ब्रह्मकमळाच्या शोधात...

    21-Sep-2016   
Total Views |
ब्रह्मकमळ... कधीतरी उमलणारं अनोखं, अद्भुत असं फूल. याच ब्रह्मकमळाच्या शोधात अंजना देवस्थळे यांनी हिमालयाच्या पर्वतरांगांत केलेल्या रोमांचक प्रवासाचा हा पहिला टप्पा...
 
 
फार जुनी गोष्ट आहे. माझ्या बालपणातली. माझे वडील Phillatelist होते, म्हणजे त्यांना पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद होता. ते निव्वळ तिकिटे जमा करायचे नाहीत, तर प्रत्येक तिकिटाचा सखोल अभ्यासही करायचे. त्यातूनच त्यांनी मला भारत सरकारचे १९८२ साली काढलेल्या ‘Himalayan Flowers' या मालिकेतले स्टॅम्प्‌स दाखवले. ती तशी एकूण चार तिकिटं होती. पण का कुणास ठाऊक, त्यातल्या एका फुलाने माझे लक्ष वेधून घेतले. मिटलेल्या कमळाच्या कळीसारख्या पिवळ्या रंगाच्या मोठ्या फुलात काहीतरी वेगळेपण तेव्हा मला जाणवलं असेल कदाचित आणि मग ते फूल कधीतरी दिसायला हवं अशी आस मनोमन लागून राहिली.
 
लहानपणी हिमालयाचं समीकरण थेट माऊंट एव्हरेस्टशी जुळलेलं; अधेमधे अगदी काहीच नाही. त्यामुळे या फुलाचं दर्शन दुर्लभच समजा, एकदमअवघड! ‘याची देही याची डोळा’ या फुलाला न्याहाळण्याची संधी भविष्यात कधी मिळेल की नाही, याच विचाराने मन अगदी व्याकुळ होऊन जायचं पण दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्षे सरत गेली आणि हिमालयातील पुष्पाचा मला विसरही पडला.
आणि अचानक एके दिवशी रात्री ११ वाजता मैत्रिणीचा फोन आला. ‘‘अगं आमच्या घरी ब्रह्मकमळ फुललंय. बघायचं असेल तर लवकर ये. उद्या सकाळपर्यंत कोमेजेल.’’ बाहेर धो-धो पाऊस कोसळत असला तरी मनोमन ब्रह्मकमळ बघण्याची ओढ लागली होती. कसंबसं ऐन पावसात मैत्रिणीचं घरं गाठलं. तिच्या गॅलरीतल्या कुंडीत दोन भलीमोठी पिवळट पांढर्‍या रंगाची फुलं फुलली होती. अप्रतिम, नाजूक अन् देखणी... पण हे ते ब्रह्मकमळ नव्हतंच मुळी. मन जरा खट्टू झालं. पण नव्याने ब्रह्मकमळ बघण्याची पुनश्च ओढ लागली.
पुढे सगळ्यात मोठा साक्षात्कार झाला की, हिमालय म्हणजे थेट पश्चिमेकडील अफगाणिस्तानपासून ते थेट ईशान्येच्या आसामपर्यंत. त्यात भारताच्या पोस्ट खात्याने जर तिकीट काढलं असेल, तर हिमालयातली फुलं थेट काश्मीरपासून आसामपर्यंत कुठेही सापडू शकतील. पण तरी प्रश्न होताच की, नेमकं हे ब्रह्मकमळ शोधायचं तरी कुठे?
 
पुढे काही वर्षांनी ‘गुगल’चा उदय झाला आणि मग काय? ब्रह्मकमळाचा शोध घेणं अगदी सोपं झालं. त्याबद्दलची इत्यंभूत माहिती घरबसल्या, एका क्लिकवर पटापट मिळत गेली. ब्रह्मकमळ कधी फुलेल, कुठे दिसेल वगैरे सगळं-सगळं... इतकी वर्ष बघितलेले स्वप्न साकार होईल, याची एकाएकी जाणीव झाली. ‘altitude specific’ माहिती काढल्याप्रमाणे, ब्रह्मकमळ खरं तर खूपच आहे म्हणजे, साधारण समुद्रसपाटीपासून १२ हजार फुटांवर हे दिसू लागतं. ज्या ज्या ठिकाणी ते वाढतं, त्या ठिकाणांपैकी आपल्याला सहज जाता येईल असं ठिकाणं म्हणजे उत्तराखंडमधलं हेमकुंड साहेब. पर्यटक, ट्रेकर्स, शीख यात्रेकरू वनस्पती तज्ज्ञांचे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि हेमकुंड साहेब ही परिचयाची ठिकाणं.
 
मग ब्रह्मकमळाच्या शोधात उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील हेमकुंड साहेबला प्रयाण करण्याचं लवकरच निश्चित केलं. मुंबई ते ब्रह्मकमळ या प्रवासाला कमीत कमी चार दिवस लागतील, याची थोडी खंत वाटली, पण ब्रह्मकमळाचे अखेरीस साक्षात दर्शन होणार, ही भावनाच मनाला सुखावून जात होती. पहिला टप्पा डेहराडून आणि मग ऋषिकेश. ऋषिकेशहून ३०० किमीवर गोविंदघाट नावाचे गाव. अंतर जरी ३०० किमी असलं तरी रस्ते फार वळणावळणाचे. त्यात हिमालयात कधी, कुठे दरड कोसळेल याची शाश्वती नाहीच आणि कोसळलेल्या दरडी बाजूला सारून सीमा मार्गावरील रस्ता सैनिक मोकळा करत असतील का? तर तेही माहीत नाही. डोक्यावर दरडी कोसळण्याची टांगती तलवार असली तरी संपूर्ण रस्ता मात्र अत्यंत प्रेक्षणीय... एकीकडे उंच भव्य हिमालयाची शिखरे आणि दुसरीकडे खळाळत वाहणारी अलकनंदा नदी. अलकनंदेच्या प्रवाहाला भर घालणार्‍या असंख्य लहानमोठ्या उपनद्या. त्यामुळे वाटेत प्रयाग लागतात. देवप्रयाग, रूद्रप्रयाग, नंदप्रयाग असे एकूण नऊ प्रयाग. अलकनंदेला असे आणखी कित्येक लहानमोठे ओढे मिळतात पण त्यांना प्रयाग म्हणावं इतकं महत्त्व दिलेले नाही. हे ३०० किमी अंतर पार करायला किमान दहा तास लागतात. वाटेत श्रीनगर, जोशीमठ आणि प्रेक्षणीय अशी अनेक महत्त्वाची धार्मिक ठिकाणे लागतात. आपल्याला सह्याद्रीची सवय असल्यामुळे आपल्याला डोंगर म्हटलं की काळा कातळ, कडेकपारी, पठार असं घाटावरचं चित्र नजरेसमोर येतं. पण हिमालय हा निश्चितच वेगळा आहे. इथे जरा सह्याद्रीच्या भौगोलिक निर्मिती आणि हिमालयाच्या निर्मितीबद्दल सांगावंसं वाटतं.
 
तुम्ही कधी उन्हाळ्यात पाचगणी किंवा कासच्या पठारावर उभे राहून पुढच्या डोंगराकडे बघितलंय का? जरा निरखून बघितलं तर सह्याद्रीच्या निर्मितीचे गुपित उलगडेल. समोरच्या डोंगरांमध्ये थर दिसतात. काळ्या खडकाचे थर, त्यामध्ये माती. म्हणजे, सँडविचप्रमाणे प्रमाणे बेसॉल्ट खडकाच्या दोन थरात माती. दख्खनचे पठार हे भूगर्भातून निघालेल्या लावा रसातून तयार झाले. (आपल्याला शिकवल्याप्रमाणे एका डोंगरमाथ्यातून हा लावा रस निघाला नाही.) हा लावा रस भूगर्भातल्या फटीमुळे बाहेर आला आणि पसरला. म्हणजे, उकळतं दूध उतू जातं आणि पसरतं अगदी तसं. असो. लावा पसरून थंड झाला की, एक थर, त्या थरावर ऊन-वारा-पाऊस प्रक्रिया करून खडकाची माती बनवतं. मग परत काही हजार वर्षांनी लावाचा प्रकोप! मग परत माती. हा पृथ्वीवरचा खेळ काही शेकडो नव्हे, तर कोट्यवधी वर्षे चालला. पाचगणीला उभं राहिलात आणि बघता आलं तर २९ थर दिसतील! शिवरायांचे गड, पठार, कास, रायरेश्वर, पाचगणी हे सगळे त्या शेवटच्या लावाच्या थरावर वसलेले. एकदा हा खेळ संपला आणि मग ओढे -नाले-नद्या कामाला लागल्या. नद्यांचा प्रवाह आणि घर्षणामुळे दर्‍यांची निर्मिती झाली. (लोणावळ्याला उल्हास पॉईंटला उभा राहिलात, तर हे स्पष्ट होईल.)
 
Tectonic plates असे कातळाचे, बेसॉल्टचे डोंगर आणि पठार बघण्याची सवय असल्यामुळे हिमालयातले पर्वत वेगळेच वाटले. लांबून बघितलं की, डोंगरात दगड-माती तिरके तिरके रचल्याचा भास होतो आणि तिथे दरडी कोसळलेल्या बघितल्या, तिथे तर आणखीनच गंमत. निव्वळ दगड नाही; कुठे काळे, कुठे पांढरे तर कुठे वाळू, तर काही ठिकाणी चक्क नदीच्या पात्रात आढळणारे पांढरे गोल गोटे. सगळंच चमत्कारिक! हिमायलाची निर्मिती अगदीच वेगळी. आज जिथे हिमालय आहे, तिथे हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता. दोन खंडांच्या एकमेकांवर आपटल्या आणि त्याच्यामुळे जो काही उद्रेक झाला तो असा. पत्त्यांचे दोन जोड एकत्र आणले की, कसे तिरके रचले जातात, तसे आणि अजूनही स्थिरावलेले नसल्यामुळे पडताहेत.
 
स्वाभाविकच सह्याद्रीच्या डोंगरात आणि हिमालयाच्या पर्वतात खूप फरक आहे. इथल्या मातीत फरक आणि आणि पाण्याच्या गढूळपणातही आणि वातावरणातही आणि स्वाभाविकपणे वनस्पतींमध्येदेखील. सुरुवातीच्या प्रवासात आपल्याला ओळखीचे वृक्ष-वनस्पती दिसतात. अगदी आंबा, काटेसावर, बहावा असे. पण, जसजशी आपण उंची गाठत जातो, तसतसे वृक्ष-झुडूप बदलत जातात. काहीसे अनोळखी सूचिपर्ण वृक्ष चहूकडे दिसू लागतात. श्रीनगरला तर चक्क तण वाढावे, तसे गांजाची झुडूपे, जिकडे बघावं तिकडे गांजा!
 
पुढे जोशीमठ, शंकराचार्यांनी स्थापित केलेलं उत्तरेतलं पीठ, इथे अथर्ववेदाचे महत्त्वाचे स्थान आहे आणि मग गोविंदघाट. तसं गोविंदघाट लहानसं गाव. पण बद्रीनाथ आणि हेमकुंड या दोन अतिमहत्त्वाच्या धार्मिक स्थळांमुळे याला महत्त्व प्राप्त झालं. गोविंदघाटपर्यंत गाड्या जातात. पुढे धांगरियापर्यंत १४ किमीचा प्रवास चालत करावा लागतो. १४ किमीचा प्रवास म्हणजे निव्वळ चढणच आहे. कारण पाच हजार फुटाच्या उंचीवरून आपल्याला ११,५०० फुटांची उंची गाठायची असते. या अंतरासाठी सहा तास लागू शकतात. पण खळाळती नदी, दाट जंगलाच्या असंख्य फुलांनी नटलेल्या परिसरामुळे बागेत विहार केल्याप्रमाणे वाटतं. असंख्य नेचे, विविध रंगांचे तेरडे, भूर्जपत्राचे वन, चीर, देवदारचे उंच वृक्ष, अशा असंख्य सुंदर वनस्पती बघता-बघता घांघरिया उगवतं.
 
घांघरिया हे तसं अस्थायी वस्तीचं गाव. खरं तर गाव नाहीच; इथे कुटुंबंराहतच नाही. फक्त एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांसाठी हॉटेल चालवायला लोक येतात. १० ऑक्टोबरला दारं-खिडक्या बंद करून हॉटेलला कुलूप लावून सगळी माणसं आपल्या कुत्र्या-मांजरांसकट खाली उतरतात. मग सगळे व्यवहार पुढल्या एप्रिलपर्यंत बंद. इथे एक गुरुद्वारा आहे आणि इथूनच पुढे ‘फुलों की घाटी’ म्हणजे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' आणि शीखधर्मियांचे हेमकुंड साहेब ही दोन ठिकाणं लागतात.
 
‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’...  फुलांची दरी. नंदा देवी बायोस्पिअर रिझर्व्हचा कोर झोन. सुमारे ८७.५ चौ. किमी. परिसरात पसरलेला. अगदी स्वर्गासमआहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. हिरवेगार डोंगर, त्यावर ढग, खळाळणारे धबधबे, मधूनच वाहणारी पुष्पावती नदी आणि आजूबाजूला रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, हे इथले वैशिष्ट्य. स्थानिक लोकांच्या मते, इथे पर्‍यांचा वास आहे!
 
इथे असंख्य फुले सापडतात. पण ब्रह्मकमळ इथे आढळत नाही. त्यासाठी आणखी उंची गाठावी लागेल. आणखीन गारठा लागेल आणि त्यासाठी हेमकुंडची वाट गाठावी लागेल. म्हणून घांघरियाला पोहोचल्यावर पहिले हेमकुंड आणि मग ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ असं ठरवलं, कारण ब्रह्मकमळ बघण्याचा ध्यास घेतला होता. पुढल्या भागात फेरफटका मारणार आहोत, हिमालयातल्या वनस्पतींचा...  
(क्रमशः)
 
-अंजना देवस्थळे

अंजना देवस्थळे

लेखिका एमएससी इन हॉर्टिकल्चर असून पेशाने हॉर्टिकल्चर कन्स्लटंट आहेत. हॉर्टिक्लचर अर्थात ‘उद्यानविद्या’ क्षेत्रात त्या अध्यापन करतात, शिवाय या विषयातील तज्ज्ञ सल्लागार म्हणूनही त्या कार्यरत असून विपुल लेखनही करतात. ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या त्या कार्यकर्ता असून पर्यावरणीय विषयांचा व्यापक अभ्यास आहे

अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121