Identity Crisis
"आबा, ही बातमी वाचलीत का? ‘African - Americans ना घेरले Identity Crisis ने’", सुमितने headline वाचली.
"नाही वाचली रे. काय म्हणतात?" वर्तमानपत्र बाजूला ठेवत आबांनी विचारले.
"१९व्या शतकापर्यंत लाखो आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून अमेरिकेत नेले. गुलामी संपुन बराच काळ गेला असला तरी आफ्रिकन लोकांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेतच. त्यातच एक प्रश्न आहे - आपले पूर्वज कोण होते? आपण नक्की कुठले? आपला धर्म कोणता? आपल्या चालीरीती कोणत्या? आपली संस्कृती काय होती? आपली भाषा कोणती? या प्रश्नांनी ते गोंधळून गेले आहेत. मुळापासून उखडून आणलेली ही माणसे 'मी कोण?' या प्रश्नाने अस्वस्थ झाली आहेत.
"त्या वेळच्या युरोपियन व अमेरिकन लोकांना स्वतःच्या गोऱ्या रंगाचा अवास्तव गर्व होता. त्या गर्वाने वंशद्वेष पोसला. आणि त्या पायी आफ्रिकन लोकांना दुय्यम ठरवून त्यांच्या हक्कांची पायमल्ली केली.” सुमितने बातमी वाचली.
"अरे, त्यांचं काय घेऊन बसलास? आपल्याला नाही का गोऱ्या कातडीचे आकर्षण? नुसतं आकर्षण नाही, तर वर्चस्वही वाटते. आता त्या इंग्रजाचे राज्य जाऊन इतकी वर्ष झाली, तरी भारताच्या नशिबाला राजकीय पटावर गोरी मेम आहेच." आबा कडवटपणे म्हणाले.
“गोऱ्या रंगाचे आकर्षण किंवा वर्चस्व का वाटावं? खरं तर, शरिरातील Melanin pigment आपल्या डोळ्यांचा, केसांचा आणि त्वचेचा रंग ठरवतो. जितके Melanin अधिक तितका रंग गाढ. आणि जितका रंग गाढ तितकं UV किरणांपासून संरक्षण अधिक. काळा-सावळा रंग काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करतो. असे असतांना आपल्याला आपल्या रंगाचा किती अभिमान वाटायला हवा!
"शिवाय ना आबा, Melanin मुळे त्वचा अधिक काळापर्यंत तरुण दिसते. काळी-सावळी माणसे लवकर म्हातारी दिसत नाहीत!” गोऱ्या रंगाचा तोरा मिरवणाऱ्या आजीकडे मिश्कीलपणे पाहत सुमितने वैज्ञानिक माहिती पुरवली.
दुर्गाबाईंनी नाक मुरडलेले पाहून, हसू दाबत आबा म्हणाले, "भारताने काळ्या रंगाचा कधीच दुस्वास केला नाही. उलट द्रौपदी, सीता, दमयंती, रुक्मिणी या सौन्दर्यवती सावळ्या होत्या. ज्यांच्यावर देवत्व बहाल केले, जीव ओवाळून टाकला, ते राम आणि कृष्ण काळे होते. झालंच तर अजंठा लेण्यां मधे चितारलेले लावण्यसुंदर स्त्री, पुरुष पहा. काळे, सावळेच आहेत.
“पण इंग्रज राजवट आली आणि आपण आपली ‘brown is beautiful’ ही ओळख हरवून बसलो. त्या Identity Crisis मुळे आपल्या कथेतल्या, सिनेमातल्या, जाहिरातीतल्या नायिका 'गोऱ्या' झाल्या, नायक पिट्ट गोरे झाले, गोरी गोरीपान बायको हवीशी वाटू लागली, Fairness creams चा सुळसुळाट झाला! सौन्दर्याची व्याख्याच बदलली. सरळ नाक, मोठे डोळे, काळे केस, तेजस्वी कांती, नितळ त्वचा या सर्वांवर गोऱ्या रंगाने कुरघोडी केली.
“बघ गंमत, शरीराला ज्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो त्याप्रमाणात melanin तयार होते. म्हणजे कसं की - तुमच्या गावाला सूर्य आकाशात किती उंच चढतो, किती वेळ आकाशात असतो, वर्षभरात तुम्हाला किती सूर्य प्रकाश मिळतो – या सूर्याच्या चालीवर तुमचा रंग ठरतो, दिसणे ठरते, आरोग्य ठरते, दीर्घायुष्य ठरते. झालंच तर प्रादेशिक सौन्दर्याची व्याख्या ठरते! तेवढंच काय, या सूर्याच्या चालीवर Racism चे भूत शेकडो वर्ष नाचले!"