू, प्रल्हाद इत्यादी मंडळीच्या मुलतान भागातील नरसिंह मंदिर पहिले, यदुकुलातील सांबचे आदित्य मंदिर पहिले, आणि रघुकुल स्थापित गंधार नगरी पहिल्या.”, सुमित म्हणाला.
“Right! आता आपण गंधारच्या पलीकडे पर्शिया मध्ये जाऊ. या प्रदेशात असुर मंडळींना देवत्व प्राप्त झाले.
“असुर म्हणजे वाईट ही कल्पना नंतर आली. त्या आधी, असुर ही एक प्रकारे पदवी होती. वेदांनी किती वेळा वरुण, इंद्र, महादेव यांना ‘असुर’ असे मानाने संबोधिले आहे.
“पर्शियाची भाषा अवेस्तान. या भाषेची मजा पहा. हे लोक ‘सिंधू’ ला ‘हिंदू’ म्हणत. आपल्याला ‘हिंदू’ हे नाव याच लोकांनी दिले. ‘असुर’ ला ‘अहुर’ म्हणत. ‘अहुर माझदा’ हा त्यांचा सर्वेसर्वा देव. बरेच जण ‘अहुर माझदा’ चे ‘असुर महादेव’ असे संस्कृत translation करतात.
“पर्शिया मध्ये अहुर माझदा बरोबरच – अग्नी, मित्र, वरुण, वायू इत्यादी वैदिक देवांची पूजा करत. यज्ञा सारख्या पूजाविधीला ‘यस्न’ म्हणत. यांच्या प्रार्थनेला ‘गाथा’ म्हणत. आणि स्वतःला ‘ऐर्यन’ म्हणजे ‘आर्य’! अवेस्तान भाषेतील कैक प्रार्थना तशाच्या तशा संस्कृत मध्ये वाचता येतात!
“अलीकडच्या काळात, मोहम्मद रेझा शहाने, इथले रहिवासी ‘आर्य’ म्हणून पर्शियाचे नामकरण ‘इराण’ असे केले.”, आबा म्हणाले.
“आबा, म्हणजे इराणी लोक ही वेदिक लोकांचीच एक शाखा, नाही का?”, सुमित म्हणाला.
“हो तर! पर्शियाच्या पलीकडचा भाग Mesopotomia हा Assyria / Asorestan / Ashuristan म्हणून ओळखला जात असे. ही नावे ‘असुरांचे स्थान’ वरून आली आहेत. हा भाग आता इराक़ आणि Syria म्हणून ओळखला जातो. इथे देखील मित्र पूजा प्रचलित होती. हे लोक सूर्याला ‘शमश’ असेही म्हणत.”, आबा म्हणाले.
३ एकरवर पसरलेले प्राचीन सूर्य मंदिर, हत्र, इराक. आता ISIS च्या ताब्यात. PC: www.britannica.com
“आबा, या असुर प्रदेशातील सुर्योपासकांचे काय झाले?”, सुमितने विचारले.
“काय झाले सुमित, ७ व्या शतकानंतर ३०० वर्षात, अरबी आक्रमणात Syria पासून सिंध पर्यंत, सर्व जुने धर्म लयास गेले. काही पारसी गट भारतात आश्रयाला आले. तर काही लहान गट आपला धर्म टिकवून तिथेच राहिले. यात एक सूर्योपासक गट आहे यझीदी.
“यझीदी लोक सूर्योदयाला, माध्यानाला आणि सूर्यास्ताला, सूर्याकडे तोंड करून प्रार्थना करतात. त्यांच्या ध्वजावर सुद्धा सूर्याचे चिन्ह आहे. इराक, Syria भागात राहणाऱ्या यझीदिंनी अनेक शतके मोठमोठ्या संकटांना तोंड दिले आहे. सध्या त्यांच्या समोरचे संकट आहे - ISIS.”, आबा म्हणाले.
“याझिदिं प्रमाणेच कुर्दिश लोकांच्या ध्वजावर सुद्धा सूर्य आहे.
“काही इराणी लोक देखील पारसी जीवन पद्धती पुनर्जीवित करत आहेत. सूर्याशी निगडीत सण साजरे करत आहेत, जसे – वर्षाचा पहिला दिवस - ‘नवरोज’ म्हणजे वसंत संपात दिवस आणि ‘शब ए याल्डा’ म्हणजे उत्तरायणाचा उत्सव.”, हे सांगतांना आबांची नकाशावर फिरणारी पेन्सील खिशात गेली.
“I see! म्हणजे हे यझीदी, कुर्दिश, Assyarian आणि काही इराणी लोक त्यांच्या प्राचीन चालीरीतींना धरून आहेत. शेकडो वर्ष अत्यंत प्रतिकूल परीस्थितित आपला धर्म जिवंत ठेवायचे कठोर व्रत घेतलेले हे लोक खरोखर धन्य आहेत!”, सुमित म्हणाला.
“सुमित, अंधारात विझून न जाण्याचे तेज या समाजाला सूर्य उपसानेनेच दिले आहे!”
-दिपाली पाटवदकर