पांढर्‍या कपड्यातले गलिच्छ काही...

    01-Sep-2016
Total Views |

पवारसाहेब असे, पवारसाहेब तसे, पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता नाही,’ अशा झांजा वाजविणार्‍यांची एक फौजच्या फौज महाराष्ट्रात होती आणि आहे. यात सरकारी डॉक्युमेंटर्‍या काढून ख्यातनाम झालेले सिने दिग्दर्शक आहेत. दोन-चार फ्लॅट मिळवून मुंबईत ‘ज्येष्ठ’ झालेले पत्रकार आहेत. सरकारी पदव्या आणि भूषणांनी अलंकृत झालेले साहित्यिकही आहेत. वरील श्रेणीतील बर्‍याच लोकांनी पवारसाहेबांवर इतके बोलले आणि लिहिले आहे की, पवारसाहेब इंग्रजीत म्हणतात तसे ‘लार्जर दॅन लाईफ’ होऊन बसले आहेत. महाराष्ट्रात पवारसाहेबांसंदर्भात काहीही घडले की, ही मंडळी माध्यमांमध्ये येऊन पोहोचतात आणि मोठ्या साहेबांचे मोठमोठ्याने गुणगान करायला सुरुवात करतात. पण निवृत्तीच्या वयात पवारसाहेबांचे जे काही चालले आहे ते वर उल्लेखलेल्या भाटांच्या मतीच्या पलीकडे गेले आहे. त्याचे समर्थन करावे की विरोध करावा, हेच त्यांना समजेनासे झाले आहे.

पवारसाहेबांचा लौकिक असा की, दोन शब्दांमधील जागेतला मजकूर ते बरोबर पेरतात आणि ज्यांना जो संदेश मिळायला हवा असतो, तो तिथे बरोबर पोहोचतो. स्वत:ला जनसंवादाचे तज्ज्ञ म्हणून विद्यापीठाच्या पदव्या मिळविणार्‍यांनाही जमणार नाही, असे हे कसब आहे. या कसबावरच पवारांनी आजवर राज्य केले. त्यांचा प्रशासकीय वकूब दांडगा होताच; परंतु त्या वकुबाला या अशा धूर्तपणाची ठसठशीत किनारही होती. देशात बिगर कॉंग्रेसी पर्याय समोर आले आणि पवार आणि पवारांसारखे अन्य मनसबदार इतिहासजमा होण्याच्या मार्गाला लागले. महाराष्ट्राच्या इतिहासाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न पवारांच्या मानसपुत्रांनी बरहुकूम केला; परंतु त्यात पवार स्वत: कधीच उतरले नाहीत. एका ठराविक जातीच्या लोकांना आमदार करून त्यांचे सगळे चाळे दुर्लक्षित करून, त्यांना जुजबी मंत्रिपदे देऊन पवारांनी अशा मंडळींना बोलते ठेवले. मात्र आजही पवारांवर तुम्हाला आरोप करता येत नाहीत. कारण ते पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंचा सत्कार करून मोकळे झालेले असतात.

मराठा समाजातील लोक ऍट्रॉसिटीच्या आधारावर दलितांचा वापर करून घेतात, हा त्यांचा नवा शोध त्यांनीच चलनात आणलेल्या जातीय डावपेचांचा एक भाग आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर एकहाती सत्ता मिळविण्याचा वकूब, क्षमता पवारांकडे कधीच नव्हती (त्यांचे भाट कितीही ओरडून सांगत असले तरीही) पण पवारांनी आपल्या गाडीवरचा लाल दिवा कायम ठेवला तो या जातीय समीकरणांच्या आधारावरच. यापूर्वी पवार मुस्लीम तरुणांविषयी बोलले होते, ‘‘मुस्लीम तरुणांची सरकट धरपकड चुकीची’’, ‘‘मुस्लीम तरुणांना अटक केल्यास २४ तासांत कोर्टात हजर करा’’, ‘‘मुस्लीम तरुणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे एटीएसने थांबवावे’’ ही आणि अशी कितीतरी मुस्लीमधार्जिणी विधाने पवारसाहेबांनी केली आहेत. पवार सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहिले आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत ते आज डोस देत असलेले सर्व विषय व्यवस्थित पार पडले आहेत, पण त्यावर पवारांचे काहीही मत नाही. सोईस्कर पद्धतीने ते बोलणार नाहीत. धर्मांध मुसलमान हे जगाच्या डोकेदुखीचे कारण झाले आहेत. ते कुठेही, कोणाबरोबरही सुखाने नांदायला तयार नाहीत. हे पवारांना समजत नाही असे नाही. मुस्लीम विचारवंतांचे सत्कार घडवून आणायचे, त्यांना सन्मानाने वागवायचे, मात्र त्यांच्या कामात बिलकुल मदत करायची नाही असा पवारांचा दुहेरी खाक्या आहे. मुसलमान शहाणे झाले तर एकगठ्ठा मते कशी मिळणार? हा त्यामागचा सरळ अर्थ आहे.

आर्थर रोड आणि येरवड्यात मुस्लीम गुन्हेगारांचे प्रमाण लक्षणीय आहे. पवारांनी त्यासाठी काय केले? मुंबईतील एका वाहतूक पोलिसाने परवाना विचारला म्हणून दोन भावांनी त्या पोलिसाला मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे दोन भाऊ कोणत्या धर्माचे आहेत ? सीएसटीची दंगल कोणी केली होती ? त्यात कुठल्या समाजाचे लोक होते ? पवारसाहेब तेव्हा गप्प का बसले होते? आणि आजवर त्यांनी त्यावर कोणतेही भाष्य का केले नाही? वरची घटना तर कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍याचा खून इतकी सरळ आहे, तरीसुद्धा पवार साहेब म्हणतात की, ’’मुस्लीम तरुणांना टार्गेट करू नका.’’ कोल्हापूरचे महाराज राज्यसभेवर गेल्यावर पवारांचे विधान गाजले होते. ‘पेशव्यांकडून छत्रपतींची नेमणूक...’ वगैरे असे काही ते बरळले होते. हा डाव आपल्याला का खेळता आला नाही, अशी ती मुळात चरफड होती. देवेंद्र फडणवीसांसारखा तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, यापेक्षा तो ब्राह्मण आहे, ही पवारांच्या राजकारणाची खरी पोटदुखी. पश्चिम महाराष्ट्रातले एकेकाळचे सगळेच राजकारण ब्राह्मण द्वेषावर पोसले गेले. दादोजींचा पुतळा लाल महालातून का काढला गेला आणि पवार त्यावेळी काहीच का बोलले नाहीत? रामदास आठवलेंना सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये हेरून मंत्री केल्यानंतर विधान परिषदेचा सदस्य करण्याचा खेळ पवारांनीच खेळला होता, हे कसे विसरता येईल?

कोपर्डीत बलात्कार झाला, मानवतेला काळिमा फासणारी ही घटना. जिच्यावर बलात्कार झाला ती आणि ज्यांनी बलात्कार केले ते, या दोघांचीही जात तपासण्याचे प्रयोजन काय ? गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे आणि पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे एवढाच काय तो विषय. पण शुभ्र पांढरे कपडे घालून इतके गलिच्छ राजकारण करणारा दुसरा माणूस देशाच्या राजकारणात अन्य कुणी नसावा. लोकांनी या बलात्कारी व बलात्कार पीडितेची जात शोधून त्यावर मोर्चे काढले. आता बलात्कार्‍यांच्या जातीचे लोक बलात्कार झालेल्या जातीच्या मुलींना असेच त्रास देणार आणि ऍट्रॉसिटीमुळे त्यांचे काहीही वाकडे होऊ शकणार नाही, असा समज जाणीवपूर्वक पसरवला गेला. लोकांनी मोर्चे काढले आणि मोर्चे निघत असताना पवार ऍट्रॉसिटीबाबत विधानांवर विधाने करीत होते. अशी विधाने करून सगळ्या प्रकरणातून नामानिराळे राहून पवार काय मिळवित होते? यातून दोन समाज एकमेकांविरोधात उभे राहणार की समरस होणार, हे न कळण्याइतके पवार दुधखुळे नक्कीच नाहीत.

जातीच्या राजकारणाच्या विषवेली या अशाच असतात. बलात्कारासारख्या संवेदनशील घटनेच्या वेळीही अशी माणसे या विषवेलींना खतपाणी घालत राहातात, कारण त्यातून सत्तेची फळे चाखायला मिळतात. लोकांचा १०० टक्के विश्र्वास मिळवून सत्तेत येता आले नाही की, असे विषारी डाव खेळले जातात. या गलिच्छ चालींनीच मतांची बेगमी होते. मराठा आरक्षणाला घटनेच्या चौकटीत बसविता येणे अशक्य आहे आणि आरक्षणाच्या मूलभूत संकल्पनेशीच ते विसंगत आहे, हे पवारांना ठाऊक नाही असे नाही; परंतु त्याबाबतही ते अशाच फुसकुल्या सोडत असतात. पुन्हा शाहू महाराजांचे नावही ते जोरजोरात घेऊ शकतात. स्वत: सत्तेत असताना ज्या समस्या म्हणून पवार मांडतायत त्यावर त्यांनी कधीही काहीही केले नाही, पण आता जे सत्तेत आहेत त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढविण्याचा पवारांचा डाव दिसतो. पवारांची अख्खी राजकीय कारकीर्दच अशा विसंगतींनी भरलेली आहे.

गुन्हेगारांचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव वाढला तो पवारांच्या काळातच. पवार-दाऊद संबंधांवरही कमी चर्चा झाल्या नाही. पप्पू कलानी असोत वा आज राजकारणी म्हणून स्थिर झालेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक असोत, हे सगळे पवारांच्या काळातच राजकारणात येऊन स्थिरावले. पवारांनी वास्तवात काय केले हे पूर्णपणे निराळे असले तरी त्यांची ‘प्रोपोगेंडा मशिनरी’ उत्तम चालत असते. इतके करूनही पवार जातीयवादी आहेत, असे मुख्य प्रवाहातले कुठलेही माध्यम म्हणणार नाही. आता हे असे किती काळ चालत राहाणार हेच पाहायचे!

 

 - किरण शेलार

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121