हेल्मेट सक्ती म्हंजी काय रे भाऊ?
Total Views | 1
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात परत हेल्मेट सक्तीचे वारे सुरु झाले होते. नो हेल्मेट नो पेट्रोल सारखा नियम लागू करण्यात येणार होता. मात्र पेट्रोलपंप चालकांच्या संपाच्या भितीमुळे सरकारने हा निर्णय आज मागे घेतला. आणि या प्रश्नाला वेगळी दिशा मिळाली.
खरं तर हेल्मेट घालणे हा सक्तीचा विषय नाहीच मुळी. स्वत:च्या जीवाची किती काळजी करावी हे प्रत्येकाला ज्याचे त्याचे समजायले हवे. परंतु ते समजत नसल्यास राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्तीचा नियम केला तर त्यात चुकीचे काय? असाही प्रश्न उद्भवतो. या बद्दल सरकारची नवीन भूमिका देखील पटण्यासारखी आहे. पेट्रोलपंप चालकांनी नो हेल्मेट नो पेट्रोल या नियमाला विरोध केल्यावर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने वेगळीच भूमिका घेतली. ‘आता केवळ हेल्मेट न घातलेल्या चालकांचा गाडी नंबर आरटीओ ला द्या’ असा आदेश सरकारने पेट्रोलपंप चालकांना दिला आहे. मात्र हे काम देखील सोपे नाही. आणि या आदेशाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास परत सरकारच्या धोरणांना नावं ठेवायला लोक मोकळेच.
भारतातले बरेच कायदे हे पाश्चिमात्य देशांतून उचललेले आहेत असे म्हटले जाते. मात्र त्या कायद्यांमागची कारण मिमांसा आपण संजून घेत नाही. उदाहरणार्थ चारचाकी गाडी चालवताना चालकाने सीट बेल्ट लावावा. हा भारतातील एक नियम आहे. (कितपत पाळल्या जातो यात शंका आहे.) मात्र त्यासाठी ठरवण्यात आलेल्या गतीने आपल्या येथील मेट्रो सिटीझ मध्ये गाडी चालवणे शक्य आहे का? हा प्रश्न आहे. याचा अर्थ नियम चुकीचा आहे का? तर नक्कीच नाही. नियम अगदी बरोबर आहे. मात्र आपल्या इथे तो एप्लिकेबल आहे का? हा प्रश्न विचारणीय आहे. तसेच हेल्मेटचे आहे. हेल्मेट लावल्यानंतर आपल्या येथील वाहतुक कोंडीत अडकल्यावर त्रास होतो. सतत असलेल्या वाहतुक कोंडी मुळे मानेचे विकार वगेरे उद्भवतात. ही कारणेही या सक्तीचा विरोध करण्यासाठी योग्य आणि पुरेशी आहेत. मात्र त्या बरोबरच आपल्या येथील वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची परिस्थिती आणि इतर गोष्टी बघता हेल्मेट सक्तीला विरोध करणे पूर्णपणे योग्य ठरत नाही.
मात्र पहिला प्रश्न हा उद्भवतो हेल्मेट सक्तीची आवश्यकता का ?
आपल्या जीवाची काळजी प्रत्येका व्यक्तिला असलीच पाहिजे. त्यामुळे हेल्मेट हे अत्यावश्यक आहे. परंतु एखाद्या गोष्टीची सक्ती केल्यास त्या गोष्टीचा हमखास विरोध केला जातो हे ही तितकेच खरे आहे. त्यामुळे हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी त्याची सक्ती करणे हा एकमात्र उपाय नाही. बरेचदा व्यक्ति आपल्या किंवा इतरांच्या अनुभवांवरुन शिकतो. कालच आलेल्या अनुभवाने ‘हेलमेट वापरलेच पाहिजे’ असा माझा निर्धार झालेला आहे. ऑफिसला जात असताना काहीही कल्पना नसताना अचानक एका झाडाची भली मोठी फांदी माझ्या डोक्यावर पडली. दोन क्षण डोळ्यांसमोर अंधारी आली. आणि नंतर माणसात आल्यावर ती फांदी पाहून आपण जिवंत कसे? असा प्रश्न मला पडला. त्याचं एकमेव उत्तर म्हणजे मी घातलेलं हेल्मेट. या हेल्मेट मुळे माझा जीव वाचला. घटना खूप मोठी नव्हती मात्र हेल्मेट नसतं तर जीवावर बेतलं असतं हे खरं.
म्हणूनच हेल्मेट सक्ती करावी की नाही? हा प्रश्न विवादास्पद आहे. मात्र हेल्मेट वापरावं का? हे विचारल्यास उत्तर आहे. हो नक्कीच. कारण आपला जीव केवळ आपल्यासाठी नाही तर आपल्या परिवारासाठी जास्त महत्वाचा आहे. आपल्या जीवाची किंमत कधीही आपल्या पेक्षा ज्यांचे आपल्यावर प्रेम आहे त्यांना जास्त असते. त्यांचे जगणे आपल्यावर अवलंबून असते. मग ते आपले आई वडील असू देत, नवरा बायको, मुलं असू देत नाहीतर इतर कोणी. मात्र यामुळे ज्यांचा जीव आपल्यावर अवलंबून आहे त्यांच्या साठी तरी किमान आपली काळजी घेतली पाहिजे.
सक्तीने, मारुन मुटकुन एखादी गोष्ट कदाचित करुन घेता येत नसेल. पण प्रत्येक व्यक्ति आलेल्या अनुभवातून वाचेलच असे नाही. त्यामुळे स्वत:च्या जीवाची काळजी असेल तर नक्कीच हेल्मेटचा वापर करावा. अन्यथा ‘हेल्मेट सक्ती मंजी काय रे भाऊ’? असा प्रश्न विचारुन पोलिसांच्या डोळ्यात न येता सटकून घ्यावं. दंड बसेल की नाही या पेक्षा किती काळ पळत राहवं लागेल हे महत्वाचं त्यामुळे याचा विचार ज्याने त्याने करावा.
https://www.mahamtb.com/authors/niharika_pole.html
रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.