हिमालयातील वनस्पती
शोध जरी ब्रह्मकमळाचा असला तरी हिमालयाच्या या वैविध्याने नटलेल्या प्रवासात अंजना देवस्थळे यांनी मात्र हिमालयातील इतर संपन्न वनसंपदेचाही मनमुराद आनंद लुटला. यामध्ये समावेश आहे अगदी उंचच उंच बहारदार वृक्षांपासून ते रंगीबेरंगी मनाला भुरळ घालणार्या मनमोहक फुलांचा. आजच्या भागात त्याचाच घेतलेला हा आढावा...
द्रोणागिरी पर्वत आपल्याला रामायणातल्या एका प्रसंगामुळे चांगलाच ओळखीचा आहे. मृत पावलेल्या लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी रावणाच्या राज्यवैद्य सुषेण यांनी हनुमानाला संजीवनी बुटी आणायला धाडलं. कुठे? तर द्रोणागिरी पर्वतावर. मग हनुमानाला एवढ्या वनस्पतींमध्ये संजीवनी काही ओळखता येईना, म्हणून त्याने पूर्ण पर्वतच उचलून आणला. खरोखरच असं झालं का ? द्रोणागिरी नेमका कुठे होता ? आणि अशी वनस्पती असते का ? असे अनेक प्रश्र्न (Scientific temper questions) आपल्या शास्त्रीय मनाला पडतात. वनस्पतींची एक अभ्यासक म्हणून मला रामायण फार भावतं. कारण, रामायणात किती तरी वनस्पतींचा उल्लेख आढळतो. रामाचा जसजसा दक्षिणेकडे प्रवास सुरू होतो तसतसे वनस्पतींचे संदर्भही बदलत जातात.
म्हणूनच मनात असा प्रश्र्न आला की, वैद्यराज सुषेणने श्रीलंकेतून थेट हनुमानाला हिमालयात का बरं पाठवलं असेल ? शास्त्रीय दृष्टीने बघायचं ठरवलं की, काही गोष्टी लक्षात येतात. जगभरात जैवविविधतेने परिपूर्ण असलेले ३५ हॉटस्पॉट्स आहेत. या जैवविविधता संपन्न प्रदेशात अनेक ठिकाणी वनस्पतींचे असंख्य प्रकार आढळतात. एवढी जैवविविधता इतर कुठेच आढळत नाही आणि हे हॉटस्पॉट्स अनेक वनस्पतींचे उगमस्थानही आहेत. भारतात आपल्या सुदैवाने दोन अतिमहत्त्वाचे जैवविविधतेचे हॉटस्पॉट्स आहेत, एक पश्चिमघाट आणि दुसरा पूर्व हिमालय. अनेक प्रकारच्या दुर्मीळ, दुर्लभ वनस्पती इथेच सापडतात, अर्थातच त्यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहेच. मग प्रश्र्न असा पडतो की, लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी अशी तातडीची गरज असताना वैद्यराज सुषेणने हनुमानाला श्रीलंकेहून पश्चिमघाटात न पाठवता एवढे लांब हिमालयातच का पाठवले ?
काही प्रश्नांची उत्तरं ही शास्त्रांकडे असतात, तर काही गाथांमध्ये आणि लोकसंस्कृतीमध्ये दडलेली... म्हणून उत्तराखंडातल्या चमोली जिल्ह्यात गेल्यावर लोकांना द्रोणागिरी पर्वताबद्दल विचारलं आणि काही गमतीशीर गोष्टी कळल्या. इथे जोशीमठजवळ द्रोणागिरी गाव आहे. इथल्या लोकांची समजूत अशी की, हनुमानाने त्यांच्या गावातल्या पर्वताचा भाग उचलून नेला. हा पर्वत अत्यंत पूजनीय असल्यामुळे लोक हनुमानावर अजूनही नाराज आहेत. इथे हनुमानाची पूजा होत नाही. एवढंच काय, इथे लाल ध्वजदेखील लावला जात नाही.
'podgoal' हिमालय सर्वतोपरीने एकमेवाद्वितीय आहे. केवळ उंची आणि भव्यतेच्या दृष्टीनेच नव्हे, तर त्याच्या भौगोलिक निर्मितीच्या दृष्टीनेही. त्याच्या उंची आणि तापमानामुळे निर्माण झालेल्या परिसंस्थांमुळे, वातावरणामुळे इथल्या मातीत इतकी विभिन्नता आहे की, काही ठिकाणी लाल माती, काही ठिकाणी सुपीक माती, ज्यात नत्र आणि सेंद्रिय पदार्थांची मात्रा विपुल! काही ठिकाणी लाल आणि काळी माती, तर ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो अशा ठिकाणी मातीची धूप होऊन माती राखेसारखी करड्या रंगाची. याला म्हणतात. मातीची भिन्नता असल्याने त्याचे भौतिक गुणधर्म, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जैविक गुण आणि मनुष्याने त्याचा केलेला वापरही बदलतो.
साहजिकच, वनस्पतींचे प्रकार बदलत जातात. काही ठिकाणी कुरणं, काही ठिकाणी जंगलं तर अति उंचीवर चक्क थंड प्रदेशातले वाळवंट! हिमालयात वनस्पतींच्या १० हजार प्रजाती आहेत. त्यापैकी एक तृतीयांश वनस्पती आहेत. पाच कुळ देखील आहेत, म्हणजे अशा या वनस्पतींच्या प्रजाती जगात इतर कुठेही आढळत नाहीत. हिमालयाच्या पायथ्यापासून आपण जसजसे उंची गाठायला लागतो, तसतसा प्रदेश बदलतो. पहिल्यांदा उष्णकटिबंधीय म्हणजे ’Tropical' Sub-Tropical, वृक्ष दिसतात, मग मग रुंद पानांचे वृक्ष मागे सारून सूचीपर्ण वृक्ष दिसू लागतात. पुढे सूचीपर्ण वृक्ष, भुर्जपत्राचे वन, एसर, पाईन, देवदार, मेपल असे वृक्ष ज्या उंचीपर्यंत दिसतात, त्याला ’Tree line' म्हणतात. पश्चिम हिमालयात समुद्रसपाटीपासून ३६०० मीटरपर्यंत असा प्रदेश आढळतो. पूर्व हिमालयात पावसाचे आणि आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा प्रदेश ४६०० मीटरपर्यंत पसरलेला आहे. त्याच्या पुढे वृक्षवाढीच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती असते. वर्षातले सहा महिने हा प्रदेश बर्फाच्छादितच असतो. या उंचीवरच्या वनस्पती उंचीने बुटक्या असतात. कारण सूर्यप्रकाश कमी आणि भन्नाट वारा आणि सहा महिने प्रचंड थंडी, त्याचबरोबर खडकांवर, फांद्यांवर शेवाळ आणि शेवाळ-बुरशीचे संयोग, ‘लाईकेन’ म्हणजे दगड फूलही मोठ्या प्रमाणात आढळतात. यांना ‘Alpine' वनस्पती म्हणतात. यातल्या बर्याचशा वनस्पती काहीसे वाळवंटातल्या वनस्पतींचे गुणधर्म दाखवतात. या वनस्पतींची जाडसर, मांसल पाने दाटीने येतात. पाने अरुंद असतात आणि त्यांचे बाह्य साल जाड असते. कारण कमी तापमानात मुळांची पाणी शोषून घेण्याची क्रिया मंदावते. तसेच इथे हवेचा कमी दाब आणि सुसाट वारा असल्याने बाष्पीभवनही वाढते.
इथे ’रोडेडेन्ड्रोन’ नावाचे झुडूप वजा वृक्ष अशा प्रकारचे झाड आढळते. तांबूस पानं, पानांच्या खालच्या बाजूला लव, जी पानांचं थंंडीपासून रक्षण करते. यांना गुलाबी छटेची पांढरी फुलं लागतात. पूर्व हिमालयात याच्या ४० प्रजाती ओढे, कुरणं, पर्वत अशा सगळीकडे सापडतात. लालचुटूक, गुलाबी रंगाची फुले इथले लोक आवडीने खातातही...
बर्फ वितळायला लागला की, लहान-लहान वनस्पतींची वाढायची घाई सुरू होते. दर्यांमध्ये, डोंगरांवर, पुष्पावती नदीच्या किनार्यावर असंख्य प्रकारची फुलं फुलू लागतात. मे महिन्यात रोडेडेन्ड्रोनला बहर येतो आणि फुलांचा हंगामसुरू होतो, तो ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालतो. सगळी फुलं एकदम बहरत नाही. क्रमाक्रमाने त्यांचे फुलणे चालूच असतं. घडवाची लोकांनी प्रत्येक फुलाला नाव दिलेलं आहे. पांढर्या रंगाचे रतन ज्योत, करु भुती बुगला, फुटक्या, पिवळा तेरडा, वज्रदंती, दुधी, करी तमाखु अशी असंख्य नावं. काही सुर्यफूलासारखी, काही भोपळ्याच्या फुलांसारखी, काही आम्री महिलांच्या पायतानांसारखी, तर चक्क सिंहाच्या पावलांसारखी! अप्रतिमसौंदर्य अन् अद्भुत निसर्ग! इथली ४०% फुलं ही निळ्या रंगाची आणि निळ्या छटेची आहेत. त्यात निळ्या रंगाच्या या नाजूक खसखसच्या फुलांचा प्रकार इतका देखणा आहे की, त्यांना ’Queen of the Himalaya’ असं म्हटलं जातं. याचे गढवाली नाव ‘निला पोष्तो’. इथल्या लोकांना फक्त त्यांचे नावच नाही, तर गुणधर्मही माहीत आहेत. कोणते शक्तिवर्धक, कोणते विषारी, कोणते औषधी आणि त्यातूनही कोणत्या दुखण्यावर, कुठली वनस्पती गुणकारी ठरेल, अगदी सर्दीपडशापासून सर्पदंशापर्यंत या वनस्पतीज्ञानाला ’Ethnobotany' म्हणतात. म्हणजे, पारंपरिक ज्ञानातून आलेले वनस्पतींच्या वापराचे ज्ञान.
साहजिकच, मी इथल्या स्थानिक घडवाली भुतिया जमातीच्या आमचे सामान वाहून नेणार्या योगीजींना विचारलं, ‘‘क्या यहॉं संजीवनी उगती है? संजीवनी सच है या झूठ?’’ माझा प्रश्र्न त्यांना फारसा रुचला नाही कदाचित. मी संजीवनी बुटीला अमान्य करते असं त्यांना वाटलं असावं. त्यावर ते म्हणाले, ‘‘इथे शेकडो प्रकारच्या दिव्य वनस्पती आहेत. संजीवनीदेखील आहे आणि ती सापडायला दिव्य दृष्टीच लागते!’’
(क्रमश:)