दुखानं काठोकाठ भरलेल्या डोळ्यातून जेव्हा आनंदाचा एकाद अश्रुचा ओघळ वाहतो तेव्हा त्या भावनां शब्दात पकडणे अवघड असते… ऑलिम्पिकमध्ये चौफेर पराभवाच्या आणि निराशेच्या बातम्या देऊन मनाला एक उदासिनता आली होती पण दीपा कर्माकरन त्यावर दिलासा देणारी एक फुंकर मारली.
जिम्नॅस्टिकमध्ये तिनं ऑलिम्पिकची फायनल गाठत इतिहास तर घडविलाच होता पण ज्या पध्दतीनं तिनं अंतिम फेरीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली ती झेप हृदयाचे ठोके उंचविणारे होते. अजुनही हृदयाचे ठोके धडधडतायत… त्रिपुरासारख्या छोट्या राज्यातून ही मुलगी जिमनस्टसारका खेळ निवडते काय आणि ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठते काय… सगळचं स्वप्नवत. आजवर जिम्नस्ट म्हटले की आपला विषय रोमानियाच्या नादिया कोमेन्सकीचे विक्रम सांगता सांगता संपयाचा. आमच्या आणि त्याच्या आधीच्या पीढीला भारतात कधी काळी जिम्नस्ट जन्मू शकतील हे स्वप्नात सुध्दा सुचले नव्हते. मी गेली चार ऑलिम्पिक कव्हर केले आहेत. अथेन्स, बीजिंग, लंडन आणि आता ब्राझिल. गेल्या १६ वर्षात मी हटकून ऑलिम्पिकचा हा क्रीडा प्रकार पहायला जायचो. ज्या देशाचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात त्या देशाचा झेंडा त्या स्टेडियममध्ये लावला जातो. तिरंग्याचे तिथे नसलेलं अस्तित्व गेली १६ वर्ष मनाला वेदना द्यायचं. तेथील ती नजाकता पाहून आपण हे करु शकेल यावर विश्वासच नसायचा. या सगळ्या पार्श्वभूमीवर दीपा कर्माकरनं आमची मान अभिमानांनं उंचावली. तिथं प्रोडुनोव्हा नावाच जगातील सगळ्यात अवघड व्हॉल्ट प्रकार तिनं केला.
आजवर ऑलिम्पिकमध्ये अवघ्या ५ जणांनी हा प्रकार ट्राय केलाय. त्यात रशिया, डोमेनिक रिपब्लिक, इजिप्त आणि उझबेकिस्तानच्या खेळाडूचा समावेश आहे. खरंतर रशियाच्या एलेना प्रोडुनोव्हानं १९९९ साली हा प्रकार शोधून काढला. म्हणून या प्रकाराला प्रोडुनोव्हा असं म्हटलं जातं. समोरच्या दिशेनं हवेत ३ कोलांट्या उड्या यात मारल्या जातात. या प्रकारात मानेवर पडून प्रसंगी मृत्यू ओढवण्याचाही धोका असतो. इजिप्तची फादवा मोहम्मद प्रोडुनोव्हा करताना थोडक्यात बचावली होती. अशा या जगातील अवघड प्रकारात दीपानं कौशल्य मिळवलंय. ऑलिम्पकच्या या फायनलमध्ये ती भलेही मेडलच्या पोडियमवर पोहचली नसेल पण तिनं स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची मने जिंकली. दीपाच्या प्रोडुनोव्हा व्हॉल्टला सगळ्यात जास्त दाद मिळाली. माझ्या बाजुला बेल्जियमचा समिंद्रा कुंटी हा पत्रकार बसला होता. दीपाच्या या प्रोडुनोव्हावर खास स्टोरी करण्यासाठी त्याच्या पेपरनं त्याला सांगितले होते. विदेशातील असे अनेक पत्रकार दीपाचं कौशल्य पाहण्यासाठी स्टेडियमवर हजर होते. एकानं तर चक्क थँक्यू दीपा कर्माकर म्हणून तिच्या कौशल्यासाठी तिचे आभार मानले तेव्हा उगाचचं आमची मान अभिमानानं ताठ झाली होती. थँक्स दीपा आम्हाला अभिमानानं मिरवायची संधी दिल्याबद्दल.