निःशब्द आक्रोश अर्थात मूकमोर्चा

    22-Sep-2016
Total Views |

 


महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा समाजाचे जे मोर्चे निघत आहेत, त्यांनी सर्वांना चकित करून सोडले आहे. अत्यंत शांततामय मार्गाने, शिस्तबद्ध रितीने मोर्च्यांचे आयोजन कसे केले जावे, याचा आदर्श वस्तुपाठ या मोर्च्यांनी घालून दिलेला आहे. अहिंसात्मक व शांततामय आंदोलनाचे प्रणेते म्हणून महात्मा गांधींना मानले जाते. आपल्या आंदोलनात व्यापक जनसहभाग व्हायचा असेल तर ते आंदोलन अहिंसात्मक व शांततामयच असले पाहिजे, अशी महात्मा गांधींची धारणा होती. परंतु, त्यांनाही त्यांच्या आयुष्यकाळात जे जमू शकले नाही, त्याचे दर्शन या आंदोलनात घडले आहे. या आंदोलनाला कोणताही औपचारिक नेता नाही. ज्यांनी तसे नेतृत्व घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना लगेच त्यांची जागा दाखविण्यात आली. जणू काही एक सामूहिक मन हे आंदोलन चालवीत आहे आणि त्यामागे म्हातार्‍या आजीबाईंपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत, ग्रामीण-शहरी, सर्व शैक्षणिक स्तरावरील जनता, शेती आणि औद्योगिक क्षेत्रातील लोक या सर्वांचा जाणवणारा सहभाग आहे. आजवर कथा, कादंबर्‍या आणि चित्रपट यातून सत्ताधारी मराठा समाजाचे जे चित्रण झाले आहे, त्यापेक्षा वेगळा चेहरा या आंदोलनाने समोर आणला आहे. या समूहमनामागची प्रेरणा कोणती आहे, वेदना कोणती आहे, त्याला नेमके काय सांगायचे आहे, यासंबंधी भरपूर चर्चा झडत आहेत. यातून अनेक मुद्दे समोर आले असले, तरी त्यातून पूर्णपणे समाधान होणारा कोणताच मुद्दा हाती लागत नाही. किंबहुना, विचारांची धुसरता असणे हेही एखाद्या आंदोलनाचे सामर्थ्य असू शकते, कारण त्या धुसरतेत प्रत्येकाला आपापल्या कल्पनेतून प्रेरणांचे वेदनांचे रंग भरता येऊ शकतात. परंतु, मुद्दे जसजसे अधिकाधिक स्पष्ट होऊ लागतात, तसतशी त्यांची व्यापकता कमी होत जाते. यामुळे या आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यात नेमके काय घडेल, यासंबंधी आताच अंदाज व्यक्त करणे योग्य होणार नाही. या समाजाच्या प्रस्थापित नेतृत्वाच्या पलीकडे एक नवे नेतृत्व जन्मघेत आहे, ही गोष्ट मात्र यातून स्पष्ट होत आहे. या नव्या नेतृत्वाचा चेहरा जसजसा स्पष्ट होत जाईल, तशी यामागची कारणमीमांसा अधिक स्पष्टपणे व नेमकेपणाने करता येणे शक्य होईल.

 

 

ब्रिटिशांच्या सत्तेमुळे आपल्या देशातील कृषी आणि सरंजामशाही समाजव्यवस्थेला औद्योगिक संस्कृतीची ओळख झाली. कृषी संस्कृतीतून औद्योगिक संस्कृतीत होणारे स्थित्यंतर हा केवळ उत्पादन पद्धतीतील बदल नसून तो सांस्कृतिक, विचार करण्याच्या पद्धतीतील, मूल्यनिष्ठेतील, सामाजिक, राजकीय, आर्थिक असा सर्वंकष होता. युरोपमध्येही असाच बदल झाला. परंतु, तो सहजरित्या झाला नाही. तेथे झालेल्या क्रांती, त्यातून झालेला रक्तपात, यामुळे सर्व समाज ढवळून निघत असे. त्यातल्या त्यात इंग्लंडला या बदलातील आंतरिक धक्के कमी बसले. परंतु, युरोपीय देशांत ज्या उलथापालथी झाल्या, त्यामुळे समाजातील सर्व स्तर व वर्ग ढवळून निघाले. परंतु, इंग्रजी राजवटीद्वारा भारतात जे बदल झाले, ते खालून वर जाण्याऐवजी वरून खाली पाझरत गेले. युरोपमध्ये कृषी संस्कृतीच्या विकासानंतर औद्योगिक संस्कृती आली. पण स्वातंत्र्यानंतर भारत हा औद्योगिकदृष्ट्या विकसित देशांत गेला पाहिजे, या भावनेने कृषी क्षेत्रापेक्षा औद्योगिक क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला. पहिल्या पंचवार्षिक योजनेत तर कृषी व्यवस्थेला अत्यंत गौण स्थान देण्यात आले. १९६५च्या युद्धात अमेरिकेने भारताला पाठविला जाणारा गहू बंद करण्याची धमकी देईपर्यंत कृषी क्षेत्राच्या संदर्भातले दुर्लक्ष कायमराहिले. जोपर्यंत भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी होणार नाही, तोपर्यंत आपल्याला जगात अभिमानाने जगता येणार नाही, हे लक्षात आल्यावर भारतात हरितक्रांतीला सुरुवात झाली. त्यातून देश अन्नधान्याच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण झाला. परंतु, कृषी क्षेत्राच्या उत्पन्नानंतर कृषी अर्थव्यवस्थेच्या विकासाची जी दुसरी पायरी तयार करायला पाहिजे होती, ती तयार झाली नाही. कृषी उत्पन्नाची साठवणूक, प्रक्रिया आणि त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे या गोष्टी घडल्या असत्या, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अधिक व्यापक व भक्कमझाला असता. तो न करता ग्रामीण भागातील बेरोजगारीवर उपाय म्हणून मनरेगासारख्या व दारिद्य्ररेषेखालील लोकांना स्वस्त अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्या योजना आखल्या गेल्या. ज्यांना खायलाही मिळत नाही, त्यांना रोजगार व निदान भूक भागण्याची हमी देण्याकरिता अशा प्रकारच्या योजना या योग्यच होत्या. परंतु, अशा योजनांतून जर समाजाची उत्पादकता वाढली नाही, तर त्या योजना दीर्घकालीन दृष्टीने अहितकारी ठरतात. यामुळे आज ग्रामीण भागात शेतीकरिता कामकरणारे मजूर मिळणे अवघड आहे. आजही बहुसंख्य शेती निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. शेतीचे उत्पादन वाढले तरी त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाची हमी कोणी देऊ शकत नाही. त्यातच घडणार्‍या राजकीय आणि सामाजिक बदलांमुळे नव्या समाजव्यवस्थेतील आपले स्थान काय, यासंबंधीची अनिश्चितताही मनामध्ये असुरक्षितता निर्माण करणारी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या प्रारंभिक काळातील समाजवादी धोरणामुळे आणि त्यानंतरच्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात लघु आणि मध्यमउद्योगाच्या विकासाकडे आपले दुर्लक्ष झाले. आता आपल्या समाजाची अर्थव्यवस्था स्थिर व विकासोन्मुख राहण्यासाठी लघु आणि मध्यमउद्योगांना केंद्रवर्ती ठेवून आर्थिक नियोजनाची आणि करप्रणालीत फेररचना केली पाहिजे, असे या काळात अजूनही घडताना दिसत नाही. त्यामुळे अस्थिरतेतून निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा प्रभाव सर्व समाजघटकांवर या ना त्या प्रकारे पडला. शिक्षण आणि सुरक्षित नोकरी हे औद्योगिक संस्कृतीत प्रवेश करण्याचे दोन महामार्ग बनले आहेत.


आरक्षणामुळे अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना त्याचा उपयोग होत आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची सत्ता मराठा समाजाच्या हातात आहे, असे मानले जात असले, तरी काही मोजक्या घराण्यांनाच त्याचा लाभ झाला आहे. बहुसंख्य समाज त्यापासून वंचित आहे. असे असले, तरी आपली जात सत्तेत आहे याचे आभासात्मक समाधान मिळत होते. तीन-चार वर्षांपूर्वी घरबांधणीचा उद्योग तेजीत होता व त्यामुळे अनेकांना शहरी, निमशहरी व ग्रामीण भागात उद्योगाची काही ना काही तरी क्षेत्रे खुली होती. परंतु, तोही आता मंदीच्या लाटेत सापडला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. शिक्षण आणि आरक्षण याचा मागास जातींनाच फायदा झाला. आभासात्मक का होईना, पण राजकीय सामर्थ्य गमावल्याची जाणीव, अशा अनेक कारणांतून निर्माण होणार्‍या बदलत्या राजकीय आणि सामाजिक धोरणांमुळे मनात निर्माण झालेली असुरक्षितता अशी अनेकविध कारणे एकत्र येऊन हा आक्रोश निर्माण झालेला दिसतो. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने समाजाच्या एका मोठ्या गटात असा आक्रोश राहणे हे सामाजिक आरोग्यदायी लक्षण नाही. त्यामुळे या निःशब्द आंदोलनातील खर्‍या वेदना जाणून त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. कोपर्डीतील बलात्कार हे त्याचे तात्कालिक कारण आहे. ऍट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची मागणी हा व्यापक दुःखावरचा प्रतीकात्मक उपाय आहे आणि शिक्षणातील व नोकरीतील आरक्षणाच्या माध्यमातून औद्योगिक संस्कृतीमध्ये जाण्याची दारे खुली होतील, अशी आशा मनामध्ये आहे. परंतु, अशा जातिवार मागण्यांचा विचार करून तात्कालिकदृष्ट्या एखादे आंदोलन शांत करता येईल. त्यावेळी ते तसे करणे आवश्यकही असते. परंतु, सर्व समाजाच्या विकासाच्या संधींची दारे उघडली जातील असा व्यापक विचार केला नाही, तर अशा उपाययोजना अल्पकालीन उपयोगाच्या ठरतात. औद्योगिक संस्कृती वरून खाली पाझरताना निर्माण झालेली ही वादळे आहेत. औद्योगिक संस्कृती खर्‍या अर्थाने पचवायची असेल, तर या वादळांतून दिसणारा परिवर्तनाचा गाभा लक्षात घेऊनच ती पचवावी लागेल. मराठा समाजाच्या सर्व मोर्च्यांमध्ये तरुण युवती आघाडीवर आहेत आणि त्याच बोलक्या आहेत. नवसमाजाचे हे प्रतीक असेल, तर ते अधिक स्वागतार्ह आणि नवी दिशा दाखविणारे आहे. या आंदोलनातील अनेक तरुणांशी चर्चा करताना जाणवते की, आरक्षणाच्या मर्यादा त्यांनाही माहीत आहेत. त्यांना अपेक्षा आहे ती विकासाच्या नव्या वाटांची.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121