काल पंधरा ऑगस्ट होता, भारताचा सत्तरावा स्वातंत्र्यदिन. सकाळी सकाळी मुलांनी एकदम सस्मित चेहेऱ्याने मला शुभेच्छा दिल्या, ‘स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मम्मा’, तिन्ही मुलं एकदम ओरडली. मी हसून त्यांना विचारलं, ‘स्वातंत्र्य म्हणजे काय रे?’
‘स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला हवं ते करता येणं, स्वतःला हवं ते लिहिता येणं आणि स्वतःला हवं तसं वागता येणं’, माझी मुलगी पटकन म्हणाली.
‘खरंच?’ तुला असं वाटतं कां की प्रत्येक माणसाला असं स्वतःला वाट्टेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य असू शकतं?’ मी तिला प्रतिप्रश्न केला. ‘तुला उद्या वर्गात असताना उगाचच मोठ्यांदा ओरडावंसं आणि आजूबाजूच्या मुलांना डिस्टर्ब करावंसं वाटलं तर तसं करण्याचं तुला स्वातंत्र्य आहे का आणि मुख्य म्हणजे तसं स्वातंत्र्य तुला असावं का?’ मी मुलीला विचारलं.
‘लहान असताना नाही पण अठरा वर्षानंतर, म्हणजे मोठ्या लोकांना असं स्वातंत्र्य मिळतं’, माझा मुलगा म्हणाला.
‘मी मोठी आहे. मग तुला असं म्हणायचंय कां की मला स्वतःला हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य आहे? म्हणजे बघ मला माझं घर साफ किंवा घाण ठेवायचं स्वातंत्र्य आहे, पण उद्या मला वाटलं की माझ्या घरातला कचरा बाहेर रस्त्यावर फेकावा तर ते स्वातंत्र्य मला आहे कां?’ मी विचारलं.
आता मुलं जरा विचारात पडली. काही सेकंद विचार केल्यानंतर दुसरा मुलगा म्हणाला, ‘नाही. असं स्वातंत्र्य तुला नाही’.
मी परत मुलांना विचारलं, ‘मग स्वातंत्र्य म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं?’
काही वेळ विचार करून मुलगी म्हणाली, ‘स्वातंत्र्य म्हणजे काही सीमा पाळून तुम्हाला हवं तसं वागता येण्याचा हक्क’.
मी विचारलं, ‘ह्या सीमा कशा तयार होतात, त्या कोण बनवतं?’
परत मुलं थोडा वेळ गप्प झाली. ‘भारतीय राज्यघटना?’ अनन्याने अडखळत विचारलं.
‘देशाच्या संदर्भात म्हणालीस तर भारतीय राज्यघटना, पण घरात आपण कसं वागावं ह्याच्या सीमा कोण ठरवतं?’ मी विचारलं.
‘तू, अप्पा आणि आजी’, अर्जुन म्हणाला.
‘बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक घराचीही एक घटना असते, काही कायदे असतात. ते त्या घरात राहणाऱ्या सगळ्यांनाच पाळावे लागतात. आता तुम्ही शाळेत गेल्यावर कसं वागायचं हे कोण ठरवतं?’ मी विचारलं.
‘प्रिन्सिपल सर आणि बाकीचे टीचर’ अंमळ विचार करून अर्जुन म्हणाला.
‘म्हणजे शाळेची घटना आणि कायदे हे घरातल्या पेक्षा वेगळे असतात, राईट?’ मी विचारलं.
मुलांनी होकार भरला.
‘आता देशाचे नागरिक म्हणून आपण कसं वागावं, हे देशाची राज्यघटना ठरवते.’
‘पण मम्मा, घटनेत फक्त अधिकारांचीच माहिती देतात का ग?’ आदितने विचारलं.
‘असं असतं का कधी? आपल्या घरात तुम्हाला अधिकार आहेत, शाळेला जायचे, चांगलं जेवण जेवायचे, खेळांच्या क्लासला जायचे, बाहेर मित्रांबरोबर हुंदडायला जायचे, फावल्या वेळात कधी कधी कम्प्युटर गेम्स खेळायचे, मम्मा कडून रात्री झोपताना पुस्तक वाचून घ्यायचे, अप्पाबरोबर शनिवारी भटकायला जायचे, हो की नाही?’ मी विचारलं.
‘हो हो’, मुलांनी तोंडभरून होकार दिला.
‘पण हे सगळे हक्क तुम्हाला मिळतायत त्याचबरोबर तुम्ही काही कामंही करावीत अशी आमची अपेक्षा आहे की नाही?’
‘हो. आम्ही स्वतःहून आमचा होमवर्क करावा, घरकामात थोडी मदत करावी, आमची खोली आम्हीच आवरून ठेवावी, शाळेत चांगलं अभ्यास करावा, असं तू आम्हाला नेहमीच सांगत असतेस.
‘अगदी बरोबर. आपल्या घरातल्या घटनेने जसे तुम्हाला काही हक्क दिलेले आहेत तसेच तुमच्याकडून काही कर्तव्यांची अपेक्षाही ठेवलेली आहे. तुम्ही फक्त हक्कांसाठी नाही भांडू शकत. आपल्या राज्यघटनेचंही तसंच आहे. घटनेने प्रत्येक नागरीकाला काही हक्क दिलेले आहेत त्या बदल्यात त्यांच्याकडून काही कर्तव्यांचीही अपेक्षा आहे. मला फक्त हक्कांचं स्वातंत्र्य हवं, कर्तव्यांचा जाच नको असं कुणी म्हणू शकत नाही’, मी म्हटलं.
मुलं विचारमग्न झाली होती, म्हणाली, ‘म्हणजे जगात कुणीच पूर्णपणे फ्री नसतं?’
मी हसले आणि म्हणाले ‘तुझ्या वर्गात सगळ्या मुलांना त्यांना हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य दिलं तर काय होईल अनन्या?’ ती ही हसली आणि म्हणाली, ‘मग आम्हाला काही शिकताच नाही येणार, कारण वर्गात कुणी बसणारच नाही’.
‘पूर्ण स्वातंत्र्य कधीच नसतं बाळा, पण जसजसे तुम्ही प्रगल्भ होत जाता तसतसे तुम्हीच स्वखुशीने तुमच्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ठरवता, त्यासाठी मग तुम्हाला मारून मुटकून जबरदस्तीने बाहेरून कुणीतरी लादलेली एखादी नियमावली पाळायची गरज भासत नाही. तेव्हा मग तुम्ही खऱ्या स्वातंत्र्याच्या आसपास जाता.’