गेल्या आठवड्यात काश्मीरमधल्या उरी येथे भारतीय सैन्याच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात तब्बल १८ भारतीय सैनिक शहीद झाले, आणि भारतीय जनतेमध्ये प्रचंड लोकक्षोभ उसळला. ह्या हल्ल्याचा बदला घेतला गेलाच पाहिजे अशी तीव्र भावना जनमानसात खदखदत आहे. त्याचाच परिणाम म्हणून दिल्लीत वेगाने चक्रे हलली आणि पंतप्रधान मोदी ह्यांनी जाहीर केले की ह्या हल्ल्याची जबर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर ह्यांनीही एका पत्रकार परिषदेत प्रांजळ कबुली दिली की आपल्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्या असतील म्हणूनच इतका मोठा हल्ला झाला तरी आपण गाफील राहिलो. पुढील कारवाईचे संकेत देताना पर्रीकर ह्यांनी असेही म्हटले की काही वेळेला 'नी-जर्क रीएक्षन'म्हणजे ताबडतोब प्रत्युत्तर देणे गरजेचे असते.
पर्रीकरांच्या ह्या घोषणेनंतर लगेचच बातमी आली की आपल्या सैन्याने उरी आणि हंडवारा येथे पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध कारवाई करून १० पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातले. दुसऱ्याच दिवशी 'दी क्विंट' ह्या राघव बेहेल ह्यांच्या डिजिटल वृत्तसंस्थेने बातमी दिली की भारतीय सैन्याच्या पेरा तुकडीने लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून पाकिस्तानी दहशतवादी तळांवर हल्ले केले आणि वीस पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. क्विंटने ही बातमी देताना भारतीय सैन्यातल्या सूत्रांचा हवाला दिला व बातमीत असेही म्हटले की दोन स्वतंत्र सूत्रांकडून ह्या बातमीची खातरजमा झालेली आहे.
.@TheQuint reconfirms information about a cross-LoC op by the #IndianArmy. We stand by our story.https://t.co/KBU2Dz2wMK
— The Quint (@TheQuint) September 22, 2016
क्विंट मध्ये आलेली ही बातमी अल्पावधीतच व्हायरल झाली, पण ही बातमी खरी आहे का नाही ह्याबद्दल कित्येकांच्या मनात प्रश्न आहेत. संरक्षणाच्या क्षेत्रात रिपोर्टिंग करणारे शिव अरुर आणि नितीन गोखले ह्यांच्या मते अशी कारवाई झालेली नाही कारण भारतीय सैन्याकडून ह्या बातमीला कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. पण सुमन शर्मा नावाच्या दुसऱ्या एका पत्रकाराचे असे मत आहे की अशी कारवाई खरोखरच झालेली आहे पण ती गुप्त कारवाई असल्यामुळे भारतीय सैन्याकडून ह्या बातमीची उघड कबुली कधीच मिळणार नाही. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच्या गदारोळात क्विंटने खुलासा केलेला आहे की ते ह्या बातमीवर ठाम आहेत.
आता इथे दुसरा प्रश्न उद्भवतो की अश्या प्रकारच्या गुप्त कारवाईची जाहीर वाच्यता खरोखरच करावी का? बऱ्याच लोकांचे असे मत आहे की सीमा ओलांडून अशी कारवाई खरोखरीच केली गेली असली तरी त्यासंबंधात गुप्तता पाळली पाहिजे तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की कारवाई संपल्यानंतर त्या कारवाईसंबंधांत बोललं तर काय हरकत आहे?
क्विंटच्या ह्या बातमीनंतर लोकांच्या मनात दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे ही बातमी मुख्य वृत्तसंस्थांनी कशी प्रसिद्ध नाही केली. दुसरं, अशी कारवाई खरोखरच झाली असेल तर पाकिस्तान अजून गप्प का आहे? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सध्या तरी गुलदस्तातच आहेत. त्यावर प्रकाश पडला तर काही काळानेच पडेल. तुर्तास तरी आपण भारतीय नागरिक म्हणून ही बातमी खरीच असेल अशी अशा जरूर करू शकतो.
Not to my knowledge https://t.co/yEVx7tm7Ik
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) September 21, 2016
Quint story is correct https://t.co/Z7z5bAvWTh
— Sumann Sharrma (@SumannSharrma) September 21, 2016
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..