#रिओमधून...भारताची कामगिरी चांगली झाली…

    22-Aug-2016
Total Views |

अगदी बरोबर वाचलतं. खरचं भारताची कामगिरी चांगली झालीय. मी तिरसटपणे हे लिहलेलं नाही, उलट मी रिओ ऑलिम्पिक जवळून पाहिलंय म्हणून छातीठोकपणे हे सांगतोय. हा आता कामगिरी ही मेडलच्याच संख्येच्या जोरावर मोजायची असेल तर चित्र काहीसं वेगळ असेल. पण ऑलिम्पिकचा जनक बॅरेन दी पिअर कुबर्तिननं म्हणायचा की ऑलिम्पिकमध्ये हार जीतपेक्षाही महत्वाचे असते ती तुम्ही लढत कशी दिली याला… या निकषावर भारताची कामगिरी खरचं चांगली झालीय. लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत, होय मी पुर्ण शुद्धीवर राहुन लिहतोय. लंडन ऑलिम्पिकमध्ये आपल्याला २ सिल्व्हर आणि ४ ब्राँझ मेडल मिळाली होती. यंदा ही संख्या रोडावून 1 सिल्वहर आणि 1 ब्राँझ  मेडल मिळालंय. आणि तरीही मी म्हणतोय की कामगिरी चांगली झालीय.

सुरुवात करुया दीप कर्माकरपासून. त्रिपुरा सारख्या दुर्गम भागातून ही मुलगी जिम्नॅस्टिकसारका खेळ निवडते काय आणि चक्क रिओत ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडकते काय… सगळं अविश्वसनीय. शेवटच्या दोन खेळाडूंचा प्रयत्न व्हायच्या आधी दीपाची कामगिरी सिल्व्हर मेडल मिळवून देणारी होती. पण त्या दोन्ही खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी नोंदविल्यामुळे दीपाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्या दोन खेळाडूंपैकी एक होती अमेरिकेची बिल सिमोन्स, जीनं रिओत चार गोल्डमेडल जिंकलेत आणि दुसरी होती रशियाची मारेका पासिका, जिनं लंडन ऑलिम्पिकमध्ये टिमचं सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. या सगळ्या खेलाडूंना दीपिकांन तोडीस तोड जवाब दिला होता. चौथ्या क्रमांकावर येऊनही तमाम जगताचं हृदय तीनं जिंकलं. कारण जगातील सगळ्यात अवघड असा पोनुरोव्हा हा व्हॉल्ट ती करते. रशियाच्या एलेना पोनुरोव्हा या खेळाडूच्या नावावरून  या व्हॉल्टला पोनुरोव्हा व्हॉल्ड म्हणून ओळखलं जातं. समोरच्या दिशेनं तीन कोलांट्या उड्या यात मारावं लागतं. खेळाडू मानेवर पडून त्याला गंभर दुखापत होऊ शकते यासाठी यावर बंदी घालावी यासाठीही प्रचार झाला… ऑलिम्पिकमध्ये केवळ पाच जणांनी आजवर हा व्हॉल्ट केलाय. त्यापैकी एक दीपा… आणि म्हणून तीची कामगिरी लाखमोलाची…

ललिता बाबरनं तमाम भारतवासियांना अ‍ॅथलेटिक्सच्या फायनलचा थरार तब्बल ३२ वर्षानंतर अनुभवयाला दिला. यापुर्वी १९८४ च्या माँट्रेयाल ऑलिम्पिकमध्ये पी.टी.उषानं ऑलिम्पिकची फायनल गाठून इतिहास घडविला होता. फायनलमध्ये सेकंदाच्या शंताश इतक्या फरकानं पी.टी.उषाचं मेडल हुकलं होत. ती चौथी आली होती. ललितानं यंदा ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये नव्य राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत फायनल गाठली होती. ती मेडल जिंकू शकली नाही. पण तमाम भारतीयांची हृदय मात्र तिनं जिंकली.

साक्षि मलिकनं पुरषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीत ऑलिम्पिकचे मेडल जिंकून दिलं. साक्षिला कुस्ती शिकविल्यामुळे तीच्या कोचला गावातून बहिष्कृत केले गेले होते. त्याच गावकुसाबाहेरच्या या महिला कुस्तीला साक्षीनं ऑलिम्पिकचं मेडल जिंकून मुख्य प्रवाहात आणलं. येणार्‍या जपानच्या २०२० च्या ऑलिम्पिकपर्यंत आता अशा अनेक साक्षि आपल्याला पहावयाला मिळतील.

सिंधुनं तर कमाल केली. ऑलिम्पिकच्या १२० वर्षांच्या इतिहासात सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलीय. आजवर महिलांच्या क्रीडा प्रकारात आपल्याला एकुण चार मेडल होती, पण ती चारही ब्राँझ होती. त्यात कर्णम मलेश्वरी(वेटलिफ्टींग) , सायन नेहवाह (बॅडमिंटन) , मेरी कोम (बॉक्सिंग) आणि साक्षि मलिक (कुस्ती) यांचा समावश होता. सिंधु त्यांच्या एक पावूल पुढे गेले. सिंधुच्या नावावर जरी सिल्व्हर मेडल असले तरी फायनलमध्ये तिनं जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणा र्‍या मरिनला चांगलेच जेरीस आणले होते.

या चार जणींची कामगिरी ही पुढील ऑलिम्पिकसाठीची खेळातील गुंतवणूक आहे. या चार जणीतूनं उद्या ४० ऑलिम्पिक विजेत्या खेळाडू तयार होतील. केवळ भारताच महिला शक्तीचं राज आहे असं नाही तर मेडल टॅलीमध्ये टॉपला असणा र्‍या अमेरिकेसह चीनमध्येही महीला खेळाडूंनी बाजी मारलीय. अमेरिकेच्या पुरुषांनी एकुण ५५ मेडल तर महिलांनी ६१ मेडल जिंकलित. आशियातील क्रीडा जगतातील सुपरपॉवर चीनच्या २८ पुरुषांनी मेडल जिंकलेत तर महिलांनी ४१ मेडल जिंकले आहे.

असो रिओतील महिलां खेळाडूंच्या कामगिरीवरुन मी एक नक्की सांगू शकतो की तो दिवस आता दुर नाही जेव्हा भारत ऑलिम्पिकमध्ये दोन अंकी पदकांची लयलुटट करेल.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121