जद : निधर्मी राष्ट्रवादाचा हिंदुत्ववादी प्रवक्ता

    29-Jul-2016
Total Views |

आपल्याकडे बौद्धिक क्षेत्रात ‘सेक्युलॅरिझम’, ‘निधर्मीपणा’, ‘इहवाद’ या शब्दांची चलती आहे. या शब्दांचा वापर करून हिंदुत्वावर ‘जातीय’ म्हणून टीका करायची, हे पुरोगामित्वाचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे ‘निधर्मी राष्ट्रवादा’चा कोणी ‘हिंदुत्ववादी प्रवक्ता’ असू शकतो, ही कल्पनाच त्यांना सहन होणारी नाही; परंतु १९५० साली त्यांनी ’हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व’ हे प्रबंधात्मक पुस्तक जदंनी लिहिले. हे पुस्तक वाचल्यावर स्वा. सावरकरांनी त्यांची प्रशंसा तर केलीच, पण हा आपला वैचारिक वारसा चालवू शकतो, असे संकेतही दिले. त्यानंतर जदंनी ‘सा. विवेक’, ‘तरुण भारत’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’, ‘धर्मभास्कर’ आदी नियतकालिकांतून विपुल लिखाण केले. ’आधुनिक राष्ट्रवाद’ त्यांच्या लिखाणाची प्रमुख प्रेरणा होती.

गेल्या चारपाचशे वर्षांत युरोपियन देशांत राष्ट्रवादाचा विकास झाला व आजचे आधुनिक जग आकाराला आले. त्याआधी युरोपमध्ये चर्चची सत्ता निर्णायक होती. राजे कोण असावेत? देशांच्या सीमा कोणत्या असाव्यात? कायदे कोणते असावेत? एवढेच काय समुद्राच्या कोणत्या भागावर कोणत्या देशाने चाचेगिरी करावी, याबाबतचे सर्व निर्णय चर्च घेत असे. तिथले राज्यकर्ते हे चर्चप्रणीत धर्माचे समर्थक असणे ही पूर्व अट असे. नंतर जशी चर्चमध्ये कॅथलिक व प्रोटेस्टंट अशी फूट पडली तसे त्याचे तिथल्या राजकारणावरही परिणामझाले. परंतु, जसा वैज्ञानिक प्रगतीबरोबर बौद्धिक विकास होऊ लागला, तसतसे अदृश्य ईश्वरावर विश्वास ठेऊन कायदे करण्यापेक्षा लोकांच्या ऐहिक गरजांचा विचार करून कायदे करणे आवश्यक आहे, हा विचार रूजू लागला. पण हा विचार मांडणे व त्या आधारावर परिवर्तन घडवून आणणे ही सोपी प्रक्रिया नव्हती; परंतु तिथले विचारवंत निर्धाराने लढा देत राहिले व त्याचा परिणामआजच्या युगात सर्वमान्य झालेली ‘राष्ट्र’ संकल्पना. आज ’राष्ट्र’ ही संकल्पना एवढी स्वाभाविक बनली आहे की कोणत्याही व्यक्तीला आपल्या अस्तित्वासाठी कोणत्या ना कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारावेच लागते. असे असूनही राष्ट्रनिर्मितीची ही प्रक्रिया कशी घडली याबाबत आपल्याकडे सार्वत्रिक अज्ञान आहे. युरोपमधल्या राष्ट्रवादाच्या संघर्षामध्ये धर्मनिष्ठेला प्राधान्य द्यायचे की राष्ट्रनिष्ठेला, हा विचार केंद्रस्थानी होता. राज्यकर्त्याला निर्णय घेण्याचे सार्वभौमअधिकार आहेत, हे वास्तव जेव्हा युरोपीय देशात, विशेषतः पश्चिमयुरोपीय देशात प्रस्थापित झाले तेव्हा इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आदी पश्चिमयुरोपीय देशांचाही विकास वेगाने झाला. या देशांनी चर्चचे नियंत्रण झुगारून दिले व त्यामुळे बौद्धिक स्वातंत्र्याचा मार्ग खुला झाला. ‘लोकशाही’, ‘इहवाद’, ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ आदी संकल्पना समाजमनात रुजल्या. सांप्रदायिक भावना सामाजिक क्षेत्रातून हटवली गेली व ती फक्त व्यक्तिगत जीवनात उरली. तीच बाब दुसर्‍या महायुद्धानंतर कम्युनिस्ट देशाबाबत घडली. पूर्व युरोपीय देशातील राष्ट्रवादी भावनांना पायदळी तुडवून रशियाने त्या देशात कम्युनिझमची स्थापना केली. तिथेही राष्ट्रनिष्ठा व कम्युनिझमवरची निष्ठा यांच्यात द्वैत निर्माण झाले. जोवर रशियन राजसत्ता प्रबळ होती, तोवर ती राष्ट्रवादी भावनांना चिरडून टाकण्यात यशस्वी ठरली; परंतु जेव्हा तीच दुबळी झाली तेव्हा सर्व युरोपीय देश तर स्वतंत्र झालेच, पण सोव्हिएत युनियनमधल्या देशांनाही स्वातंत्र्य मिळाले.

युरोपमध्ये राष्ट्रवादाचा कसा विकास झाला याचा अभ्यास जदंचा अत्यंत आवडता अभ्यासाचा विषय होता. अगदी शेक्सपीअरच्या नाटकातील वाक्ये देऊन, आंतरराष्ट्रीय निष्ठेला विरोध, राष्ट्रवादातील भूमिनिष्ठेचे महत्त्व, राष्ट्राभिमान ही मूल्ये त्याच्या नाटकात कशी आलेली आहेत याची उदाहरणे त्यांनी दिली आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून मुस्लीमसमाजाने आपला वेगळेपणा स्पष्ट केला होता. हिंदू-मुस्लीमप्रश्न हा धार्मिक प्रश्न आहे, असे समजून त्याचे त्यावेळीही विवेचन केले जात असे व आजही केले जाते; परंतु हिंदू-मुस्लीमप्रश्न हा वरवर पाहता धार्मिक प्रश्न वाटत असला तरी त्याचे मूळ स्वरूप हे आधुनिकतेला हे दोन समाज कसे प्रतिसाद देतात, त्यावर तो अवलंबून होता. आपल्या पारंपरिक धार्मिक श्रद्धांमध्ये बदल करून आपण आधुनिक मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे, असा परिवर्तनाचा प्रवाह हिंदू समाजात प्रभावी होत होता. हिंदूंमधली जागृत होणारी राष्ट्रीय भावना ही राष्ट्र बलवान होण्यासाठी ऐहिक प्रधानतेवर भर देणारी होती. याउलट मुस्लीमसमाजातील जागृती ही त्या समाजातील मध्ययुगीन धार्मिक श्रद्धांना व त्याआधारे राष्ट्रवादापेक्षा आंतरराष्ट्रीय मुस्लीमसमुदायाच्या ‘कौम’ या भावनेला प्रबळ करणारी होती. या दोन्ही समाजाच्या जागृतीचे प्रवाह हे उलट्या दिशेने जात होते. स्वातंत्र्यानंतरही त्या स्थितीत फार बदल झाला नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर हिंदूंनी मुस्लीमसमाजाशी मैत्री केली पाहिजे, याचा व्यावहारिक अर्थ मुस्लीममध्ययुगीन श्रद्धांना खतपाणी घालणे असा झाला. मुस्लीमसमाजामध्ये आधुनिक राष्ट्रवादाच्या आधारावर परिवर्तन झाले पाहिजे, असा विचार मांडणे म्हणजे तो ‘हिंदू जातीयवाद’ ठरला. हमीद दलवाई यांच्यासारख्या खरोखरच्या मुस्लीमपुरोगाम्यांनी असा विचार मांडण्याचे प्रयत्न केले तेव्हा त्यांना जनसंघाचे मित्र ठरविले गेले. या पार्श्वभूमीवर जद आधुनिक जगात घडणार्‍या घडामोडींचा संदर्भ देत, प्रत्येक देश हा आपल्या राष्ट्रीय अस्मितेबाबत किती जागरूक असतो याची उदाहरणे देत. त्यातील एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. केनेडी ज्यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांच्या कॅथलिक असण्यावरून तिथे चर्चा सुरू झाली. तोपर्यंतचे सर्व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे प्रोटेस्टंट होते. केनेडी हे कॅथलिक असल्याने जेव्हा पोपची आणि त्यांची भेट होईल तेव्हा ते एका सश्रद्ध कॅथलिकासारखे वागतील की अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून एका राष्ट्राध्यक्षाप्रमाणे वागतील? असा तो प्रश्न होता. त्यावर केनेडी यांनी एक पत्रक काढून अशा भेटीच्या वेळी आपण एक सश्रद्ध कॅथलिक म्हणून वागण्यापेक्षा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून वागू, अशी ग्वाही दिली. जदंनी एका लेखात त्या पत्राचा दाखला देऊन त्यापुढे एकच प्रसंग लिहिला. जेव्हा केनेडी आणि पोप यांची भेट झाली तेव्हा एका कॅथलिकाप्रमाणे गुडघ्यावर झुकून पोपच्या हाताचे चुंबन न घेता एका राष्ट्राध्यक्षाप्रमाणे त्यांच्याशी हस्तांदोलन केले. हिंदुत्व म्हणजे परंपरेचा आंधळा गौरव नसून त्याचा चिकित्सकपणे केलेला स्वीकार, अशी त्यांची धारणा होती. त्यातूनच त्यांनी ‘भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा’ हा ग्रंथ लिहिला. त्याला ना. ग. गोरे यांनी प्रस्तावना लिहिली.

आंधळा धर्माभिमान व धर्मनिष्ठा ही इहवादाच्या विरोधात असते. हिंदू सांस्कृतिक परंपरा अशा चिकित्सेतूनच घडली असल्याने त्या समाजाला आधुनिक मूल्यांवर आधारित घटनेचा स्वीकार करण्यात अडचण आली नाही; परंतु मुस्लीमसमाजात अशा चिकित्सेचा अभाव असल्यामुळे भारतातील निधार्मिकता संकटात आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. तुर्कस्थानमधील खलिफाची राजवट संपवून तेथे निधर्मी राज्याची स्थापना करणारा केमाल पाशा हा जदंचा स्वाभाविकच आवडता असलेला राष्ट्रनिर्माता होता. केमालने तुर्कस्थानातील मध्ययुगीन धार्मिक परंपरेवर आधारित कायदे समाप्त करून आधुनिक युरोपियन कायदे आणले व तिथल्या निधार्मिकतेचे रक्षण करण्याचे कामलष्करावर सोपविले. पण इस्लामी जगात जी धार्मिक पुनरूज्जीवनाची लाट आली आहे तिचा तुर्कस्थानमध्येही कसा परिणामझाला याचे वर्णन मागच्या शुक्रवारच्या स्तंभात किरण शेलार यांनी केले आहे. जर भारतातील मुस्लिमांना खरोखरच आंतरराष्ट्रीय जिहादी, दहशतवादी मुस्लीमचळवळीपासून वाचवायचे असेल, तर त्यांच्यावरील धार्मिक प्रभाव कमी करून राष्ट्रीय विचारांचा प्रभाव वाढविला पाहिजे. हे करण्यासाठी जदंचे आधुनिक राष्ट्रवादावरील विवेचन मार्गदर्शक ठरेल.

  

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121