दीनदयाळ उपाध्याय यांची पंचसूत्री
जर्मनीतील नाझी, इटलीतील फॅसिझम व जपानचा आक्रमक राष्ट्रवाद यामुळे दुसऱ्या महायुध्दानंतर राष्ट्रवाद या संकल्पनेकडेच संशयाने पाहिले जाऊ लागले. या पार्श्वभूमीवर संघाने हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मांडली तेव्हा त्यावरही नाझी, फॅसिझम व आक्रमक व मध्ययुगीन राष्ट्रवादाची संकल्पना म्हणून टीका होऊ लागली. या पार्श्वभूमीवर आपल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना स्पष्ट करीत असताना दीनदयाळजींनी पाच प्रमुख मुद्दे मांडले.
१) राष्ट्र ही आक्रमक संकल्पना नसून प्रत्येक देशाला राष्ट्रीय आत्मा असतो व तो त्या राष्ट्रातील समूहमनाचा चेतना व प्रेरणा देत असतो. यातूनच राष्ट्रीय पुनरूथ्थान घडत असते. देशाच्या विकासात जर अशा राष्ट्रीय चेतनेचा सहभाग नसेल तर एकतर तो अपेक्षित विकास घडत नाही, जर घडलाच तर त्यातून अनेक प्रकारचे संघर्ष व शोषक व शोषित वाद तयार होतात. त्यामुळे राष्ट्रवादाचे जागरण हाच राष्ट्राच्या सर्वंकष विकासाचा पाया असतो. आक्रमक राष्ट्रवाद ही राष्ट्रवादाची विकृती आहे. ते त्याचे मूळ स्वरूप नाही. ज्या प्रमाणे व्यक्तीला आत्मज्ञान झाले की त्याच्या शरीर, मन व बुध्दीचे घटक समन्वयाने काम करू लागतात तसेच राष्ट्रवादाची प्रेरणा सर्व समाजघटकाना समन्वयाने विचार व कार्य करण्यास प्रवृत्त करते.
२) राज्य ही केवळ प्रशासनिक यंत्रणा नसून या जागृत राष्ट्र भावनेचा ऐहिक उत्कर्षाकरिता उपयोग करून घेणारी यंत्रणा आहे. ती केवळ समाज नियंत्रण करणारी तांत्रिक व्यवस्था नसून जनसामान्याशी संवाद ठेवणारी व समाजाच्या जागृत कृतीशीलतेचा उपयोग करून परिवर्तन करणारी जैविक व्यवस्था असली पाहिजे. आपल्याच लोकात , ज्ञान देणारी सरस्वती, समृध्दी देणारी सरस्वती व रक्षण करणारी सरस्वती सुप्तावस्थेत वास करीत आहे व तिला प्रकट अवस्थेत आणणे हे आपले कर्तव्य आहे त्यावर राज्यसत्तेचा विश्वास असला पाहिजे.
३) राष्ट्रवाद ही इतिहासात रमणारी किंवा इतिहासाकडे घेऊन जाणारी रम्य संकल्पना नाही तर इतिहासातून प्रेरणा घेणारी, वर्तमानाचे भान ठेवणारी व इतिहासापेक्षाही अधिक उज्जल भविष्यकाळाचा संकल्प करणारी संकल्पना आहे.
४) प्रत्येक समाजाचा विकासाचा रस्ता त्या त्या समाजाच्या प्रकृतीनुसार भिन्न असतो. त्यामुळे राष्ट्रीय आत्म्याचा साक्षात्कार झालेला कार्यकर्ता
जिथून चालतो , तिथेच तो आपला नवा रस्ता तयार करतो.
५) जेव्हा ' मी ' चा ' आम्ही ' होतो तेव्हा शोषक हा ' शोषक ' रहात नाही, त्याचा ' पालक ' बनतो. त्यामुळे आपले खरे आव्हान ' मी ' पणाचे ' आम्ही ' मधे परिवर्तन करण्याचे आहे.