"पूजाताई, आणखी काही वैज्ञानिक गोष्टी सांग ना!" सागरचा आग्रह.
"नक्की! ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला कळवा म्हणून माहितीतली उदाहरणे देऊन अवघड संकल्पना समजावून दिल्या. त्या उदाहरणांमध्ये त्या काळातीळ अनेक वैज्ञानिक संकल्पना आहेत, त्या आपण पाहू.
“ते समजून घ्यायला, आपण जाणार आहोत १२९० सालात. तेंव्हा थायलँड, मलेशिया, जावा, सुमात्रा, कॅम्बोडिया, इंडोनेशिया येथे हिंदू व बौद्ध राज्य भरभराटीस आली होती. कॅम्बोडिया मध्ये अंगकोर वटचे भव्य मंदिर नुकतेच बांधून झाले होते. तर योग्यकर्ता (जावा) येथील भव्य शिवगृह मंदिरात वेदाभ्यास चालत होता.
“त्यावेळी प्रवरा नदीच्या काठावरील नेवासे या गावी, ज्ञानेश्वरांनी गीतार्थ सांगितला.”
"आज कोणती संकल्पना आपण पाहणार?"
“ऐक तर! ज्ञानोबा म्हणतात -
“कुंडलिनी शक्ती जेंव्हा ब्रह्मरंध्री स्थिरावते, तेंव्हा ती शक्ती सोहम भावाचे बाहु पसरून शिवाला आलिंगन देते. हे शिव-शक्तीचे मिलन, नदी समुद्राला मिळते तसे आहे. म्हणजे कसे? तर मेघ होऊन पाणी समुद्रा पासून दूर जाते. पाऊस होऊन बरसते. आणि नदी होऊन पुन्हा समुद्राला मिळते तसं.”
“अरे! ही तर आपण शाळेत शिकतो ती water-cycle आहे!” सागर म्हणाला.
“पूजाताई, तुला सांगू का? युरोप मध्ये ग्रीक काळापासून १६व्या शतका पर्यंत अशी समजूत होती की, जमीन समुद्रावर तरंगते. समुद्रातील पाणी जमिनीखालून झीरपते आणि तोच नदीच्या पाण्याचा स्रोत आहे. १६व्या शतकात बर्नर्ड पालीस्सीने water-cycle चा शोध लावला.
“समुद्र - वाफ - ढग - पाऊस - नदी - समुद्र हे पाण्याचे अविरत चक्र १३व्या शतकात भारतात माहीत होते. कमाल आहे!”
-दिपाली पाटवदकर