मोदी, गोहत्या - भूमिका

    11-Aug-2016
Total Views |


भारतीय किंवा हिंदू संस्कृतीच्या र्‍हासाला नेमक्या कारणाने सुरुवात झाली, याबद्दल वेगवेगळी मतमतांतरे आहेत. हिंदू संस्कृतीतील काही मूलभूत दोषांमुळे हिंदू समाज दुबळा झाला आणि त्यामुळे परकीयांना आक्रमण करून आपला राजकीय वरचष्मा निर्माण करणे शक्य झाले, असे काही जणांचे मत आहे; तर मुस्लीम आक्रमणामुळे आपली जी विद्यापीठे व संस्थाजीवन उद्ध्वस्त झाले, तेच आपल्या सामाजिक र्‍हासाला कारणीभूत झाले, असे अन्य काही जणांचे म्हणणे आहे. या संबंधात पु. ग. सहस्रबुद्धे यांनी जे विवेचन केले आहे, त्यानुसार हिंदू समाजावर निवृत्तिपर आणि कर्मकांडी तत्त्वज्ञानाचा प्रभाव वाढल्याने हिंदू समाजाचा र्‍हास व्हायला सुरुवात झाली. मुस्लीम आक्रमणाआधी शक, हूण, कुशाण आदींनी आक्रमण केले असले, तरी ते इथल्या समाजाने सांस्कृतिकदृष्ट्या पचवून टाकले, परंतु मुस्लीमसमाजाबाबत असे होऊ शकले नाही. कारण हिंदू समाजाची आंतरिक क्षमताच क्षीण झाली होती. महाभारत त्यानंतरच्या काळामध्ये जो वैदिक धर्म प्रचलित होता, तो बुद्धिप्रामाण्यवादी प्रवृत्तिप्रधान नीतिनिष्ठ ऐहिक जीवनाचा विचार करणारा व समाजोत्कर्षकारक होता. परंतु, ही परंपरा दहाव्या शतकापर्यंतच चालू राहिली. त्यानंतर धर्मातील या महातत्त्वांचा लोप झाला. साधारणतः याच काळापासून नव्या स्मृती होण्याचे बंद झाले आणि जुन्या ग्रंथांवरच टीका लिहिणार्‍यांच्या युगाला सुरुवात झाली. त्यापूर्वी अनेक स्मृती निर्माण होण्याचे कारण काळाला अनुसरून व्यावहारिक धर्माची पुनर्रचना केली पाहिजे, याचे भान होते. परंतु, जेव्हा हे भान सुटले, तेव्हा पारंपरिक धार्मिक शास्त्रे आणि कर्मकांडे अट्टाहासाने कशी बरोबर आहेत असे सांगणे म्हणजेच धर्मकार्य, असे मानले जाऊ लागले. यातूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या सप्तबंदींनी हिंदू समाजाला जखडून टाकल्याचा उल्लेख केला होता, त्यातून बाहेर पडण्याकरिता कोणताही मार्ग भारताचे आधुनिक युग निर्माण होईपर्यंत सांगितला गेला नव्हता. ज्यांनी सांगण्याचे प्रयत्न केले, त्यांना उपहासाने किंवा बहिष्कृत करून सुधारणेच्या वाटा बंद करण्यात आल्या. पु. ग. सहस्रबुद्धे यासाठी कुमारिल भट्ट याला दोषी ठरवितात.

कुमारिल भट्ट इसवी सनाच्या आठव्या शतकात होऊन गेला. वेदप्रणित कर्ममार्गाचे-म्हणजे यज्ञयागप्रधान धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा फार मोठा प्रयत्न त्याने केला पण त्याला यश आले नाही. मात्र त्याने पुरस्कारलेले शब्दप्रामाण्याचे तत्त्व, त्याचा अदृष्टवाद आणि त्याने अवलंबिलेली अनोखी समन्वय पद्धती हे हिंदू समाजाच्या अपकर्षाला कारणीभूत झाली, असे त्यांनी विवेचन केले आहे. एकदा शब्दप्रामाण्य गृहीत धरायचे ठरविले आणि त्यात परस्परविरोधी तत्त्वांत समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर तो कसा हास्यास्पद होतो, हेही त्यांनी एक उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. ’’पतिनिधनानंतर स्त्रीने सती जावे, असे एक वचन आहे व जाऊ नये असे दुसरे वचन आहे. या दोन परस्परविरोधी वचनांत समन्वय निर्माण करण्याकरिता त्यांनी असा अर्थ काढला की ‘सती जाऊ नये’ या वचनाचा अर्थ भिन्न चितेवर जाऊ नये असा आहे, त्याच चितेवर जाण्यास हरकत नाही.’’ अशा अनेक परस्परविरोधी वचनांची ओढाताण करून नव्या परंपरा निर्माण करण्यात आल्या. प्राचीन वैदिक धर्म हा पारमार्थिक कधीच नव्हता. धर्मतत्त्वाने समाजाची धारणा होते की नाही, त्याची प्रगती होते की नाही हे पाहूनच धर्मनियमांचे विवेचन करावे, असे त्यांचे मत होते. धर्मामुळे अर्थ आणि कामयांचा लाभ होतो म्हणून धर्म आचरला पाहिजे, असे विवेचन केले जाते. परंतु, ज्या वेळी धर्माची फळे ऐहिक जीवनापेक्षा परलोकातच पाहण्याची दृष्टी उत्पन्न झाली, तेव्हापासून समाजाच्या ऐहिक र्‍हासाला सुरुवात झाली.

ब्रिटिशांची राजवट रुजल्यानंतर धार्मिक श्रद्धांनी केलेल्या या ऐहिक र्‍हासाची कल्पना आपल्याला येऊ लागली आणि त्यानंतर राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद यांच्यापासून अनेक धर्मसुधारकांची मालिका उभी राहिली. या पार्श्वभूमीवर भारताची राज्यघटना ही जवळजवळ हजार-बाराशे वर्षांनंतर आधुनिक मूल्यांवर निर्माण झालेली नवी स्मृतीच आहे, परंतु या नव्या स्मृतीमागच्या आधुनिक मूल्यांची आणि आपल्या सामाजिक र्‍हासपर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच्या मूल्यांची सांगड घालणे आवश्यक आहे. आठव्या व नवव्या शतकांत सुरू झालेल्या आणि त्यानंतर इस्लामी पारतंत्र्याच्या राजवटीने दृढमूल झालेल्या परंपरेची बीजे इतक्या खोलवर रुजली आहेत की त्यातून निर्माण झालेले सामाजिक प्रश्न दूर करण्याचा निग्रहपूर्वक प्रयत्न केला नाही, तर आधुनिक युगाला आवश्यक असलेली सामाजिक व आर्थिक गतिमानता येणे शक्य होणार नाही. धर्म हा अर्थ आणि कामयांच्या निरोगी उपभोगाकरिता असतो. त्यातील सांगितलेला संयमहा अंतिमसुखाचा पाया या नात्याने कामकरीत असतो.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणासंदर्भात जी विधाने केली, त्याविरोधात सनातनी वृत्तीतून जी टीका केली जाते, त्याचा या पार्श्वभूमीवर विचार करणे आवश्यक आहे. गाय ही प्राचीन काळापासून आपणाकडे कृषी संस्कृतीच्या प्रगतीचा मूलभूत घटक मानली गेली आहे. गाईंच्या संख्येच्या रूपात प्राचीन काळात श्रीमंती ठरविली जात असे. गाईंच्या उपयुक्ततेला कृतज्ञतेची जोड देऊन तिच्याभोवती धार्मिक श्रद्धेचे अधिष्ठान दिले गेले. हे केवळ गाईपुरतेच मर्यादित नव्हते, तर कुळागारांत झाडांपासून अनेक बाबतीत हा सांस्कृतिक दृष्टिकोन दिला गेला होता. गाईच्या बाबतीत काळाच्या ओघात उपयुक्ततेचा दृष्टिकोन विस्मरणात गेला आणि आंधळा श्रद्धाभाव तेवढा शिल्लक राहिला. त्यामुळे आज समाजात विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे. गाईच्या उपयुक्ततेकडे लक्ष देऊन तिच्या दुधाचे उत्पादन वाढविणे, ती कृषी अर्थकारणाला साह्यभूत ठरेल अशा रितीने तिच्याबाबत संशोधन करणे, यावर वैज्ञानिक दृष्टीने आर्थिक गुंतवणूक करणे यापेक्षा गोशाळांमागून गोशाळा उभ्या करीत राहणे म्हणजेच गाईसंदर्भातील श्रद्धाभाव जोपासणे असा अर्थ केला गेला आहे. गाईला दिला जाणारा चारा, गाईला पोषक अशी गोशाळांची रचना, त्यांची चांगली निगा राखण्याची व्यवस्था या गोष्टी अनेक गोशाळांत केल्या जात नाहीत. अशा व्यवस्था करणे गोशाळांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, परंतु या सर्वांवर लक्ष केंद्रित न करता गोरक्षणाच्या नावाखाली गोमांसाच्या संशयित धारकांना व वाहकांना मारहाण करण्यामध्येच आपले शौर्य आहे, असे मानणाराही एक वर्ग तयार झाला आहे. गोहत्या, गोमांसाची विक्री आणि गोमांस खाणे यात जेवढे पाप मानले जाते, उद्या तेवढेच पाप गाईचा आजच्या युगात उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने विचार न करता केवळ गोशाळांत त्यांना कोंडून ठेवण्यातही मानले जाईल. या गोष्टीची जाणीव झाल्याशिवाय हा प्रश्न खर्‍या अर्थाने सुटणार नाही. पुण्य तेच की जे समाजाच्या सामूहिक उत्कर्षाला कारणीभूत ठरते, ही भावना पुन्हा एकदा दृढमूल झाल्याशिवाय भारताचे ऐहिक परिवर्तन शक्य होणार नाही. भारताचे पुनरुत्थान होण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत, परंतु पुनरुत्थान होण्याकरिता मूल्याधिष्ठित व सामूहिक ऐहिकाकांक्षी वातावरणाची गरज असते. प्रश्न गाईच्या निमित्ताने असला तरी आपली जीवनविषयक मूल्ये कोणती असली पाहिजे याची सर्वंकष दृष्टी त्यातून स्पष्ट होते. या निमित्ताने याचा विचार केला पाहिजे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121