मोहम्मद शहाबुद्दीन हे नाव ऐकलंय का कधी? तुमचा बिहारशी जर कधी संबंध आला असेल तर मोहम्मद शहाबुद्दीन ह्या माणसाची कीर्ती तुमच्या कानावर आलीच असेल. शोले सिनेमात जसा गब्बर सिंग आपल्या दराऱ्याबद्दल बोलताना म्हणतो की पंचक्रोशीतल्या कुठल्याही गावात जर एखादं मूल रडत असेल तर त्याची आई त्याला दटावते की झोप मुकाट नाहीतर 'गब्बर सिंग आ जायेगा'. तसा हा शहाबुद्दीन बिहारचा गब्बर सिंग. देशी पिस्तुले आणि तलवारी ही हत्यारे घेऊन लढणाऱ्या बिहारी गुन्हेगारी जगतात ह्याने पहिल्यांदा एके-४७ सारखी असौल्ट रायफल आणली. ह्या माणसावर खुनाचे तब्बल पस्तीस आरोप आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा चाराधीश लालू प्रसाद यादव ह्यांचा हा शहाबुद्दीन एकेकाळचा उजवा हात. लालू बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बिहार मधल्या कारकिर्दीला जंगल राज म्हटलं जायचं, त्या जंगल राज्याचा हा शहाबुद्दीन मुख्य वजीर होता. एकेकाळी त्याची दहशत बिहार मध्ये इतकी होती की सामान्य जनता त्याचं नुसतं नाव घेतलं तरी चळाचळा कापायची.
लालू प्रसाद यादवच्या जंगलराजला विटलेल्या बिहारी जनतेने शेवटी २००५ च्या निवडणुकीत नितीश कुमार ह्यांच्या बाजूने कौल दिला. जंगल राज मोडून काढून बिहार मध्ये परत कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आणण्याच्या बोलीवर नितीश मुख्यमंत्री झाले आणि ह्याच मोहिमेचा एक भाग म्हणून शहाबुद्दीनचे गुन्हेगारी साम्राज्य मोडून काढण्यात आले. नितीश कुमार ह्यांच्या देखरेखीखाली बिहार पोलिसांनी कसून तपास करून शहाबुद्दीन विरुद्ध राजीव रोशन ह्या माणसाच्या खुनाचे पुरावे गोळा केले आणि त्या पुराव्यांच्या आधारावर शहाबुद्दीन जेलमध्ये गेला. गेली अकरा वर्षे तो भागलपूर जेलमध्ये होता.
गेल्या अकरा वर्षात बिहारमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. आपल्या 'प्रामाणिक' इमेजची हवा डोक्यात गेलेल्या नितीश कुमार यांनी सहकारी पक्ष असलेल्या भाजपशी काडीमोड घेतला आणि ज्या लालू यादवला त्यांनी एकेकाळी 'गुंड, लुटेरा, जंगल राज चालवणारा भष्टाचारी गुन्हेगार' अश्या शेलक्या शिव्या दिल्या होत्या त्यांच्याच राष्ट्रीय जनता दलाबरोबर नितीश कुमार ह्यांनी २०१५ च्या राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी सोयरीक केली. सगळ्या राजकीय पंडितांचे अंदाज फोल ठरवत बिहारी जनतेने लालू-नितीश यांचे महाठगबंधन भरघोस मतांनी निवडून दिले, त्यातही लालू ह्यांच्या राजदला नितीश कुमार ह्यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा मिळाल्या. नितीश नावापुरते मुख्यमंत्री राहिले खरे पण सत्तेचे केंद्र मात्र आता बदलले होते. ह्या बदललेल्या सत्ता केंद्राचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ११ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीनची जामिनावर झालेली सुटका. ह्या सुटकेला विरोध करायचा होता तो राज्यसरकारने, पण राज्यसरकारचा कुणीही प्रतिनिधी जामिनाची सुनावणी होत असताना कोर्टात हजार नव्हता. कारण वरून आदेशच तसे होते.
जेलमधून सुटल्यावर शहाबुद्दीनने पहिलं काम केलं ते म्हणजे दोन बोटे इंग्रजी व्हीच्या आकारात उंचावून निर्लज्जपणे विजयाची खूण केली. ती खूण म्हणजे नितीश कुमारला दाखवलेली वाकुली होती. 'नितीश कुमार हे परिस्थितीमुळे झालेले मुख्यमंत्री आहेत' असे तुच्छतादर्शक उद्गार नितीश कुमार ह्यांच्याबद्दल काढून शहाबुद्दीनने बिहारच्या बदललेल्या राजकारणातली त्यांची जागा त्यांना नीटच दाखवून दिली. 'लालू यादव हे माझे नेते आहेत' हेही जाहीरपणे सांगायला शहाबुद्दीन विसरला नाही. त्यानंतर त्याच्या समर्थकांसोबत एका मोठ्या शक्तीप्रदर्शन घडवणाऱ्या मिरवणुकीतुन तो भागलपूर जेलमधून बाहेर पडला. बिहार मध्ये जंगल राज्याची अशी परत एकवार विधिवत प्रतिष्ठापना झाली, आणि त्या कोलाहलात नितीश कुमार ह्यांची 'स्वच्छ, कार्यक्षम, कर्तव्यकठोर मुख्यमंत्री' ही त्यांनी परिश्रमपूर्वक घडवलेली प्रतिमा मात्र कुठल्या कुठे विरून गेली. शोलेचीच उपमा वापरायची तर बिहारच्या रामगढमध्ये गब्बर सिंग परत आलाय पण ठाकूरचे मात्र हातच काय पण पायही छाटले गेलेत!
- शेफाली वैद्य