#एकधागासुखाचा...शिबोरी...

    24-Aug-2016
Total Views |

शिबोरी. आपल्याकडे गुजरात-राजस्थान मध्ये बांधणी किंवा बंधेज हा कपडे रंगवण्याचा प्रकार असतो त्याची ही किंचित नाक वर असलेली, थोडीशी शिष्ट अशी जपानी चुलत-चुलत बहिण.

बांधणीमध्ये दोन प्रकार असतात, लेहरिया म्हणजे समुद्राच्या लाटांसारखा रंगवलेला कपडा. लेहरिया मध्ये कोरा कपडा ठराविक अंतर सोडून जाड सुताने घट्ट बांधतात आणि मग त्याला रंग देतात. जिथे जिथे सूत घट्ट आवळून बांधलेलं असतं तिथे तिथे कपड्यावर रंग चढत नाही. असा रंगवलेला कपडा मग सावलीत वाळवून त्याची सुतं सोडली की कपड्यावर सुंदर लहरी तयार होतात.

दुसरा प्रकार म्हणजे बांधणी. ह्या प्रकारात कपड्यावर विविध आकारांचे मणी विशिष्ट डिझाईनमध्ये घट्ट आवळून बांधले जातात किंवा नुसतंच सूत वेगवेगळ्या वर्तुळाकार डिझाईन्स मध्ये कपड्यावर घट्ट बांधलं जातं. कपडा मग रंगवला जातो आणि सावलीत वाळवून धागे सोडले जातात. एकापेक्षा अधिक रंगात कपडा रंगवताना फिका रंग पहिला चढवला जातो आणि मग गडद.

शिबोरी ही देखील अशीच रेसिस्ट डाईंग ह्या प्रकारात मोडणारी पद्धत. खूप शतकं जुनी. अगदी आठव्या शतकापासूनचे शिबोरी केलेले कपडे जपान मध्ये सापडलेत. शिबोरीच्याही अनेक पद्धती आहेत. कानोको शिबोरी म्हणजे आपल्याकडचा लेहरिया.

कुमो शिबोरी म्हणजे कपडा नुसता कसातरी एकत्र करून धागे न बांधता ठराविक पद्धतीचे ओरिगामी फोल्ड्स कपड्याला देऊन मगच धागे बांधायचे. असा कपडा रंगवला की धागा सोडल्यानंतरचे डिझाईन्स वेगळे, भूमितीच्या जास्त जवळपास जाणारे दिसतात.

तिसरा प्रकार म्हणजे नुई शिबोरी किंवा 'शिवलेली शिबोरी'. या प्रकारात आधी कपड्यावर हवे ते डिझाईन्स हलक्या हाताने ट्रेस केले जातात आणि मग मोठी सुई आणि धागा घेऊन ह्या डिझाईन्सवर साधा धाव दोरा मारला जातो. सगळ्या आकृत्या शिवून झाल्या की प्रत्येक आकृतीचा धागा वेगवेगळा ओढून एकदम घट्ट आवळून बांधला जातो. हे फार किचकट आणि नजाकतीचं काम आहे. त्यानंतर कपडा रंगवला जातो. सावलीत वाळल्यानंतर प्रत्येक आकृतीचा वेगवेगळा बांधलेला धागा हलक्या हाताने, कपडा न फाडता एकेक करून सोडवला जातो. नुई शिबोरीमध्ये अगदी बारीक, नाजूक काम देखील करता येतं. धागा आणि सुई किती जाड वापरली आहे आणि धागे किती घट्ट आवळून घेतलेले आहेत ह्यावर डिझाईनची नजाकत आणि कपड्याची किंमत ठरते. रेशमी कपड्यावर केलेली शिबोरी खूप उठून दिसते. नुई शिबोरी करायला खूप वेळ लागतो.

मी जी साडी नेसलेली आहे ती नुई शिबोरी प्रकारातली आहे. दोन पानं ही आकृती घेऊन धाव दोरे टाकलेले आहेत. पदर आणि काठ मात्र कुमो शिबोरीचे म्हणजे फोल्ड करून मग धागा बांधलेला आहे. कपडा रंगवताना नेहमीच फिका रंग आधी आणि गडद रंग नंतर अश्या पद्धतीने रंगवले जातात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121