असा कसा रे इको फ्रेंडली सण ?

    14-Sep-2016   
Total Views |



कुठला ही सण आला रे आला की लगेच फेसबुक ट्विटर वरुन इको फ्रेंडली सण साजरे करण्याचे संदेश सुरु होतात. एका अर्थाने हे खरोखरीच चांगले आहे. यामुळे पर्यावरणाप्रती जनजागृती होते. मात्र तरीही इको फ्रेंडली चा हा नियम सगळेच पाळतात असे नाही. होळीत पाणी वाया घालवणे चुकीचेच आहे. दीपावलीला फटाक्यांमुळे देखील वायु प्रदूषण होतच. गणपती मिरवणूकीत पण मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण पण होतच. परंतु तसेच इतरही सणांमध्ये देखील पर्यावरणाचे हानी होते हे ही आपण मान्य करायला हवं.



कालच बकरी ईद झाली. भारतासह इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिमांसाठी हा एक अत्यंत पवित्र सण मानला जातो. आणि सगळ्यांनी मिळून त्याचं पावित्र्य राखायलाच हवं. बांग्लादेशची राजधानी ढाका येथील बकरी ईद नंतरचे काही फोटो काल ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले. ढाका चे प्रमुख रस्ते अक्षरश: रक्ताने लाल झाले होते.

इतक्या मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांची कत्तल झाल्यावर त्याला स्वच्छ करण्यासाठी किती लीटर पाणी बरं खर्च करावं लागलं असेल? आणि रक्ताने भरलेल्या या रस्त्यांमुळे पर्यावरणाचा हृास तर नक्कीच झाला असणार, त्याच्या वासाने वायु प्रदूषण देखील झाले असणार. आणि रोग राई? ती तर नक्कीच पसरली असणार. हो ना? मग असे असताना इको फ्रेण्डली ईद देखील साजरी करता आली असती ना. ढाकाच्या रस्त्यावरच्या त्या भयावह दृष्यामुळे एक आणखी प्रश्न मनात उपस्थित झाला. इतक्या बकऱ्यांना एकत्र कापल्याने प्राण्यांचे जीवनचक्र आणि अन्न साखळीवर त्याचा परिणाम होत असणार ना? एका अर्थाने यामुळे देखील आपण पर्यावरणाशी खेळच करत आहोत.

या उलट....

या उलट भारताच्या लखनऊ शहरात मुस्लिम बांधवांनी स्वच्छेने बकऱ्याच्या आकाराचा केक कापून बकरी ईद साजरी केली. हा निर्णय त्यांचा स्वत:चा होता. पर्यावरणाला त्रास होवू नये. अन्न साखळीत खंड पडू नये आणि मुक्या प्राण्यांचे हाल होवू नयेत या साठी म्हणून त्यांनी हा उपाय शोधून काढला. त्यामुळे बकरा कापण्याने होणाऱ्या सगळ्याच गोष्टी टळल्या. तसेच मुस्लिम मंचाच्या बांधवांनी गाईंना आणि बकऱ्यांना चारा घालून बकरी ईद साजरी केली. यामुळे ऐक्य वाढतं असं या मुस्लिम बांधवांचं मत होतं.



एका बाजूला अख्ख शहर रक्ताने माखलं, तर दुसऱ्या बाजूला मुक्या प्राण्यांना चारा मिळाला. करणारे लोकंही तेच, धर्मही तोच, रूढी ही त्याच, परंपरा ही त्याच मात्र साजरे करण्याची पद्धत वेगळी. दर वेळेला गणपती, दिवाळी होळीच्या वेळेला पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले जातात. ते केवळ धर्मविशिष्ठांसाठीच असतात असे नाही. ते एकूण सर्वांसाठी असतात. त्याचप्रमाणे इको फ्रेण्डली बकरी ईदचा संदेश देखील केवळ धर्म विशिष्ठांसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी आहे हे समजून घ्यावे. होळीला खर्च होणारं पाणी, आणि बकरी ईदनंतर खर्च होणाऱ्या पाण्याला धर्म नसतो. पर्यावरणालाही धर्म नाही. तर त्याचे रक्षण करणे हा आपला परम धर्म असला पाहिजे. सण कुठलाही असो 'इको फ्रेण्डली' साजरा केल्याने कल्याण सर्वांचेच होणार आहे. त्यामुळे याचे पालन सर्व धर्म समभावाने करणे गरजेचे आहे.

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121