कालच्या पेपरमध्ये बऱ्याच जणांनी 'लाखो भारतीयांनी केला गूगलवर सिंधू आणि साक्षीच्या जातीचा शोध' ह्या आणि अश्या प्रक्षोभक मथळ्याखाली एक बातमी वाचली असेल. बातमीचा मतितार्थ होता, रियो ऑलिंपीक स्पर्धेतल्या दैदिप्यमान कामगिरीनंतर भारतीय नागरिकांना उत्सुकता लागून राहिली होती ती सिंधू आणि साक्षी ह्यांच्या जातीचा शोध लावायची. ही बातमी पहिली छापली ती न्यूजमिन्युट ह्या डिजिटल वृत्तपत्राने. न्यूजमिन्युटला असं भासवायचं होतं की अगदी २१साव्या शतकात देखील लाखो भारतीय लोक इतक्या बुरसटलेल्या आणि प्रतिगामी मनोवृत्तीचे आहेत की त्यांना सिंधू आणि साक्षीच्या कामगिरीची फिकीर नाही, त्यांना फिकीर आहे ती त्या दोघी कुठल्या जातीच्या आहेत त्याची.
भारतातल्या स्वतःला 'पुरोगामी' वगैरे म्हणवणाऱ्या लोकांना जेव्हढी जात ही संकल्पना हवी असते तेव्हढी ती कर्मठातल्या कर्मठ हिंदूला देखील नको असेल, कारण 'जात' ह्या विषयावरच तर ह्या लोकांची दुकानं वर्षानुवर्षे चाललेली असतात. ह्या असल्याच लोकांचा भरणा आपल्या पारंपारीक मीडियामध्ये असल्यामुळे साहजिकच ही बातमी वाचून बऱ्याच पत्रकारांना हर्षवायू झाला. त्या बातमीमागच्या सत्याची कुठलीही शहानिशा न करता न्यूजमिन्युटची ही बातमी त्याच दिवशी जवळ जवळ सर्व वतमानपत्रात झळकवली गेली. बऱ्याच संपादकांनी अर्थातच थोडं पदरचं तिखट-मीठ लावून ही बातमी जरा अधिक चटकदार केली. पण ही बातमी ज्या 'गूगल एनालीटीक्स डेटा' वर आधारलेली होती तो डेटा बरोबर आहे का हे तपासायची तसदी ह्यांपैकी कुणाही पुरोगामी विचारवंत वगैरे म्हणवणाऱ्या संपादकांनी घेतली नाही.
सुदैवाने www.indiafacts.com ह्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये संक्रांत सानू ह्या लेखकाने ह्या विषयावर लेख लिहून ही बातमी कशी चुकीच्या डेटाट्रेंडस वर आधारलेली आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केले. न्यूजमिन्युटच्या बातमीत असं म्हटलं होतं की 'ऑगस्ट महिन्यात पी.व्ही.सिंधू ची जात ह्या विषयावर दहापट लोकांनी गूगलवर सर्च केलं होतं ह्याचा अर्थ असा होतो की लाखो भारतीय नागरिकांनी 'सिंधू आणि जात' हे शब्द वापरून सर्च केलाय'.
संक्रांत सानूनी सप्रमाण सिद्ध केलंय की गूगल ट्रेंडसचा डेटा फक्त सिंधू ह्या नावावरचे सगळे सर्चेस देतो. 'सिंधू आणि तिची आई', किंवा 'सिंधू आणि गोपीचंद' असे कीवर्ड्स टाकले तरी गूगलचे तेव्हढेच सर्च रिझल्ट्स येतात कारण गुगल ट्रेंडसचा डेटा फक्त सिंधू हे नाव वाचतो आणि त्या नावासंबंधीत असलेले सगळेच सर्चेस दाखवले जातात. सिंधू जेव्हा अंतिम फेरीत खेळत होती तेव्हा लाखो भारतीयांनी गूगलवर तिचं नाव सर्च केलं ही गोष्ट खरीच आहे, पण ते सगळे सर्चेस जातीसंबंधी नव्हतेच.
न्यूजमिन्युटच्या बातमीत असं छातीठोकपणे म्हटलं गेलंय की जुलै महिन्यामध्ये दीड लाख भारतीयांनीनी 'सिंधू आणि जात' ह्या विषयावर सर्च केलाय तर ऑगस्ट महिन्यामध्ये ९०,००० लोकांनी हे दोन्ही कीवर्ड वापरून तो सर्च केलाय. ह्यावर संक्रांत सानू म्हणतात की दीड लाख भारतीयांनी सिंधू बद्दल सर्च केलाय ही गोष्ट खरीच आहे, पण हा सर्च तिच्या आयुष्याबद्दल असू शकतो, तिच्या कारकिर्दीबद्दल असू शकतो, तिच्या आवडत्या डिशेसबद्दल असू शकतो.
संक्रांत सानू गूगल एनालीटीक्सचाच डेटा वापरून हे सिद्ध करून दाखवतात की 'पी व्ही सिंधू अधिक जात' हे कीवर्डस वापरून केलेले सर्च जुलै महिन्यात फक्त २१० होते. अर्थात २१० भारतीय नागरिकांनी हा सर्च केला हेही वाईटच आहे, पण न्यूजमिन्युट ह्या डिजिटल वृत्तपत्राने कसलाही रिसर्च ना करता जाणून बुजून खोडसाळपणे दिलेली ही बातमी पूर्णपणे निषेधार्ह आहे.
संक्रांत सानूचा लेख प्रसिद्ध झाल्यावर न्यूजमिन्युटच्या प्रमुख संपादिका धन्या राजेंद्रन ह्यांनी ट्विटरवरून स्वतःची चूक मान्य केली पण ती खोटी बातमी आपल्या साईटवरून काढून टाकण्याचे सौजन्य त्यांनी दाखवलेले नाही. फक्त खाली एक दिलगिरीवजा टीप दिल्याने राजेंद्रन बाईंची जबाबदारी पूर्ण होत नाही. त्यांनी चूक कबूल केली पण ह्या बातमीवरून जातीयवादाचे जे जहर इतर वृत्तपत्रांनी व न्यूज चॅनेलनी पसरवले त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? कुठलीही शहानिशा न करता आंधळेपणाने व समाजात दुही फैलावायच्या हेतूने छापली गेलेली ही तद्दन खोटी बातमी देशभर पसरलेली आहे. ज्या ज्या वृत्तपत्रांनी ही बातमी छापली ते वाचकांची माफी मागणार आहेत का?
शोधपत्रकारिता ह्या लेबलखाली भारतात जो सरळसरळ खोटारडेपणा चालतो त्याला कोण आणि कसा आळा घालणार? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली हे तथाकथित पुरोगामी पत्रकार समाजात विष कालवायचे, खोट्या बातम्या पसरवायचे काम इमानेइतबारे करत आहेत. ह्यांच्या खोटारडेपणावर कारवाई करायचा कुणी विचार जरी केला की हे लगेच 'आमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जातोय हो' म्हणून गळे काढून रडणार.
समाजातला, राजकारणातला दांभिकपणा उघड करायचं काम लोकशाहीमध्ये पत्रकारांनी करायचं असतं असा एक आपल्याकडे समज आहे, पण पत्रकारांचा दांभिकपणा कोण उघड करणार? सोशल मीडियावर लोक पत्रकारांच्या चुका दाखवून देण्याचं काम इमानेइतबारे करतात, पण चुका दाखवूनही जेव्हा मान्य केल्या जात नाहीत तेव्हा सर्वसामान्य वाचकांनी कुणाकडे दाद मागायची?