गोव्यातल्या माझ्या गावात बरीच वर्षे एक अट्टल दारुड्या राहायचा. डोक्यानेही अंमळ अधू. सकाळी उठल्या उठल्याच बहुधा त्याचं ‘तीर्थप्राशन’ सुरु व्हायचं. कारण भर सकाळी साडे-नऊ दहाच्या सुमारास त्याची स्वारी झुलत झुलत बाजारातल्या चौकात उभी असायची. विमान बरंच वरपर्यंत पोचलं की त्या माणसाला भांडायची जबरदस्त खुमखुमी यायची. मग स्वतःच तो शेजारून निमूट आपल्या कामाला चाललेल्या एखाद्या माणसाला उगाचच धक्का मारायचा आणि भांडायला सुरवात करायचा, ‘तू मला धक्का का दिलास? हिंमत असेल तर ये, भांड माझ्याशी. मी कुणाला घाबरत नाही’, असं तारस्वरात परत परत ओरडत तो लोकांच्या अंगावर धावून जायचा. अर्थात गावातले लोक त्या दारुड्याला व्यवस्थित ओळखून होतेच, त्यामुळे ते काही त्याचं बोलणं मनावर घ्यायचे नाहीत. उलट दोन मिनिटं स्वतःची करमणूक करून घेऊन, पोटभर हसून आपल्या कामाला निघून जायचे. दारुड्या उगाच रुबाबात विजयी स्मित करायचा आणि अडखळत म्हणायचा, ‘बघा, सगळे मला घाबरतात. कारण मी ‘बुदवंत’ (बुद्धीवंत) आहे!’
आजकाल अखिल विश्वाचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल ह्यांची मुक्ताफळे ऐकली की मला हटकून माझ्या गावातला तो वेडा दारूड्या आठवतो. न भूतो न भविष्यती असे बहुमत मिळून दिल्लीत सत्तेवर आलेले केजरीवाल आजकाल फक्त त्यांच्या आक्रस्ताळेपणासाठी आणि नित्य नव्या नाटकांसाठी प्रकाशझोतात आहेत ही बाब काही त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी निश्चितच भूषणावह नाही. ‘मोदी भ्याड आणि सायकोपाथ आहेत’ असल्या शब्दात जर एका राज्याचा मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध ट्विट करतो, तेव्हा नक्की कुठली व्यक्ती मानसिक विकृतीची शिकार आहे हे समजण्याइतकी भारताची जनता नक्कीच शहाणी आहे.
मुख्यमंत्री झाल्यापासून केजरीवाल हे फक्त त्यांच्या मोदीविरोधी बेताल वक्तव्यांसाठीच प्रसिद्ध आहेत. नुकताच तर त्यांनी कहरच केला. एका व्हिडियो स्टेटमेंटमध्ये त्यांनी ‘पंतप्रधान मोदी ह्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. मोदीजी माझा वध घडवून आणू शकतात’ असे सनसनाटी वक्तव्य केले आहे. केजरीवाल ह्यांच्या पक्षाचे आमदार सध्या दिल्ली विधानसभेत कमी आणि पोलीस कोठडीत जास्त दिसतात. त्यांच्या पक्षाचे खासदार भगवंत मान ह्यांनी संसद भवनाची गोपनीय सुरक्षा व्यवस्था एका व्हिडियो द्वारे उघड केल्यामुळे ते सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. असे असताना देखील केजरीवाल स्वतःच्या पक्षाकडे न लक्ष देता मोदीअपराधसहस्त्रनामाचा जप करण्यात मग्न आहेत. बाकी केजरीवाल जितक्या वेळा मोदींचे नाव घेतात तितक्या वेळा अर्जुनाने देखील श्रीकृष्णाचे नाव घेतले नसेल!
स्कित्झोफ्रेनिया ह्या मानसिक आजारात रुग्णाला अश्या प्रकारचे भास होऊ शकतात असे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘सारे जग माझ्या विरोधात आहे. मला मारण्याची कारस्थाने सगळे लोक करत आहेत’ असे सतत वाटत राहणे’ हे ह्या रोगाचे एक महत्वाचे लक्षण आहे. केजरीवाल ह्यांना जर हा रोग झाला असेल तर ते परत परत बंगळुरला योगाभ्यासासाठी जातात तेथेच भारत सरकारची मानसिक आजारांवर संशोधन करणारी NIMHANS ह्या नावाची संस्था आहे त्या संस्थेलाही त्यांनी जरा भेट दिली तर बरे होईल.
नमोरुग्ण हे बिरूद मोदींच्या तथाकथित ‘भक्तां’पेक्षा अरविंद केजरीवाल ह्यांनाच जास्त चपखल लागू पडेल अशी सध्यातरी त्यांची परिस्थिती आहे. एके काळी ह्याच केजरीवाल ह्यांच्याकडे तरुणाई ‘भारतीय लोकशाहीचा नवा उगवता तारा’ ह्या आशेने बघत होती, पण आता केजरीवाल ह्यांचे एकूण कर्तृत्व बघता ते आणि त्यांचा पक्ष म्हणजे भारतीय लोकशाहीला लागलेले खग्रास ग्रहण आहे असेच म्हणावे लागेल!
करुणानिधी ह्यांची जबरदस्त सत्तालालसा, लालू यादवचा कावेबाजपणा, मायावतीचा नाटकीपणा, शरद पवार यांचा पाताळयंत्रीपणा, मुलायम सिंग यादव ह्यांचा मुस्लिमानुनय, ममता बॅनर्जी ह्यांचा आक्रस्ताळेपणा, राहुल गांधींची प्रसिद्धीलोलूपता आणि दिग्विजय सिंग ह्यांचा निष्काम निर्लज्जपणा.... ह्या सर्व असामान्य गुणांचं मिश्रण करून झाडूने रंगवलेले चित्र म्हणजे अखिल विश्वाचे मुख्यमंत्री श्री केजरीवाल..