रेशमाच्या रेघांनी, लाल-काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला

    02-Aug-2016   
Total Views |

'रेशमाच्या रेघांनी, लाल-काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला', आशा भोसलेंच्या लडिवाळ आवाजातली ही लावणी आपल्यापैकी  बहुतेकांनी ऐकलीच असेल, पण हा 'कर्नाटकी कशिदा' म्हणजे नेमकं काय, तो कसा काढतात हे माहिती आहे का कुणाला?

कर्नाटकी कशिदा म्हणजे एक प्रकारचं भरतकाम जे जास्त करून कर्नाटकातल्या हुबळी-धारवाडच्या पट्टयात केलं जातं. कन्नडमध्ये ह्या प्रकारच्या भरतकामाला कसुती असं म्हणतात, कसुती म्हणजे खरं तर 'काय सुती' ह्या दोन शब्दांचा मिळून बनलेला शब्द आहे. 'काय' म्हणजे हात आणि 'सुती' म्हणजे कापसाचा धागा. धागा वापरून हाताने केलेलं भरतकाम म्हणजे कसुती किंवा कर्नाटकी कशिदा. पण तसं पाहिलं तर सगळंच भरतकाम हे धागा वापरून हाताने केलं जायचं, मग कसुतीची खासियत काय असं तुम्ही विचाराल. 
 
कसुतीची खासियत म्हणजे हाताने केलेली कसुती ही उलट-सुलट दोन्ही बाजूंनी सारखीच दिसते. मी मुंबईला रहात होते तेव्हा माझ्या शेजारी एक धारवाडच्या काकू राहायच्या. त्यांना कसुतीची खूप आवड होती. एक-दोनदा त्यांनी मला शिकवायचाही प्रयत्न केला होता. 'तू शाळेला जाताना कशी एका रस्त्याने जायचीस आणि परत येताना त्याच रस्त्याने यायचीस? तसंच आहे कसुतीचं. सुई-धागा ज्या वाटेने घुसवायचा, त्याच वाटेने परत सुरवातीच्या बिंदूपर्यंत परत आणायचा', त्या म्हणायच्या. कसुती समजून घ्यायचा तो सगळ्यात सोपा मार्ग आहे. 
 
कसुतीचं सगळ्यात सोपं स्वरूप म्हणजे ठिपक्यांची रांगोळी घालताना कशा कुशल बायका ओळ न तोडता रांगोळी पूर्ण झाल्यावरच पहिल्या ठिपक्याकडे परततात तशीच कसुती. म्हणून कसुतीचे डिझाईन्स रांगोळीसारखेच असतात, भूमितीच्या आकृत्यांमध्ये बसणारे. गोपुर, हत्तीवरची अंबारी, तुळशीवृंदावन, समई, रथ, पालखी, राघू हे कसुतीचे काही प्रसिद्ध डिझाईन्स. पूर्वी इरकली साड्यांवर बायका कसुती करायच्या. काळ्या किंवा गर्द निळ्या इरकली साडीवर लाल-पिवळ्या रंगांच्या धाग्यांनी केलेली कसुती साडीला एक वेगळंच सौंदर्य बहाल करून जायची. 
 
कसुतीचाच एक वेगळा प्रकार आहे 'नेगी कसुती'. 'नेगी' म्हणजे विणलेली. हे भरतकाम हातमागावर विणल्यासारखं दिसतं म्हणून ह्या प्रकारच्या कसुतीला 'नेगी कसुती' असं म्हणतात. नेगी कसुतीचे डिझाईन्स वेगळेच असतात. कर्नाटक हातमाग विकास महामंडळाने आता कसुती भरतकामाचा GI tag घेतलेला आहे. धारवाड-हुबळीमध्ये बऱ्याच  बायकांच्या सहकारी संस्था आहेत ज्या अजूनही केवळ कसुतीचेच काम करतात. हाताने केलेल्या कसुतीला वेळ लागतो, श्रम लागतात, मन मोडून, डोळे दुखवून हे काम करण्यात येतं, साहजिकच आहे की हातावरच्या कसुतीच्या साड्या आजकाल स्वस्तात मिळत नाहीत. केलेल्या कामाच्या इंट्रीकसीवरून साडीची किंमत ठरते. कमीत कमी तीन-साडेतीन हजारापासून ते अगदी पंधरा हजारापर्यंतच्या किमतीत कसुतीच्या साड्या बाजारात मिळू शकतात. 
 
जुन्या कालच्या सुंदर कसुती केलेल्या रेशमी साड्या बघायच्या असतील तर मुंबईच्या राजा शिवाजी वस्तूसंग्रहालयाच्या वस्त्र दालनाला जरूर भेट द्या. खूप दुर्मिळ अश्या कसुतीच्या डिझाईन्स तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतील. 
 
आजकाल कसुती भरतकामाला सगळ्यात मोठा धोका आहे तो मशीन एम्ब्रोयडरी पासून. मशीनने कसुती केलेल्या यंत्रमागवरच्या इरकली साड्या अगदी आठशे-नऊशेला बाजारात मिळतात. सुलट बाजू पहिली तर फरक कळतही नाही. अगदी हुबेहूब तसेच डिझाईन्स. फक्त साडीची उलट बाजू बघितली की समजतं ही साडी मशीनवर केलेली आहे. विकताना आजकाल विक्रेते सांगतही नाहीत स्पष्टपणे कसुती मशीनची आहे की हातावरची ते. पुण्यातल्या एका प्रसिद्ध साडीच्या दुकानात मी जाऊन कसुतीच्या साड्या मागितल्या तर एका विक्रेत्याने एक गठ्ठाच माझ्यापुढे उलगडला. मी म्हटलं 'मला हाताने केलेली कसुती पाहिजे', तर तो मला म्हणाला, 'हो हो, ह्या हातानेच केलेल्या आहेत'. मी त्याच्यासमोर साडी उलटी करून त्याला सप्रमाण दाखवून दिलं की साडी मशीनची आहे. तो ओशाळून मला म्हणाला, 'तुम्हाला माहिती आहे ताई, पण इथे येणाऱ्या बऱ्याच गिऱ्हाईकांना स्वस्तातली कसुती साडी पाहिजे असते. आता हजार रुपयात हाताने काम केलेली साडी कशी भेटंल?' 'ते ठीक आहे हो, पण तुम्ही लोकांना प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे ना की साडी मशीनची आहे?' मी विचारलं. तो विक्रेता गप्पच बसला. 
 
अशी ही कसुती साडी. शक्य असेल तर प्रत्येक भारतीय स्त्रीने एक तरी संग्रही ठेवावी इतकी सुंदर. 

 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121