उरीमधल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर गेले काही दिवस देशात वातावरण विलक्षण तापलेले आहे. 'काहीही करा पण पाकिस्तानला धडा शिकवाच' अशी देशातल्या सामान्य नागरिकाची मोदी सरकारकडून अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात उघड युद्ध हा नेहमीच शेवटचा पर्याय असतो. प्रत्यक्ष युद्ध न करता पाकिस्तानला राजनैतिक व छुप्या युद्धसदृश्य उपायांनी कसे नामोहरम करावे असे प्रयत्न सध्या मोदी सरकारकडून सुरु आहेत.साम, दाम, भेद, दंड हे सगळे उपाय वापरून पाकिस्तानला एकाकी पाडलं जातंय.
संयुक्त राष्ट्रसभेत केलेल्या आपल्या घणाघाती भाषणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ह्यांनी पाकिस्तानचा दहशतवादाबाबतचा दुटप्पीपणा जगासमोर मांडला. हा साम उपाय. सिंधू पाणीवाटप कराराचा फेरविचार केलं जाऊ शकतो हे ही मोदी सरकारने जाहीर केलंय. हा दाम उपाय. भारताच्या राजनैतिक दबावामुळे अफगाणिस्तान, भूतान आणि बांगलादेश ह्या शेजारी देशांनी पाकिस्तानमध्ये सार्क परिषदेला जायला नकार दिलाय. हा भेद उपाय आणि आत्ताच आलेल्या बातमीनुसार भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषा पार करून पाकिस्तानने चालवलेल्या दहशतवादी छावण्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. हा दंड. सर्वसामान्य भारतीय नागरिक भारताने केलेल्या हल्ल्याबद्दल समाधानी आहेत, पण भारतीय मेनस्ट्रीम मिडियामध्ये मात्र काही स्वतःला 'लिबरल' म्हणवून घेणारे पत्रकार आहेत ज्यांची हयात पाकिस्तानची भलावण करण्यात गेली आहे.
त्या स्वघोषित लिबरल लोकांचे हे प्रेमगीत, कवी कुसुमाग्रजांची क्षमा मागून लिहिलेले.
भारतीय लिबरलाचे प्रेमगीत
कवी कुसुमाग्रजांची क्षमा मागून
युद्धामागुनी झाली युद्धे किती ही
कितीदा पत्करावी हार पाकिस्ताना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या आम्ही
कितीदा करू दहशतवादाची संभावना
युपीएचे ना उमाळे, उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझुनी अता असहिष्णुतेच्या मशाली
'उरी' राहिले काजळी कोपरे !
परि अंतरी सेकुलरीजमची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न नेणे कुठे चाललो आम्ही
कळे नवाझ शरीफ पुढे आणि आम्ही मागुती!
दिमाखात अर्णब ओरडोनी, किंचाळोनी
टीआरपीची वेचितो दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या कृपादृष्टीवाचोनी
आम्हा वाटते विश्व अंधारले !
तुवा सांडलेले कुठे काश्मिरात
वेचूनिया उष्टे अन्न:कण
पुष्ट जाहलो आम्ही भारतीय लिबरल
स्मरतो उपकार तुझे क्षण क्षण
संयुक्त राष्ट्रसभेत गर्जे
सुषमा जणू प्रपात सहस्त्र
पिसाटापरी दाढी पिंजारूनी
मोदीजी म्हणती वापरू सिंधूजलाचे शस्त्र
परि तव लवण ते चाखून माखून
पेटवू कसे देशप्रेमाचे दिवे?
नको राष्ट्रप्रेम, नको देशभक्ती
तुझे लांगूलचालन त्याहुनी साहवे!
- शेफाली वैद्य