अर्थव्यवस्था
"एक राजकन्या होती. विचारवंत, तेजस्वी आणि विद्यावती. स्वयंवरासाठी तिने अट घातली - मी विचारलेल्या प्रश्नांची जो अचूक उत्तरे देऊ शकेल त्यालाच मी वरणार!
राजाने आपल्या लाडक्या लेकीची मागणी लगेच मान्य केली! गावागावात दवंडी पिटवली. दूरदूर पर्यंत अनेक राज्यात निमंत्रणे गेली. राजकन्येच्या पणाचा सर्वत्र बोलबाला झाला.
स्वयंवरा करिता दुरदुरून राजकुमार आले. सरदार आले. योद्धे आले. विद्वान आले.
राजकन्येने प्रश्न करावा - सत्ताविसातून नऊ गेल्यावर किती उरले?
सगळे चट्कन उत्तर देत - १८ उरले!
त्यांचे उत्तर ऐकून ती त्यांची पाठवणी करून देई.
करत करत अनेक दिवस गेले, महिने लोटले. पण राजकन्येच्या परीक्षेला कोणी उतरेना.
एक दिवस एक हुशार आणि संवेदनशील तरुण आला. त्यालाही राजकन्येने तोच प्रश्न विचारला.
त्या तरुणाने प्रश्नावर विचार करून उत्तर दिले - शून्य!
राजकन्येने अत्यंत आनंदाने त्याच्या गळ्यात वरमाला घातली!
राजाने त्यांचे थाटात लग्न लावून दिले आणि मग ते सुखाने नांदू लागले!"
आबांची गोष्ट संपली अन् सुमितच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. "आबा, हा प्रश्न काय होता आणि त्याच उत्तर काय होते?"
आबा म्हणाले, "राजाने पण हेच विचारले! राजकन्येने उत्तर दिले - २७ नक्षत्रांपैकी ९ नक्षत्रे पावसाची. सत्ताविसातून नऊ गेले, म्हणजे पाऊस पडलाच नाही तर सगळं शून्य आहे. असा त्याचा अर्थ आहे."
सुमित म्हणाला, "ओह! पण नक्षत्रांचा पावसाशी काय संबंध?”
आबा म्हणाले, "कसं असतं, सूर्याचा आकाशातला जो मार्ग आहे, त्याचे २७ भाग केले. प्रत्येक भाग म्हणजे एक नक्षत्र. सूर्य प्रत्येक नक्षत्रात साधारण १३.३ दिवस राहतो. सूर्याने पावसाच्या नक्षत्रात प्रवेश केला की मौसमी पावसाचे आगमन होते.
"मृगा, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्या, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी आणि हस्त ही ९ नक्षत्रे पावसाची. ७ जूनला सूर्य मृग (मृगशीर्ष) नक्षत्रात प्रवेश करतो. दर १३ / १४ दिवसांनी पुढच्या नक्षत्रात, असे करत १० ऑक्टोबरला हस्त नक्षत्रातील वास्तव्य संपवून चित्रा नक्षत्रात जातो.
"इकडे आकाशात सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की - मौसमी पावसाचे आगमन होते, शेतीची कामे सुरु होतात, भूमीतील पाण्याचे पुनर्भरण होते, पाण्याची साठवण होते, Hydro-electric power तयार होते आणि त्या अनुषंगाने इतर उद्योग कार्यरत होतात. आकाशाच्या भव्य, रंगीत नाट्यमंचावर, सूर्याने नुसती एन्ट्री घेतली की काय काय घडून येते पहा!
"तर! चिरंजीव, केवळ दैनिक, मासिक आणि वार्षिक कामेच सूर्याच्या मर्जीने चालतात असे नाही, तर भारताची economy सुद्धा सूर्याच्या आणि नक्षत्रांच्या मर्जीने चालते!”