स्वतःची शोभा करून घेणारी डे
Total Views |

स्वतःची शोभा करून घेणे असा मराठीत एक वाक्प्रचार आहे. आपल्या अतीशहाणपणामुळे चारचौघात स्वतःचे हसे करून घेणाऱ्या व्यक्तीसाठी हा वाक्प्रचार हटकून वापरला जातो. शोभा डे ह्या बाष्कळ वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या बाईच्या नावावरूनच बहुधा हा वाक्प्रचार मराठीत रूढ झाला असावा. ह्या शोभाबाई मूळच्या मराठी. त्या स्वतःला लेखिका म्हणवून घेतात. सॉफ्ट पॉर्न ह्या साहित्यप्रकारात मोडणारी बरीच पुस्तके बाईंच्या नावावर आहेत ही गोष्ट खरीच आहे. त्या ज्या दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू भागात राहतात तिथे त्यांना 'सोशलाईट' म्हणूनही ओळखले जाते. आता तुम्ही विचाराल हे 'सोशलाईट' प्रकरण काय आहे? तर 'सोशलाईट' म्हणजे पु लंच्या 'तुझं आहे तुजपाशी' ह्या अजरामर नाटकातल्या अतिविशाल महिलांची इंग्रजी आवृत्ती.
ह्या शोभाबाई लिहितात ती पिवळी पुस्तके आणि वृत्तपत्रीय सदरे कमी पडली म्हणून की काय पण बाई सोशल मीडियावर देखील स्वैर संचार करतात. आधीच मर्कट त्यात मद्य प्याली ही त्यांची सोशल मीडियाचे कोलीत हातात सापडल्यानंतरची त्यांची एकूण परिस्थिती असल्यामुळे, त्यांच्या ट्विटस मधून आचरटपणाचा कळस गाठला जातो. मुळात शोभाबाईंचा असा गोड गैरसमज आहे की त्यांना राजकारणापासून ते अर्थकारणापर्यंत सगळ्या क्षेत्रात गती आहे. अवार्डवापसी असो वा ऑलिंपिक्स, सगळ्या विषयांवर आपल्या मताची एक पिंक ट्विटरद्वारे टाकलीच पाहिजे असा शोभाबाईंचा बाणा. अर्थात ही सगळी ट्विटस सगळ्यात खालच्या दर्जाची कशी होतील ह्यावर शोभा बाईंचा कटाक्ष असतो.
काही वर्षांपूर्वी योगाचार्य अय्यंगार गेले होते तेव्हा त्यांनी, 'अय्यंगार गुरुजी पर्मनन्ट शवासनात गेले' अश्या आशयाची अभिरुचीहीन ट्विट टाकली होती. आता शोभा बाईंचे तोंड आणि त्यांची लेखणी ह्या दोन्ही गोष्टी पर्मनंट पवनमुक्तासनात असल्यामुळे लोकांना त्या ट्विटचे फार आश्चर्य वाटले नाही ती गोष्ट सोडून द्या. आजकाल रिओला ऑलिंपिक गेम्स चालू असल्यामुले शोभाबाईंनी सध्या आपला रोख तिकडे वळवला आहे. काल त्यांनी भारतीय संघातल्या खेळाडूंची खिल्ली उडवणारे एक ट्विट केले होते. 'भारतीय संघाचे ऑलिंपिक गेम्स मधले ध्येय. रिओला जाणे. सेल्फी घेणे. परत येणे. पैश्याचा आणि संधीचा अपव्यय' अश्या अर्थाचे ते ट्विट होते. आता रोज ट्विटरवर येणे, फालतू बडबड करणे, भरभरून शिव्या खाणे आणि घरी परत जाणे हे शोभा डे बाईंचे ध्येय असल्यामुळे साहजिकच ट्विटरवर लोकांनी त्यांना धू, धू धुतले. सिने तारकांबद्दल गॉसिप कॉलम लिहून करियरची सुरवात केल्यामुळे असेल कदाचित, पण शोभा डे बाईंना लोकांच्या शिव्या खायची सवय असल्यामुळे त्यांना ह्याचे काहीच वाटले नाही ही गोष्ट अलाहिदा.
जे खेळाडू दिवसाचे १६ १६ तास सराव करतात, चार वर्षातून एकदा होणाऱ्या ऑलिंपिक गेम्स मध्ये भाग घ्यायची चातकाप्रमाणे वाट बघतात. देशासाठी, स्वतःसाठी रक्ताचे पाणी करून खेळतात त्यांना मात्र ह्या ट्विटचा खूप त्रास झाला. शूटर अभिनव बिंद्रापासून ते माजी हॉकीपटू वीरेन रस्किन्हा पर्यंत सगळ्यांनी शोभा डे ह्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं पण एकूणच स्वतःची शोभा करून देणे हा डे बाईंचा आवडता छंद असल्यामुळे त्यांना ह्याने काहीच फरक पडणार नाही ही गोष्ट वेगळी. काही दिवसानंतर एखादं नवीन सनसनाटी ट्विट घेऊन शोभा बाई आपल्या भेटीला येतीलच.
https://www.mahamtb.com/authors/shefali_vaidya.html
सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.