उरी बसलेला घाव 

    19-Sep-2016   
Total Views |

काल परत एकदा काश्मीर खोरे दहशतवाद्यांच्या गोळ्यांच्या आवाजांनी हादरून गेले. बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी येथल्या डोग्रा रेजिमेंट १२व्या ब्रिगेडच्या छावणीत पहाटे चार वाजता चार दहशतवादी घुसले. त्यांनी भारतीय सैन्याचा गणवेष घालून छावणीत प्रवेश मिळवला असे प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. पहाटेची वेळ होती, साहजिकच सैनिक त्यांच्या तंबूमध्ये शांत झोपले होते. दहशवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार तर केलाच पण हातबॉंम्बही फेकले. राहुट्यांमध्ये आग लागली आणि १७ सैनिक होरपळून मृत्यू पावले, तर १९ जखमी झाले. हा हल्ला करणारे चारही दहशतवादी भारतीय सैन्यानाने टिपून मारले खरे पण ह्या हल्ल्याची भारताला जबर किंमत मोजावी लागली. भारतीय सैन्यावर शांतीकाळात झालेला हा गेल्या काही वर्षातला सगळ्यात मोठा हल्ला. हा नुसता दहशतवादी हल्ला नाहीये, तर हे पाकिस्तानने पुकारलेले भारतावरचे एकतर्फी युद्ध आहे. पंतप्रधान मोदीनी स्वतंत्र बलुचिस्तानच्या लढयाला दिलेल्या जाहीर पाठिंब्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तान नावाच्या हिंस्त्र काळसर्पाची ही निकराची वळवळ आहे.

ह्या हल्ल्यामुळे समस्त भारतीय लोकांच्या मनामध्ये राग, पाकिस्तानबद्दलचा त्वेष, असहाय्यता अश्या संमिश्र भावनांचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांनी ह्याआधी पाकिस्तानला धडा शिकवण्याबद्दल खूप वेळा जाहीर वक्तव्ये केली आहेत. आता बोललेले खरे करून दाखवायची वेळ आली आहे. पाकिस्तान ह्या देशाची स्थापनाच मुळी भारतद्वेष ह्या एकाच संकल्पनेवर आधारीत आहे, त्यांच्याकडून मैत्रीची व शांतीची अपेक्षा करणेच वेडेपणाचे आहे. पाकिस्तान बरोबर भारताची तीन युद्धे झाली. तिन्ही युद्धांमध्ये पाकिस्तानचा दणदणीत पराभव झाला. त्यांच्या देशाचे दोन तुकडे झाले. भारताबरोबर आमने-सामने युद्ध झाले तर पाकिस्तान टिकू शकणार नाही हे पाकिस्तानी सैन्यालाही चांगलेच माहिती आहे त्यामुळेच पाकिस्तान गेली कित्येक वर्षे काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालून भारताविरुद्ध 'लो इंटेन्सिटी' युद्ध करत आहे असे युद्धक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. 

दुर्दैवाची गोष्ट ही आहे की भारताचे शत्रू केवळ भारताबाहेरच नाहीत तर भारताच्या सीमेच्या आतही सर्वदूर पसरले आहे. हेच देशाचे शत्रू मीडियामध्ये मोठ्या संख्येने आहेत, जेएनयू सारख्या विश्वविद्यालयामधून त्यांची पाळेमुळे घट्ट पसरलेली आहेत, म्हणूनच  जेएनयूमध्ये 'भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्लाह' अश्या घोषणा उघडपणे दिल्या जातात आणि बरखा दत्त सारख्या नावाने भारतीय असलेल्या पत्रकारांचं  हाफिज सईद सारखा पाकिस्तानी दहशतवादी जाहीर कौतुक करतो. ह्या अश्या घरभेदी लोकांना शोधून त्यांचे बुरखे फाडण्याचे काम खरेतर सरकारचे आहे, पण देशाचे प्रमुख मंत्रीच जेव्हा बरखा दत्तसारख्या उघडउघड दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या पत्रकारांच्या गळ्यात गळे घालतात तेव्हा त्यांच्याकडून कुणी आणि कसली अपेक्षा ठेवावी? 

उरीमध्ये जो हल्ला झाला त्याबद्दल देशाच्या नागरिकांमध्ये हजार प्रश्न आहेत. आर्मीचा युनिफॉर्म घातलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या छावणीवर हल्ला करणे हा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. तरीही, अति संवेदनशील भागातल्या, सीमेवर असलेल्या, कडक सुरक्षा अवस्था असलेल्या छावणीमध्ये दहशतवादी इतक्या सहजतेने आत शिरूच कसे शकतात? बातमी अशी आहे की ही घटना घडली त्याच्या आदल्याच दिवशी युनिट बदलले होते. नवीन सैनिकांची तुकडी नुकतीच येऊन दाखल झाली होती त्यामुळे छावणीमध्ये थोडा गोंधळ होता. ह्या गोंधळाचा फायदा घेऊन छावणीवर हल्ला झाला. पण मग ही बातमी दहशतवाद्यांपर्यंत पोचली कशी? 

कालच्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांच्या भारतीय ध्वजाने आच्छादलेल्या त्या १७ शवपेट्या पाहिल्या आणि आतमध्ये काहीतरी तुटलं, जळलं. हे सैनिक ते झोपेत असताना झालेल्या भ्याड हल्ल्यात होरपळून मृत्यू पावले आहेत. महाभारतातल्या युद्धाच्या शेवटी शेपटीवर पाय दिलेल्या सापासारखा चवताळलेला, सूडाने आंधळा झालेला अश्वत्थामा रात्रीच्या अंधारात राहुटीत झोपलेल्या पांडव सैनिकांना आणि द्रौपदीच्या पाच मुलांना मारतो. त्याला पकडून आणल्यावर कृष्ण त्याला शिक्षा सुनावतो, कसली? मृत्यूची नव्हे. अश्वत्थाम्याने केलेल्या अक्षम्य अपराधाला मृत्यू ही फारच सौम्य शिक्षा असते. कृष्ण अश्वथाम्याला ठोठावतो ती अक्षय्य जीवनाची शिक्षा, डोक्यावर भळभळत वाहणाऱ्या, पूवाने भरलेल्या, ओंगळ, चिरदाह देणाऱ्या वेदनेसकट जगण्याची शिक्षा. 

भारत सरकार पाकिस्तानला कसली शिक्षा सुनावणार आहे? क्रिकेट खेळण्याची? 'कडे शब्दों में निंदा' करण्याची की 'अमन का तमाशा' ह्यासारख्या निरर्थक मोहिमा चालवण्याची? मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहे. मोदी अजित डोवाल आणि पर्रीकर ह्यांच्यासारखे लोक सत्तेत असताना देखील जर ह्या हल्ल्याचं पाकिस्तानला चांगलंच कळेल अश्या भाषेत प्रत्युत्तर दिलं गेलं नाही तर 'उरी' बसलेला हा घाव भारतीय जनता कधीच विसरणार नाही आणि ह्याची किंमत भाजपला २०१९ मध्ये मोजावीच लागेल.   

 

-शेफाली वैद्य       

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121