चुराई लो खटीया, राहूल आयो

    08-Sep-2016   
Total Views |

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची मला कधीकधी कींव येते. एखादया अभ्यासात मंद असलेल्या मुलाने केवळ त्याच्या आईच्या हट्टापायी पैसे भरून इंजीनियरिंग कॉलेजला प्रवेश घ्यावा आणि मग अभ्यास जमत नाही म्हणून वर्षानुवर्षे गचके खात तिथेच पडून राहावं अशी काहीशी राहूल ह्यांची केविलवाणी परिस्थिती आहे.

मुळात त्यांच्या हाताला यश नाही. ते जिथे जिथे काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळवून द्यायला म्हणून जातात तिथे तिथे त्यांचा पक्ष हमखास झोपतो. तरीही काँग्रेसचे लोक त्यांच्याकडे पक्षाचा भावी तारणहार म्हणून आशेने बघतात. सध्या त्यांच्या शिरावर उत्तरप्रदेश मध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सपशेल हरलेल्या काँग्रेस पक्षाला राज्यातल्या निवडणुकीसाठी सज्ज ठेवायची जबाबदारी आहे. एकूणच राहूल गांधी ह्यांच्या योग्यतेचा पूर्वपरिचय असल्यामुळे लाखो रुपये खर्च करून काँग्रेस पक्षाने त्यांची पूर्ण प्रसार मोहीम आखण्याचे काम बहुचर्चित राजकीय प्रसारतज्ञ प्रशांत किशोर ह्यांच्या हाती सोपवले आहे.

प्रशांत किशोर ह्यांनी ह्यापूर्वी नरेंद्र मोदींसाठी काम केले होते. नंतर त्यांनी वैचारिक यू-टर्न घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी नितीश कुमार ह्यांची प्रसार मोहीम आखली. बिहारमध्ये नितीश-लालू ह्या जोडगोळीला कल्पनातीत यश मिळाले. त्यामुळे प्रशांत किशोर ह्या नावाचा दबदबा सर्वत्र पसरला. सध्या हे किशोरबाबू काँग्रेस पक्षाची उत्तरप्रदेशातली रणनीती आखत आहेत. त्यांच्याच सूचनांचा भाग म्हणून दिल्लीतल्या पराभवानंतर वानप्रस्थात गेलेल्या शीला दीक्षित ह्यांना उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे.

काँग्रेसच्या प्रचारमोहिमेचा एक भाग म्हणून प्रशांत किशोर ह्यांनी राहूल गांधीची देवरिया ते दिल्ली अशी नुकतीच एक किसान यात्रा काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या 'चाय पे चर्चा' ह्या बहुचर्चित प्रसार मोहिमेची खिल्ली उडवण्याच्या हेतूने किशोर ह्यांच्या सल्ल्यावरून राहूल गांधीनी देवरिया जवळ रुद्रपूर येथे 'खाट चौपाल' हा कार्यक्रम आयोजित केला होता. उत्तरप्रदेश मधल्या पंचायत सभेचं स्वरूप देण्यासाठी म्हणून सभेच्या ठिकाणी जवळजवळ २००० दोरीच्या खाटा पक्षाने आणून मांडल्या होत्या.

राहूल गांधी सभेत काय बोलले ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. त्यांचं भाषण चालू असतानाच सभेला आलेले लोक त्या दोरीच्या खाटांवर डोळा ठेऊन होते. कार्यक्रम संपतो न संपतो तोच ह्या खाटा घरी घेऊन जाण्यासाठी हिसका-हिसकी सुरु झाली. पैसे देऊन जमवलेली भाडोत्री गर्दी जाताना फुकट मिळालेल्या खाटा घेऊनच घरी गेली. ज्यांना अख्खी खाट लाटता आली नाही ते लोक खाटांचे खुंट घेऊन गेले, कुणी दोर सोडून त्यांची भेंडोळी घरी नेली. ह्या सगळ्या प्रकाराचं चित्रण करायला सभास्थानी छायाचित्रकार जमलेलेच होते, त्यांनी ह्या सगळ्या खाट प्रकरणाचं व्यवस्थित चित्रण करून ती बातमी जगापर्यंत पोहोचवली.

उत्तरप्रदेशी हिंदीमध्ये 'खटीया खडी करना' नावाचा एक वाक्प्रचार आहे. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्या व्यक्तीची खाट उभी करून ठेवली जाते. त्यावरून हा वाक्प्रचार वापरात आला. एखाद्याची 'खटीया खडी करना' म्हणजे त्या व्यक्तीला नामःशेष करणं. राहूल गांधी ह्यांच्या पहिल्याच प्रसारमोहिमेत खाटा लंपास करून तिथल्या जनतेने काँग्रेसची 'खटीया खडी' करण्याचेच संकेत दिले आहेत.

उत्तरप्रदेश निवडणुकीचा निकाल काहीही लागो, खरी परीक्षा असेल ती प्रशांत किशोर ह्यांची. ह्याआधी मोदी आणि नितीशसाठी त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे, पण राहूल गांधी ह्यांच्या बाबतीत मात्र त्यांचे काम अवघड आहे. राहूल गांधी हा प्रोडक्ट निवडणुकीच्या बाजारात खपवणे खरोखरच सोपी गोष्ट नाही, कारण वरचे वेष्टण कितीही आकर्षक असले तरी मुळातले उत्पादन चांगले नसेल तर ते बाजारात फार काळ टिकत नाही ही वस्तुःस्थिती आहे.

 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121