पुण्यातील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाषण देताना रक्षामंत्री मनोहर पर्रीकर
आपल्या देशातली पारंपारिक प्रसार माध्यमं, विशेषतः इंग्रजी भाषेतली प्रसार माध्यमं ही सध्या संसदेबाहेरचा विरोधी पक्ष म्हणून सरकारविरोधत काम करत आहेत हे सत्य कुठलाही सुजाण, सुबुद्ध भारतीय नागरिक जाणतो. त्यामुळे जाणून-बाजून सत्याचा विपर्यास करणे, मोदी सरकारमधल्या मंत्र्यांनी न उच्चारलेले शब्द त्यांच्या तोंडी घालणे. अख्ख्या भाषणातले एकच वाक्य संदर्भ सोडून उचलणे आणि त्याला भरपूर मीठ-मसाला लावून त्याची 'बातमी' करणे वगैरे प्रकार सध्या मेनस्ट्रीम मीडिया मध्ये सर्रास चालू असतात. त्यातही संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे जरा प्रसारमाध्यमांचे जास्तच लाडके. पर्रीकर बोलतात कधी आणि आपण त्यांच्या भाषणाचा विपर्यास करतो कधी ह्याची जणू इंग्रजी प्रसार माध्यमे वाटच बघत असतात.
गेल्या शनिवारी पुण्यात असाच प्रकार घडला. प्रसिद्ध पत्रकार नितीन गोखले ह्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी पर्रीकर बोलत होते, तेव्हा त्यांच्या भाषणातील एक वाक्य मुद्दामहून वेगळे काढून, त्यांनी जे शब्द म्हटलेच नाहीत ते त्यांच्या तोंडी घालून मुद्दामहून प्रकरण पेटवण्याचा खोडसाळ प्रयत्न इंडियन एक्स्प्रेस ह्या वृत्तपत्राने केला. ह्या देशाचे नागरिक म्हणून ह्या देशात राहत असताना ह्या देशाविरुद्ध भावना भडकवायचा अधिकार कुणालाही नसावा हा मुद्दा स्पष्ट करताना संरक्षणमंत्र्यांनी नाव न घेता एका प्रसिद्ध अभिनेत्याचे उदाहरण दिले.
संरक्षणमंत्री म्हणाले की 'एका अभिनेत्याने ही चूक केली. त्याने म्हटलं की माझी बायको परदेशी जाऊन राहू इच्छिते. इट व्हॉज एन ऍरोगंट स्टेटमेंट. माझं घर कितीही छोटं असलं, माझं कुटुंब कितीही गरीब असलं तरी माझं माझ्या घरावर, कुटुंबावर प्रेम असलंच पाहिजे... ह्या एक्टरने जेव्हा हे केलं तेव्हा ज्या कंपनीला तो एडव्हर्टाइज करत होता..त्या कंपनीपास्नं अनेक लोकांनी संबंध तोडले, आणि काही लोक जास्त हुशार लोक असतात आपल्या देशात त्यांनी तर ऑर्डर्स दिल्या आणि परत पाठवल्या... मला माहित आहे. There was a team which I know which was working on this. They were telling people you order and return. They had to pull out his advertisement.' ह्या भाषणाचा व्हिडियो नितीन गोखले ह्यांनी ट्विट केला, तो जर बघितला तर हे लक्षात येईल.
संरक्षण मंत्र्यांनी म्हटले होते 'काही लोक', इंडियन एक्स्प्रेसने त्यातले 'काही लोक' हे शब्द गाळून त्याच्याऐवजी 'आपले लोक' हे शब्द टाकले, आणि पर्रीकरांच्या भाषणाला मुद्दामहून वेगळा रंग दिला. सागरिका घोष, शेखर गुप्ता वगैरे भाडोत्री पत्रकार वाट बघत होतेच, त्यांनी लगेच जणू पर्रीकर भाजपच्या लोकांविषयी बोलत आहेत आणि भाजप सरकारने अश्या लोकांना धडा शिकवायला 'आपल्या लोकांची' टीम बनवलीय असे चित्र रंगवणारे ट्विट केले. संसदेबाहेरच्या विरोधी पक्षाने अशी आघाडी उघडताच संसदेतले विरोधी पक्ष कसे मागे राहतील? काँग्रेस प्रवक्ता सुरजेवाला ह्यांनी लगेच 'भाजप 'दलित आणि अल्पसंख्यांक लोकांची' मुस्कटदाबी करतोय, हाच राजधर्म आहे का?' असे ट्विट केले.
'ध चा मा' करणे हा प्रकार महाराष्ट्राला नवीन नाही. एका आनंदीबाईने स्वतःच्या आणि नवऱ्याच्या सत्तालालसेपोटी 'ध चा मा' केला आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेला. स्वतःच्या स्वार्थासाठी सत्याचा बळी देणाऱ्या अश्या आनंदीबाई आज आपल्याला भारतातल्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये पदोपदी दिसतील. त्या आनंदीबाईंना शिक्षा सुनावणारे निःस्पृह रामशास्त्री प्रभुणेही त्या काळात होते. मिडियामधल्या ह्या आनंदीबाईंना कोणते न्यायासन शिक्षा देईल?
मनोहर पर्रीकर यांच्या भाषणानंतर इंडियन एक्स्प्रेसने केलेली बातमी: