आजचा खुदीराम बोस कुठे ?

    11-Aug-2016   
Total Views |



आज भारताला स्वतंत्र होवून ६९ वर्ष झालेली आहेत. देशाची परिस्थिती खूप बदलली आहे. भारताची ४१ % लोकसंख्या तरुण आहे. तरुणांची आजची मानसिकता आणि स्वातंत्र्याआधीची मानसिकता यात काळाच्या ओघात बदल झाला आहे का? तेंव्हाचे खुदीराम बोससारखे क्रांतिकारक आत्ताच्या युवकांसाठी प्रेरणा आहेत का?
    
आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक स्मरणीय क्रांतिकारक खुदीराम बोस यांचा आज स्मृतिदिन. खुदीराम बोस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो १९ वर्षाचा अत्यंत आत्मविश्वासी तरुण. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चा जीव पणाला लावणारा, देशप्रेमाने सळसळणारा आणि भारताच्या भविष्याचा विचार इतक्या कमी वयात करुन त्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवणारा एक तरुण.

लहानपणापासून शाळेत, इंग्रज विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या द्वेषभावनेमुळे खुदीराम बोस देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित झाले. १९०५ च्या बंगालच्या  विभाजनानंतर स्वातंत्र्य आंदोलनात ते सक्रीय सहभागी झाले आणि नववीत असतानाच त्यांनी शाळा सोडली. ३० एप्रिल १९०८ रोजी `चीफ प्रेसिडेंसी मजिस्ट्रेट किंग्सफोर्ड` ची हत्या केल्यानंतर खुदीराम बोसला देहदंडाची शिक्षा झाली आणि ११ ऑगस्ट १९०८ रोजी त्यांना फाशीवर चढवण्यात आले. १९ वर्षाचा एक तरुण हसत -हसत फासावर चढला. त्यावेळच्या साहित्यकारांनी त्याला "शेर का बच्चा" अशी उपाधी दिली होती. त्यावेळी भारत स्वतंत्र झालाही नव्हता. स्वतंत्रतेची चळवळ मोठ्या प्रमाणावर पेटली होती. अनेक किशोरवयीन मुलांनी, युवांनी खुदीराम बोसला प्रेरणास्थानी ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.

भारत स्वतंत्र होवून बराच काळ लोटला आहे. आज भारत स्वतंत्रही आहे आणि प्रगतीशीलही. तरीही काही दिवसांपूर्वी काश्मीर इथं बुरहान वानी या दहशतवाद्याला लष्कराने चकमकीत ठार केल्यावर सारंच वातावरण पेटलं. काश्मीर इथं झालेल्या हिंसाचारात लष्कराविरुद्ध प्रदर्शनं करणाऱ्या लोकांपैकी ९० टक्के नागरिक युवा होते. काश्मीर प्रश्न हा भारताच्या स्वतंत्रतेपासून देशासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे. देशाच्या स्वतंत्रतेसाठी आणि नंतर काश्मीरसाठी झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये भारताच्या अनेक युवांनी प्राण गमावले. त्या सर्व शहीदांचा हा अपमानच नाही का? काश्मीरमध्ये युवा सैनिक प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करतात. ज्या जवानांमुळे आपण सुखाची झोप घेतो, त्यांच्यावरच दगड फेकताना आजच्या युवांना हे क्रांतिकारक आठवत असतील का? वय तेच, तारुण्य तेच, आत्मविश्वास तोच आणि सळसळती ऊर्जाही तीच पण भूमिका वेगळ्या. का म्हणून...

या उलट काश्मीर मधीलच एक युवा `आयएएस` अधिकारी फैजल शहा, ज्याने काश्मीरचा विकास करण्यासाठी आयएएस होण्याचं ठरवलं. आणि काश्मीर येथील पहिला आयएएस ऑफिसर म्हणून मान मिळवला. काश्मीर मध्ये खुदीराम बोसला जिवंत ठेवणाऱ्या फैजल शहाने, माझी आणि बुरहान वानीची तुलना करु नका. असंही सांगितलं, उद्देश एकच, सकारात्मकपणे काश्मीरमध्ये सुशासन आणत देशाच्या विकासात हातभार लावणे.

असाच आणखी एक प्रसंग. ९ फेब्रुवारी २०१६ रोजी भारताच्या राजधानीत एका नामवंत संस्थेत दहशतवादी अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कन्हैया कुमार नामक २८ वर्षीय युवा ने भारताविरुद्ध घोषणा दिल्या. "हमें चाहिये आजादी, काश्मीर की आजादी" वगैरे. कारण काय होतं? तर अफजल गुरुला फाशी देण्यात आली. त्यासोबत ओमर खालीद आणि इतर काही युवांनीही प्रदर्शने केली. कन्हैया आणि त्याच्या साथीदाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. आणि देशात ठिकठिकाणी कन्हैया समर्थनात सभा होवू लागल्या. देशातील १८-३० वयातील युवकांनी कन्हैयाला पाठिंबा दिला. परत इथेही घोषणा देणारे युवक, दहशतवाद्याच्या समर्थनात कार्यक्रम घेणारे युवक आणि समर्थन करणारेही युवकच. भूमिका इथेही बदलल्या.



मात्र सगळेच युवक असाच विचार करत असतील का? तर नाही. अशा परिस्थीत उत्तरप्रदेश येथील तेवीस वर्षीय `आयएएस` ऑफिसर चंद्रकला नीरुची आठवण आल्याशिवाय राहत नाही. दिसायला अत्यंत सुंदर आणि गोड असली तरी भ्रष्टाचाराविरुद्ध खंबीरपणे दोन हात करण्यासाठी चंद्रकला प्रसिद्ध आहे. तिच्या नावाने वरीष्ठ अधिकारी देखील थरथरतात. देशातला खुदीराम बोस ही वृत्ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील चंद्रकलाने भारतात सुशासन आणण्याचा विडा उचलला आहे. आणि त्यात ती दिवसेंदिवस यशस्वी होत आहे.

 कधी कधी विषण्ण परिस्थितीत एक आशेचा किरणही खूप मोठा असतो. देशातील खुदीराम बोस कदाचित हरवलेला भासू शकतो मात्र तो हरवलेला नाही. भारतातील युवा मेजर गौरव आर्या, आय ए एस चंद्रकला नीरु, पोलिस अधिकारी मरीन जोसेफ, समजुक्ता पाराशर यांच्यात तो जिवंत आहे. बुरहान वानी हा दहशतवादी होता आणि त्याला मरण हीच शिक्षा आहे, असे ठामपणे सांगणारा मेजर आर्या, काश्मीरमध्ये घडत असलेल्या हिंसाचारात मानवी हक्कांवरुन प्रश्न उठल्यावर, पाच वर्षाच्या मुलाला सैनिक बंकर समोर कोणी उभं केलं असा प्रश्न खडसावून विचारणारा मेजर आर्या, काश्मीर भारताचाच आहे आणि भारताचाच राहील असं पूर्ण शक्तीनिशी सांगणारा मेजर आर्या भारतातील अनेक युवांसाठी प्रेरणा आहे.

आसाम येथील युवा आयपीएस ऑफिसर समजुक्ता पाराशर देखील आजच्या भारतीय महिलांसाठी मुलींसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आसाम येथील बोडोंशी झुंझारपणे लढा देणारी समजुक्ता आजच्या काळातल्या खुदीराम बोसची आठवण करुन देणारी आहे. केवळ १५ महिन्यात १६ बोडो अतिरेक्यांना कंठस्थान घालणारी महिला भारताचं गौरव आहे. आणि नेहमीच राहील.

सद्य स्थितीत देशातील युवांची मानसिकता बघून अनेकांना प्रश्न पडत असेल आजचा खुदीराम बोस कुठे गेला? तो हरवलेला नाही. तो या प्रखर तेजमयी युवकांच्या रूपात जिवंत आहे. फक्त बघण्याची दृष्टी बदलली आहे. युवांकडे बघण्याची आपली दृष्टी काय असेल ते आपण ठरवा मात्र अंधारा पलिकडे सूर्याचा एक किरण नेहमीच असतो हे ही विसरून चालणार नाही. देशातील खुदीराम बोसच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणारे काही युवा असले तरीही तो खुदीराम बोस कधीही हरवणार नाही असा आत्मविश्वास देणारेही तरुण भारतात आहेत. नाही का?

आज खुदीराम बोस यांच्या स्मृतिदिनानिमित्त आठवण कुणाची ठेवायची. खुदीराम बोसची, त्याच्या फाशीची का त्याच्या वृत्तीची?

I am very clear what about you?

 

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121