कायदा आणि विवेकबुद्धी

    25-Aug-2016   
Total Views |

रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आग्रा येथे केलेल्या एका विधानावरून देशभरातील सर्व वृत्तवाहिन्यांवर एक दिवसाचे वादंग उसळले. वास्तविक पाहता, सरसंघचालकांनी ‘हिंदूंपेक्षा मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे’ यासंदर्भातील प्रश्नाला हलक्या-फुलक्या शैलीत उत्तर देताना ‘कोणत्या कायद्याने हिंदूंना लोकसंख्या वाढविण्यास प्रतिबंध केला आहे?’ असा प्रतिप्रश्न केला. पंतप्रधान मोदी यांनी अर्णब गोस्वामी यांना मुलाखत देत असताना ‘‘केलेल्या विनोदाचा प्रसारमाध्यमे जो विपरीत अर्थ काढतात, त्यामुळे सार्वजनिक जीवनातील विनोदबुद्धी कमी झाली आहे,’’ असे विधान केले होते. या विधानावरची चर्चा ऐकत असताना मोदी यांच्या या विधानाचा क्षणोक्षणी प्रत्यय येत होता.

वास्तविक पाहता, एखाद्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात उत्तर देत असताना वापरलेले शब्द हे त्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाच्या वातावरणावरून ठरत असतात. त्याचा संदर्भ लक्षात न घेता, त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. येथे तर मोहनजी यांना अभिप्रेत नसलेला निष्कर्ष काढून त्याची चर्चा केली आहे. मूळ मुद्दा हिंदू आणि मुस्लीमयांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जो बदल होत आहे, त्याचे समाजशास्त्रीय, राजकीय व अन्य परिणामकोणते होणार आहेत आणि त्यांचे निराकरण कसे करायचे? हा आहे. हा मुख्य मुद्दा दुर्लक्षून भलत्याच विषयावर चर्चेची गाडी नेण्याचा प्रयत्न अनेक वाहिन्यांनी केला. भारताची फाळणी धार्मिक लोकसंख्येच्या आधारावर झालेली असल्याने लोकसंख्येचे प्रमाण हा भारताच्या संदर्भातील अजूनही संवेदनशील मुद्दा आहे. स्वातंत्र्य मिळत असताना हिंदू आणि मुस्लीमयांचे एकत्रित प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ९४ टक्के होते. २०११ साली त्यांचे एकत्रित प्रमाण तेवढेच राहिले असले, तरी हिंदू आणि मुसलमान यांचे मात्र परस्परांचे प्रमाण बदलले आहे. हिंदूंच्या लोकसंख्येत सव्वाचारहून अधिक टक्क्यांची घट झालेली आहे. तेवढीच मुस्लिमांच्या संख्येत वाढ झालेली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कुटुंब नियोजनाची प्रचारमोहीमहाती घेण्यात आली आणि हिंदू समाजावर तिचा मोठा परिणामझाला; परंतु तो त्याच प्रमाणात मुस्लीमसमाजावर झाला नाही. आणीबाणीच्या काळात नसबंदीच्या सक्तीमुळे जो असंतोष उफाळून आला, त्यामुळे सरकारी प्रचार योजनेतून ‘कुटुंब नियोजन’ हा विषय जवळजवळ बादच झाला आणि कुटुंब नियोजन मंत्रालयाने ‘कुटुंब कल्याण’ हे नवे नाव धारण केले. आजवरचा अनुभव असा आहे की, समाज जसजसा सुशिक्षित आणि समृद्ध होत जातो, तसतसे लोकसंख्येचे प्रमाण कमी होत जाते. युरोपियन देशात आणि जपानमध्ये घटत्या लोकसंख्येचा प्रश्न उभा राहिला आहे. त्याची वेगळ्या प्रकारे कारणमीमांसा करावी लागेल. आधुनिक शिक्षणाबरोबर विवेकवादाचीही जोपासना होते, हे याचे एक महत्त्वाचे कारण आहे. हिंदूंमध्ये गेल्या २०० वर्षांत प्रबोधनाची एक सातत्याने चालणारी परंपरा आहे. त्या परंपरेमुळे आपली पुढची पिढी अधिक सक्षमकरायची असेल, तर तिच्यावर खर्च करण्याकरिता आपल्या हाती किती साधन-सुविधा आहेत, याचा विचार करण्याची प्रक्रिया हिंदू मध्यमवर्गीयांत रुजली आणि ती हळूहळू समाजाच्या सर्व थरांत पाझरत गेली. हिंदू समाजाला लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा लागला नाही. आज काही राज्यांत निवडणुका लढविण्यासाठी दोनपेक्षा अधिक मुले नको, अशी अट घालण्यात आलेली आहे. परंतु, या अशा प्रकारच्या अटी अथवा कायद्यांमुळे हिंदू कुटुंबात नियोजनाची परंपरा रुजली असे म्हणणे अनुभवाला धरून होणार नाही. परंतु, मुस्लीमसमाजात हा विवेकवादी दृष्टिकोन न रुजल्यामुळे केवळ लोकसंख्यावाढीचाच नव्हे, तर त्याचबरोबर धार्मिक कडवटपणा आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद यांचीही बीजे रुजली गेली आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करता मुस्लीमसमाजात अधिक मोठ्या प्रमाणात गुन्हेगार निर्माण होतात, याचीही आकडेवारी प्रकाशित झालेली आहे. जर मुलांची सर्वार्थाने काळजी घेण्याची आर्थिक क्षमता नसेल, तर गुन्हेगारीचे विश्व अशांना स्वाभाविकच आकर्षित करते. ‘होणारी मुले ही ईश्वराची देणगी आहे’ ही परंपरावादी धार्मिक संकल्पना झाली, तर आपल्या साधनसामग्रीचा विचार करून नव्या पिढीला जन्मद्यावा ही विवेकवादी आधुनिक संकल्पना आहे. आम्हाला हिंदूंच्या बरोबर राहायचे नाही असे म्हणून पाकिस्तान स्वतंत्र झाला. आज पाकिस्तानमध्ये दहशतवादाने थैमान मांडले आहे. भारतातील मुस्लीमदहशतवादाचे विश्लेषण करत असताना डावे व सेक्युलर विचारवंत गुजरात व बाबरी मशिदीचा विध्वंस याची प्रतिक्रिया म्हणून हा दहशतवाद बळावला, असे सांगत आहेत. पाकिस्तानमध्ये अन्य मुस्लीमपंथीयांशी लढताना असे कोणते कारण घडले आहे की, त्यामुळे शिया, उदारमतवादी मुस्लीमनेते व विचारवंत आणि अन्य मुस्लीमपंथीय यांच्या विरोधात दहशतवादी कारवाया व्हाव्यात? मुस्लीमसमाजात धार्मिक परंपरानिष्ठ विचारांवर विवेकबुद्धीने मात करावी, अशी परंपरा अजून निर्माण झालेली नाही, हे त्याचे प्रमुख कारण आहे.

    हिंदू समाजातही प्रक्रिया सोपी नव्हती. परंतु, सतीची चाल अशांसारख्या अमानुष चालींना कायद्याने बंदी घालण्याचे साहस त्या वेळच्या ब्रिटिश राजवटीने दाखविले. वास्तविक पाहता, धार्मिक बाबींना हात घातल्यास त्याची प्रतिक्रिया काय उमटू शकते याचा अनुभव १८५७ साली ब्रिटिशांनी घेतला होता, तरीही त्यांनी सतीप्रथेची बंदी यासारख्या अनेक अमानुष धार्मिक परंपरांच्या विरोधात कायदे करण्याचे धाडस दाखविले आणि हिंदू समाजातील सुधारणावादी प्रक्रियेला चालना दिली. अर्थात, हे घडण्याआधी हिंदू समाजामध्ये सुधारणावादाचा पुरस्कार करणारा एक वर्ग निर्माण झाला होता. वास्तविक पाहता, स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी मुस्लीमसमाजात विवेकवाद रुजविण्याचा प्रयत्न केला असता, तर आज इस्लामी दहशतवादाचा किंवा लोकसंख्येचे संतुलन बिघडण्याचा प्रश्नही अस्तित्वात राहिला नसता. हमीद दलवाई हे समाजवादी आणि शरद पवार यांचे चांगले मित्र. परंतु, त्यांचे विवेकवादी विचार बाजूला ठेवून त्यांची मैत्री यांनी जपली. विवेकवादी मुस्लीमगटाला पाठिंबा देण्यापेक्षा मुस्लिमांच्या मनामध्ये हिंदू जातीयवादाची भीती उत्पन्न करून मते मिळविण्याचे राजकारण कॉंग्रेसने आणि स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणविणार्‍या लोकांनी केले. त्यातून हे सर्व प्रश्न आज निर्माण झाले आहेत. कर्नल गडाफीसारखे लोक ‘अणुबॉम्बपेक्षाही गर्भाशयांचा प्रभावी वापर करून जग इस्लाममय करू’ अशी भाषा बोलत असत. कर्नल गडाफी आज नसला, तरी त्याचा विचार आणि भाषा अजूनही संपलेली नाही. वास्तविक पाहता, मुस्लीमसमाजात विवेकबुद्धीचे जागरण न झाल्याने त्याचा इतर समाजाला जेवढा त्रास होतो, त्यापेक्षा अधिक त्रास इस्लामी समाजालाच होतो हे विविध इस्लामी देशांत आणि गटांत जी यादवी माजलेली आहे, त्यावरून लक्षात येते. शांततामय सहजीवनाचे समाजावर विवेकबुद्धीचा प्रभाव असणे गरजेचे असते. त्यामुळेच राजकीय मतभेद पराकोटीचे असतानाही भारतीय संसद ‘जीएसटी‘सारखा कायदा सर्वपक्षीय सहमतीने मंजूर करू शकते. हिंदू समाजावर विवेकबुद्धी जागरणाची जी परंपरा निर्माण झाली, त्यातूनच हे घडले आहे. लोकसंख्यावाढीच्या प्रश्नावर या मुद्द्यावर अधिक चर्चा झाली असती, तर ती देशाच्या, हिंदू समाजाच्या आणि मुस्लीमसमाजाच्याही हिताच्या दृष्टीने अधिक फलदायी झाली असती. परंतु, अशी चर्चा घडविण्यापेक्षा संघाची मध्ययुगीन परंपरावादी फसवी प्रतिमा रंगविण्यातच प्रसारमाध्यमांना अधिक रस आहे. परंतु, न फसण्याइतका समाज जागृत झाला आहे. अशा चर्चांतून प्रसारमाध्यमेच स्वतःची फसवणूक करून घेत आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल तेव्हाची ती सुधारण्याची थोडीफार अपेक्षा ठेवता येईल. 

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय. 

अग्रलेख
जरुर वाचा
बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121