अश्रुंचा रंग चंदेरी होता…
आपल्या धावपळीच्या रोजच्या जीवनात आपण असे किती क्षण जगतो जे पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात… जरा शांत डोळे मिटा आणि आठवा… फार कमी क्षण आपल्या वाट्याला येतात जे पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. काल बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधुनं असेच अजरामर क्षण मलाच नाही तर अवघ्या भारतवासीयांना दिले. रिओतील खचाखच भरलेल्या ऑलिम्पिक बॅडमिंटन स्टेडियममध्ये सिंधून फायनल गमावली. पण करोडो भारतीयांची हृदय जिंकली. पराभवामुळे ऑलिम्पिकचं सिल्व्हर मेडल तिनं पटकावलं… पण त्या चंदेरी रंगात १२० वर्षांच्या प्रतिक्षेची आसं होती. कितीतरी पिढ्या हा रंग पाहण्याची आस ठेवून गेल्या. होय, ऑलिम्पिकच्या १२० वर्षांच्या इतिहासात भारतीय महिला खेळाडूंनं जिंकलेलं हे पहिलं सिल्व्हर मेडल ठरलंय. यापुर्वी कर्णम मलेश्वरी, सायना नेहवाल, मेरी कोम, आणि यंदा साक्षी मलिक या चौघींनी भारताला ऑलिम्पिकचे कास्यंपदक मिळवून दिले होते. सिंधूंनं एक पावूल पुढे जात सिल्व्हर मेडल जिंकलं. इतिहास घडताना त्याचे साक्षीदार होण्याची संधी फार कमी जणांच्या आयुष्यात येते. आणि म्हणूनचं रिओतील या बॅडमिंटन कोर्टवर हजर असलेल्या प्रत्येक भारतीयाची मान गर्वानं उंचावली होती. सिंधुंन सुरुवात तर झकास केली होती. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणार्या स्पेनच्या मरिन कॅरोलिनाविरुध्दचा पहिला गेम तिनं पिछाडी भरून काढत जिंकला होता. दुसर्या सेटमध्ये मात्र मरिननं नंबर वन असंण काय असते ते दाखवून दिलं आणि गेम जिंकला. निर्णायक तिसर्या गेममध्ये सिंधूनं शर्थीचं प्रयत्न केले. तिच्या प्रत्येक पाँईटनंतर स्टेडियममध्ये उपस्थित आम्हा सगळ्यांची धडधड वाढत होती. सिंधू जिंकावी, गोल्ड मेडल जिंकावी यासाठी प्रत्येक भारतीय डोळ्यात प्राण आणून ती मॅच पहात होता. अखेर मुठीतून वाळू निसटावी तसं सिंधूच्य हाती आलेलं गोल्ड मेडल निसटलं आणि ती कोर्टवरचं कोसळली. क्षणभर सारे भारतीय निशब्द झाले. सिंधूच्या डोळ्यातून वाहणार्या अश्रुंसोबत प्रत्येक भारतीयांनं आपल्या अश्रुनांही वाट करुन दिली होती. सिंधुचे अश्रु आणि आमचे अश्रु एक झाले होते. आम्हा सगळ्यांच्या अश्रुंचा रंग एक झाला होता. अश्रु चंदेरी झाले होते…
मला माहित नाही हे अश्रु आनंदाचे होते की सुवर्ण पदक निसटल्याचे होते. तृप्तीचे होते की अपुर्णतेचे… जाणवत होते ते एकचं, की सिंधुंच्या अश्रुत आमचे अश्रु मिसळले होते… पुन्हा पुन्हा जगावा असा हा क्षण सिंधुंनं तमाम भारतीयांना दिला… सिंधु यासाठी आम्ही तुझे सदैव ऋणी राहू…
- संदिप चव्हाण
मुंबई तरूण भारत