रिओच्या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये ललिता बाबरची वाट पाहत मी उभा होतो… तब्बल ३२ वर्षानंतर भारतीय अॅथलीट ऑलिम्पिकची फायनल खेळताना पाहण्याचा आनंद ललिता बाबरनं माझ्यासह देशवासीयांना काही तासापुर्वी दिला होता. फायनलमध्ये तीला दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण तीची जिद्द वाखाखण्याजोगी होती. आणि म्हणूनचं तिच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी मी तीची भेट मागितली होती. काहीशी दबकतचं तीनं मला हो म्हटलं आणि मी थेट ऑलिम्पिक व्हिलेज गाठलं. मैदानावर चित्याच्या वेगानं धावणारी ललिता काहीशी दबकतचं माझ्यापाशी आली. कॅमेरा… माईक असा सगळा तामजाम पाहुन ती थोडीशी बावरली. सर नेमकं काय बोलाचंय… अगदी निरागस प्रश्न तिनं मला केला होता. आजवर मी अनेकांच्या मुलाखती घेतल्यात पण हा अनुभव माझ्यासाठी नवा होता… म्हणजे प्रश्न आधी कळले तर असं म्हणत वाक्य अर्ध्यातचं तिनं तोडलं. तीला खुप काही सांगायचं होतं पण जाहिरपणे ते तीला बोलायचं नव्हतं… पापण्यांच्या आड तीन उफाळणार्या अश्रुंचा समुद्र रोखून धरला होता. ती खुप बोलली पण त्यापेक्षाही ती न बोललेल्या गोष्टी मी तीच्या डोळ्यात सहज वाचू शकत होतो…
काय योगायोग बघा, ललिताची फायनल होती ती ही नेमकी १५ ऑगस्टला, भारताच्या स्वातंत्र्यदिनी. अवघा देश तीचं यश साजरं करण्यासाठी सज्ज होता. अंतिम फेरी गाठताना जगातील सर्वोत्तम ५२ खेळाडूत तीनं ७ व्या क्रमांकाची वेळ नोंदविली. ९ मिनिट आणि १९.७६ सेकंदसह तीनं राष्ट्रीय विक्रमही नोंदविला. फायनलमध्ये ती दहावी आली. बहरिनच्या जिबेट रुथनं गोल्ड मेडल जिंकलं. जिबेट मुळची केनियाची. पण तिनं केनियाला सोडचिठ्टी देत श्रीमंत बहरीनची वाट पकडली. २०१३ साली पुण्यात झालेल्या एशियन चॅम्पियन्स स्पर्धेत जिबेटनं भारताच्या स्टार खेळाडू सुधा सिंगला हरवत गोल्ड मेडल जिंकलं होतं. तेव्हा तीची कामगिरी होती ९ मिनिटं आणि ४०.८४ सेकंद. रिओत काल ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकताना तीची वेळ होती ८ मिनिटं ५९.९७ सेकंद. थोडक्यात ३ वर्षात जिबेटनं आपली कामगिरी बहरिनच्या पैशांनी ४१ सेकंदानी उंचावली. याऊलट २०१४ साली दक्षिण कोरियातील इच्छेन येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये ललिता बाबरनं ब्राँझ मेडल जिंकलं होतं. मी त्याचा साक्षिदार आहे. त्यावेळी तीनं वेळ नोंदविली होती ९ मिनिट आणि ३५.३७ सेकंद. रिओत ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठतान तिनं जवळपास १६ सेकंदाची वेळेत सुधारणा केली. हा फरक मी मुद्दाम हुन येथे देतोय कारण १६ सेकंदाची वेळ सुधारण्यासाठी अनेक खेळाडूंची उभी हयात जाते. भारतात ललिता बाबर सध्या स्वताशिच स्पर्धा करतेय. तेही अपुर्या सोयीसुवीधेसह. आज आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्सच्या स्पर्धा ज्या ट्रॅकवर होतात तो ट्रॅकच आपल्याकडे भारतात नाहीय. ललितानं हाच खेळ का निवडला यावर तिचं उत्तर मार्मिक होतं. सातार्यातील दृष्काळग्रस्त गावातून आलेल्या ललितानं अॅथलेटिक्स निवडलं कारण धावण्यासाठी काही विकतचं लागत नाही. फुकटात खेळता येणारा खेळ. शेताच्या बांध्यावर उड्या मारण्यासाठी कुणाला पैका द्यायची गरज नाही… किती सहज ती हे बोलून गेली होती. देश ७० वा स्वातंत्रता दिवस साजरा करित असताना ऑलिम्पिक मेडल जिंकणारे खेळाडू घडविण्याची यंत्रणाच आपल्या देशात नाही हे कटू सत्य आहे. ललितासारके गुणवान खेळाडू जेव्हा लहाणपणापासून करियर करण्यासाठी खेळाकडे वळतिल तेव्हा आपण ऑलिम्पिक चॅम्पियन्स घडवू. ललिता, बहरिन देशानं जिबेटला केनियाकडून पळवून तिच्यावर पैका खर्च करुन त्याचे सोन्यात रुपांतर केले. आपल्या देशाला कदाचित तुझी किंमत आता कळली असेल. बहरीननं ऑलिम्पिक आधी जिबेटवर खर्च केला आम्ही तुझ्यावर तो करु शकलो नाही. आमच्या स्वप्नांच ओझ मात्र तुझ्या खांदयवर टाकून आम्ही १५ ऑगस्टला तुझ्या मेडलचा जल्लोष करण्यासाठी निर्धास्त झालो. करोडो भारतीयांचं बिनपैशाचं ओझं तु ऑलिम्पिकच्या फायनमध्ये जिद्दीनं ओढलंस. दहाव्या क्रमांकापर्यंत तु धडकलीस. तुझ्या जिद्दीला सलाम. तुझ्या पंखात सोयी सुवीधांच्या रुपानं बळ भरण्यात आम्ही कमी पडलो याबद्दल आम्हाला माफ कर. तुला गरुडपंखी झेप घ्यायची होती,पण आम्हची स्पोर्टस सिस्टीम तुझ्या जिद्दीपुढे खुजी ठरली…