सध्या लिननच्या साड्या खूप लोकप्रिय आहेत. लिननचा धागा वापरून विणलेल्या साड्या पॉप्युलर करायचं श्रेय आनाविला मिश्रा नावाच्या डिझायनरला जातं. आजकाल कुठल्याही वर्तमानपत्राचं पेज थ्री पान उघडलं तर कोणती ना कोणती सेलेब्रीटी बाई आनाविलाच्या लिनन साड्या नेसून मिरवताना दिसेल. पण हे लिनन प्रकरण आहे तरी काय?
लिनन म्हणजे तागाच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला धागा. हा धागा वापरून विणलेलं कापड हे सुती कापडापेक्षा वजनाला जड आणि जास्त चमकदार असतं. लिननचा धागा कापसाच्या धाग्याच्या मानाने जास्त चिवट आणि तुटायला कठीण असतो. लिननचे कपडे वापरायला खूप सुटसुटीत आणि हवेशीर असतात. डाय न केलेल्या नैसर्गिक लिननच्या धाग्याचा रंग पिवळसर किंवा राखाडी असतो.
सुती कापडाच्या मानाने लिननच्या धाग्यावर रंग चढवायला जरा जास्त वेळ आणि मेहनत लागते त्यामुळे लिनन सुती धाग्यापेक्षा महाग पडतं, पण कापसापेक्षा तागाच्या लागवडीला त्यामानाने खूप कमी पाणी, खत व निगराणी लागते. भारतामध्ये तागाची लागवड उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेश मध्ये होते. भारतातल्या प्रखर उन्हाळ्यासाठी लिनन हा खरोखरच चांगला पर्याय आहे, पण लिनन फार पटकन चुरगळतं, आणि सुती कापडाच्या तुलनेत बरंच महागही पडतं.