रिओ ऑलिंपिक्स मध्ये जिम्नॅस्टिक्स ह्या खेळातल्या वोल्ट प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करून त्रिपुराच्या दीपा कर्माकर ह्या मुलीने इतिहास घडवला आहे. मुळात जिम्नॅस्टिक्स हा खेळप्रकार भारतात तेव्हढा लोकप्रिय नाही. ह्या खेळात शरीर अत्यंत लवचिक, चपळ आणि हलकं असावं लागतं. जेवणावर आणि वजनावर कमालीचं नियंत्रण असावं लागतं आणि करावा लागतो अखंड सराव. स्पर्धात्मक दर्जाचं जिम्नॅस्टिक्स करताना आयुष्यातल्या इतर अनेक गोष्टींवर पाणी सोडावं लागतं. अपार मेहनत घ्यावी लागते. दीपा कर्माकरने हे सगळं करून दाखवलं.
भारताच्या ईशान्य भागातल्या छोट्याश्या त्रिपुरा राज्यातली ही मुलगी तिच्या वडिलांच्या इच्छेखातर वयाच्या सहाव्या वर्षी जिम्नॅस्टिक्सचं शिक्षण घ्यायला कोच बसेसर नंदी ह्यांच्याकडे गेली. तिचे वडील SAI, अगरताळा मध्ये वेटलिफ्टिंगचे कोच होते. त्यांची इच्छा होती की मुलीने स्पोर्टसमध्ये करियर करावं, ते ही जिम्नॅस्टिक्स मध्ये. त्रिपुरामध्ये वेटलिफ्टिंग, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग आदी खेळांची मोठी परंपरा आहे, पण जिम्नॅस्टिक्स इथे आणलं ते दिलीप सिंग ह्या हरयाणवी माणसाने. SAI मध्ये जिम्नॅस्टिक्स शिकवण्यासाठी म्हणून दिलीप सिंग त्रिपुरात आले आणि तिथलेच होऊन गेले. त्यांच्या पट्टशिष्यांपैकी एक म्हणजे दीपाचे गुरु बसेसर नंदी.
नंदींकडे दीपा जेव्हा पहिल्यांदा शिकण्यासाठी आली तेव्हा तिच्या पावलांचे तळवे सपाट होते. जिम्नॅस्टिक्स मध्ये 'फ्लॅट फीट' असणं ही एक फार मोठी गैरसोय असते, कारण सतत टाचांवर उभं राहूनच जिम्नॅस्टिक्सचा सराव चालतो, आणि त्यासाठी पावलांमध्ये बाक असणं आवश्यक असतं. दीपाच्या सपाट पावलांमुळे ती ह्या खेळात फार दूरची मजल मारू शकेल असं नंदींना वाटलं नव्हतं, पण दीपाच्या जिद्दीपुढे त्यांचे सारे आडाखे खोटे ठरले. अथक परिश्रम करून दीपा कर्माकरने हा खेळ आत्मसात केला. जिम्नॅस्टिक्स मध्ये सलग तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवल्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स मध्ये दीपाने वोल्ट प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. कुठल्याही भारतीय जिम्नॅस्टने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिंकून घेतलेलं हे पहिलंच पदक. २०१५ मध्ये भरलेल्या जागतिक कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत दीपा पाचवी आली. एप्रिल २०१६ मध्ये तिच्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर तिला रिओ ऑलिंपिक्स मध्ये प्रवेश मिळाला. ऑलिंपिक्स मध्ये भाग घेणारी दीपा कर्माकर ही पहिलीच भारतीय स्त्री खेळाडू.
मिळालेल्या ह्या दुर्मिळ आणि अपूर्व संधीचं दीपाने सोनं केलं. प्रोडुनोव्हा ह्या अत्यंत कठीण वोल्ट प्रकारात १४.८५० गुणांची कमाई करत दीपाने आपल्या गटात सहावे स्थान पटकावले व अंतिम फेरीतले आपले स्थान नक्की केले. तिच्या ह्या दैदिप्यमान यशामुळे भारतीय जनतेचा जिम्नॅस्टिक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल ह्यात शंका नाही. दीपाच्या स्पर्धेची अंतिम फेरी १४ ऑगस्टला होणार आहे. दीपा कर्माकरला त्या दिवशी पदक मिळाले तर भारताला स्वातंत्र्यदिनाची एक अनोखी आणि ह्याआधी कधीही न मिळालेली भेट मिळेल. आज नऊ ऑगस्ट ह्या दिवशी दीपा कर्माकरचा वाढदिवस आहे. तिची कामगिरी अशीच चमकदार होवो आणि तिला सुवर्णपदक मिळो ह्या करोडो भारतीयांनी तिला दिलेल्या शुभेच्छा तिच्याबरोबर ह्या दिवशी आणि पुढेही कायम असतीलच.
व्हिडीओ सौजन्य : बीबीसी
Waqf Amendment Bill वरून कट्टरपंथीयांनी पोलिसांवर केली दगडफेक, रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न..