"आबा, आईने तुमच्यासाठी खीर दिली आहे.", पिशवीतून खिरीचा डबा काढत सुमित म्हणाला. "काहीपण असतं आईचं! खीर काय? सांडली असती माझ्या सॅक मध्ये!"
"तुझ्या आबांना आवडते म्हणून ती प्रेमाने पाठवते रे!"
"प्रेम म्हणे! माझ्या सॅक मधल्या Investment proofs खराब झाल्या असत्या म्हणजे?”
“So it is that time of the year! परीक्षा, प्रगति पुस्तक आणि Income Tax!"
"हो ना!” वैतागून सुमित म्हणाला.
"ही सगळी कामं, आकाशातील एक घटना चालवते असे म्हणले तर?”
"आबा, जरा पटेल असं सांगा!"
“सूर्य मीन राशीत गेला, की किती जण मान पाठ एक करून कामे करतात. अभ्यास करतात. जागरणे करतात. चहाचे कप रिचवतात. या काळात नेमाने पित्त होणारे पैशाला पसाभर मिळतील!”
"सूर्य मीन राशीत गेल्यामुळे?!"
"अर्थात! आणखीन झालंच तर, सूर्य मेष राशीत गेला की, Appraisals होतात, पगार वाढतात! इतकंच काय? सूर्य कोणत्याही राशीच्या मध्यावर गेला की पगार होतात!”
सुमितचे मोठे डोळे आणि वर गेलेल्या भुवया पाहून, हसू आवरत, आबांनी सांगितले - "सुम्या, आपण जरी एप्रिल मध्ये अमुक event आणि मार्च मध्ये तमुक event असं म्हणलं, तरी एप्रिल आणि मार्च महिने सूर्याच्या आकाशातील स्थानावर अवलंबून आहेत. १४ मार्चला सूर्य मीन राशीत जातो. आणि तेंव्हाच सगळ्यांची अभ्यासाची, परीक्षेची, Year End ची धांदल सुरु होते.”
"आपण जे Gregorian calendar वापरतो, ते सूर्या प्रमाणे चालते, आणि म्हणून आपली मासिक व वार्षिक कामे सूर्याच्या तालावर नाचतात!" सुमितने सार सांगितले.
"सत्य आहे! पृथ्वीवरून पाहतांना, सूर्याला १२ राशीतून फिरायला एक वर्ष लागते. रोज साधारण १ - १ अंश सरकत एक वर्षात सूर्याचा ३६० अंशांचा प्रवास पूर्ण होत. प्रत्येक राशीत साधारण ३० दिवस. असे एक वर्षात ३० दिवसांचे १२ महिने.
“एका वर्षाचे ३६५.२४२५ दिवस - वरचा ०.२५ दिवस साठत जाऊन, चार वर्षांनी त्याचा एक दिवस होतो. तो अधिक दिवस लीप वर्षात घेतला जातो. ०.२४२५ व ०.२५ मधील फरक adjust करायला, ४ पैकी एकच शतकी वर्ष लीप वर्ष असतं.” आबांनी सूर्याप्रमाणे चालणाऱ्या व सर्वत्र वापरले जाणाऱ्या ग्रेगोरियन कॅलेंडरची माहिती दिली.
“शाळेत असतांना शिकलेलं आठवतंय. १५८२ मध्ये पोप ग्रेगरीने आधीच्या जुलिअन कॅलेंडर मध्ये सुधारणा करून हे कॅलेंडर तयार केलं. ते भारतात १८२५ पासून वापरात आले. त्याआधीच्या तारखा जुलिअन कॅलेंडर प्रमाणे असल्याने इतिहासकारांत भांडणे लागायला कारण मिळाले! जसे जुलिअन कॅलेंडर प्रमाणे शिवाजी महाराजांची जन्मतारीख १९ फेब्रुवारी १६३० आहे, तर ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे १ मार्च १६३०!
“ते असो! पण आबा ग्रेगोरियन कॅलेंडर सर्वात अचूक कॅलेंडर आहे, असे ऐकलंय. खरं का?" सुमिचा प्रश्न.
“ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये २७ सेकंदांची चूक आहे. म्हणजे दर ३००० वर्षांनी एका दिवसाने चुकणार. शिवाय पृथ्वीची सूर्याभोवती फिरायची गती बदलती आहे. त्यामुळे सध्या उत्तर गोलार्धात, थंडीपेक्षा उन्हाळा ५ दिवसांनी मोठा आहे. ही गती ग्रेगोरियन कॅलेंडरने विचारात घेतलेली नाही. महिन्यांच्या नावांना अर्थ नाही. प्रत्येक quarter मध्ये सम दिवस नाहीत. अशा अनेक त्रुटी या कॅलेंडर मध्ये आहेत. हे कॅलेंडर सूर्याप्रमाणे चालण्यापेक्षा सूर्याबरोबर चालायला धडपडणारे आहे.”
"आबा, मग अगदी सूर्य प्रमाणे चालणारे कॅलेंडर आहेत का?" इति सुमित.
“आहेत तर! त्यातले एक आहे भारताचे सौर कॅलेंडर. सूर्याच्या आकाशातील हालचालींवर आधारलेले हे कॅलेंडर सूर्य, पृथ्वी, राशी, ऋतू या सर्वांची सांगड घालते. पण त्या बद्दल पुढे बोलू. आता तुझ्या आईने पाठवलेल्या खिरीचा आस्वाद घेऊ!” दुर्गाबाईंनी आणलेली खिरीची वाटी घेत आबा म्हणाले.
* वरील तारखा Sidereal (observable) अथवा निरायन पद्धतीने दिल्या आहेत.
** शिवाजी महाराजांची जन्म तारीख - http://www.drikpanchang.com/calendars/indian/jayanti/shivaji/chhatrapati-shivaji-jayanti.html
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..