इंग्रजी मध्ये 'मिडिया हिट-जॉब' नावाचा एक वाक्प्रचार आहे. 'मिडिया हिट-जॉब' म्हणजे एखादया व्यक्तीची बदनामी करण्यासाठी म्हणून मुद्दामहून पसरवलेली खोडसाळ, खोटी किंवा जाणून बुजून दिशाभूल करणारी बातमी पसरवणे.मोदी सरकारमधले जे काही मंत्री ह्या अश्या 'मिडिया हिट-जॉब'चे सतत शिकार झालेले आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी.
स्मृती इराणी ह्या स्वतःच्या कर्तृवावर मोठ्या झालेल्या आहेत. राजकारणात प्रवेश करायच्या आधी त्या अभिनेत्री होत्या.राजकारण हा त्यांचा वंशपरंपरागत 'धंदा' नाहीये. त्या अत्यंत आक्रमक आहेत, चांगल्या वक्त्या आहेत आणि कुठल्याही वादात त्या एकदा पडल्या तर सहजासहजी माघार घेत नाहीत. त्यांच्या बरखा दत्त आणि राजदीप सरदेसाई ह्यांनी घेतलेल्या मुलाखती बघितल्या तर कुणाच्याही हे सहज लक्षात येईल की स्मृती इराणी नेहमी जशास तसे बोलतात आणि विचारलेल्या प्रश्नांना आक्रमकपणे भिडतात. ह्याच त्यांच्या 'गुणा'मुळे काही स्वघोषित पुरोगामी पत्रकार त्यांचा मनःपूर्वक तिटकारा करतात.
विशेषतः काँग्रेस पक्षाशी ज्यांचे लागेबांधे आहेत असे पत्रकार तर कायम स्मृती इराणी ह्यांना पाण्यात पहात आलेले आहेत. काँग्रेसचे खासदार संजय निरुपम ह्यांनी एकदा स्मृती इराणी ह्यांच्याबद्दल बोलताना. 'आप तो पैसे की लिये टीव्ही पे ठुमके लगाती थीं' ह्या अपमानास्पद शब्दात त्यांच्या अभिनेत्री असण्याचा उल्लेख करून स्वतःची पातळी किती खाली आहे हे दाखवून दिले होते. काँग्रेसच्या राजवटीत सत्तेचा कृपाप्रसाद मिळालेले काही पत्रकारही इराणी ह्यांच्याबाबत तोच कित्ता गिरवत आहेत. राजदीप सरदेसाई हे त्यापैकीच एक.
काल इंडिया संवाद नावाच्या एका डिजिटल वृत्तसंस्थेने एक बातमी प्रसिद्ध केली, त्यात 'अनामिक सूत्रांचा' हवाला देऊन असं म्हटलं होतं की वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीखाली येणाऱ्या कॉटेज एम्पोरीयम ह्या शोरूमची पाहणी करायला म्हणून गेलेल्या स्मृती इराणीनी तिथून आठ लाख रुपयांच्या साड्या व एक गणेश मूर्ती खरेदी केली आणि ते बिल वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे पाठवले. ते बिल वैयक्तिक असल्याचे सांगून वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा ह्यांनी ते बिल चुकते करायला नकार दिला. अर्थात ह्या बातमीला पुरावा म्हणून कागदपत्र वगैरे काहीच दिले नव्हते.
लगेचच राजदीप सरदेसाई ह्यांनी ह्या बातमीवर ट्विट केले.
कॉंग्रेसच्या प्रवक्त्या कुणी प्रियांका चतुर्वेदी नावाच्या बाई आहेत, त्या नेहमी अश्या खोट्या बातम्या पसरवण्याच्या कामात आघाडीवर असतात. त्यांनीही लगेच ही बातमी पसरवली, पण बातमी खरी किंवा खोटी हे जाणून घेण्याची तसदी मात्र कुणीही घेतली नाही. केवळ स्मृती इराणी ह्यांना बदनाम करण्यासाठी म्हणून पद्धतशीरपणे ही तद्दन खोटी बातमी पसरवण्यात आली.
कॉटेज एम्पोरीयमने आपल्या अधिकृत लेटरहेडवर पत्र लिहून खुलासा केला की स्मृती इराणी ह्यांनी साड्या किंवा मूर्ती ह्यापैकी एकही गोष्ट कॉटेज एम्पोरीयममधून खरेदी केलेली नव्हती त्यामुळे बिल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव, रश्मी वर्मा ह्यांनीही खुलासा केला की त्यांच्याकडे कॉटेज एम्पोरीयमकडून कुठलेही बिल आलेले नाही, त्यामुळे ते बिल चुकते करण्याचा प्रश्नच येत नाही. इंडिया संवादने पसरवलेली ही बातमी तद्दन खोटी आणि खोडसाळ आहे.
हा खुलासा प्रसिद्ध झाल्यानंतर इंडिया संवादने मान्य केलं की त्यांची बातमी चुकीची होती. प्रियांका चतुर्वेदी ह्यांनीही मान्य केलं की त्यांची चूक झाली, पण सरदेसाई सर्वज्ञ पत्रकार असल्यामुळे त्यांनी चूक मान्य वगैरे करायचे कष्ट घेतले नाहीत, फक्त आपलं ट्विट मात्र त्यांनी हळूच डिलीट करून टाकलं.
महाराष्ट्रात एक 'लोकमान्य, लोकशक्ती' वगैरे बिरुदे अभिमानाने मिरवणारे एक वृत्तपत्र आहे. त्याच्या संपादकांना'सगळं काही समजतं' असा त्यांचा एक स्वतःबद्दलचा समज आहे. ते लगेच दुसऱ्या दिवशी आपला अग्रलेख परत वगैरे घेतात. 'इराणींच्या आठ लाखांच्या साड्यांचे बिल देण्यास वस्त्रोद्योग मंत्रालयाचा नकार' ह्या सनसनाटी मथळ्याखाली ही बातमी त्यांनीही छापली, पण बातमी चुकीची आणि खोटी आहे हे सत्य उघड झाल्यानंतरही त्यांनी ही बातमी मागे घ्यायचे सौजन्य आणि प्रामाणिकपणा दाखवला नाही. फक्त 'वस्त्रोद्योग मंत्रालयाने मात्र अशी खरेदी करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे' ही एवढी एक ओळ कुठेतरी खाली टाकून त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकून टाकली.
बरोबरच आहे म्हणा, 'असंतांचे संत' केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पण 'संतांचे असंत' करून दाखवणे हा मात्र त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कुबेराघरचे वैचारिक दारिद्र्य म्हणतात ते असे असते!