भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक खरे, पण राष्ट्रपतीपदावरच्या व्यक्तीचा आणि भारताच्या सामान्य नागरिकांचा सहसा संबंध येत नाही त्यामुळे राष्ट्रपतीपदावरची व्यक्ती ही सामान्य जनतेमध्ये लोकप्रिय असतेच असं नाही. पण एक असा असामान्य माणूस ह्या देशाचा राष्ट्रपती होऊन गेला ज्याचे आचार आणि विचार आजही लाखो भारतीयांना प्रेरणादायी वाटतात. त्या माणसाचं नाव होतं अवुल पकीर जैनुद्दीन अब्दुल कलाम. आज कलाम ह्यांचा प्रथम स्मृतिदिन.
तामिळनाडू मधल्या रामेश्वरम जवळच्या पंबम ह्या छोट्या बेटावर एका गरीब तामिळ मुस्लिम कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे खूप मोठा शास्त्रज्ञ झाला. लहानपणी गरिबीमुळे कलाम ह्यांना घरोघरी पेपर विकावे लागले होते. शिक्षणाची त्यांची ओढ त्यांना रामेश्वरम बाहेर घेऊन गेली. चेन्नई इथल्या मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी भौतिकशास्त्राचं शिक्षण घेतलं. कलाम ह्यांना भारतीय वायुदलात फायटर पायलट म्हणून जायचं होतं पण अगदी थोडक्या गुणाने त्यांची वायुदलातली निवड हुकली. पुढे हेच कलाम भारताचे राष्ट्रपती म्हणून तिन्ही भारतीय संरक्षण दलांचे सुप्रीम कमांडर झाले!
मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून शिक्षण पूर्ण करून डॉ. कलाम डीआरडीओ मध्ये कामाला लागले. डीआरडीओ ते इसरो हा त्यांचा प्रवास त्यांनीच विकसित केलेल्या मिसाईल्स इतकाच दैदिप्यमान होता. पोखरण २ चा अणुस्फोट असो वा भारतीय उपग्रह अवकाशात सोडणे वा अग्नी व पृथ्वी हे मिसाईल बनवणे असो, भारताच्या वैज्ञानिक वाटचालीमध्ये कलाम ह्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा होता. डॉ. कलाम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ तर होतेच, पण ते हाडाचे शिक्षक होते. त्यांच्या भाषणातून, लिखाणातून नेहमी भारतीय विद्यार्थ्यांविषयी वाटणारी त्यांची तळमळ दिसून येई.
२००२ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात डॉ. कलाम ह्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली. विज्ञानाला आयुष्य वाहून घेतल्याने ते आजन्म अविवाहित राहिले. ते दिल्लीमधल्या भव्य अश्या राष्ट्रपतीभवनात राहायला गेले तेव्हा त्यांचं बरोबर होत्या वैयक्तीक सामानाने भरलेल्या फक्त दोन सुटकेसेस आणि पुस्तकांची खोकी! २००७ मध्ये ते जेव्हा राष्ट्रपतीपदावरून पायउतार झाले तेव्हाही त्यांचं सामान तितकंच होतं. विरंगुळा म्हणून वीणा वाजवणाऱ्या, अध्यात्मिक समाधानासाठी नमाज पढणाऱ्या आणि तितक्याच भक्तिभावाने भगवदगीता वाचणाऱ्या ह्या जगावेगळ्या माणसाचं फक्त एकच ध्येय होतं. ह्या देशातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी रुजवणं, त्यांचा मेंदू, त्यांचे विचार प्रज्वलित करणं. त्यांच्या एका अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचं नावही तेच होतं, 'इग्नायटिंग माईन्डस'!
राष्ट्रपतीपदावरून ते निवृत्त झाले तेव्हाही डॉ. कलाम घरी स्वस्थ बसले नाहीत. विविध शाळांमधून, महाविद्यालयांमधून सतत व्याख्यानं देत राहिले. आयुष्यभर कार्यरत असलेल्या ह्या तपस्वी कर्मयोग्याचा मृत्यू झाला तोही ते एका शिक्षण संस्थेमध्ये व्याखानाला उभे राहिले असतानाच. त्यांच्या नेहमी बरोबर असलेल्या स्वीय सहाय्यकाने ते गेल्यानंतर डॉ. कलामांच्या शेवटच्या आठवणी सांगणारा एक अत्यंत हृद्य लेख लिहिला होता, त्यामध्ये त्याने लिहिलं होतं की ते स्टेजवर बोलायला उभे राहिले त्याआधी त्यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकाला विचारलं होतं, 'तू किती वेळ असा उभा आहेस? तू थकला नाहीयेस ना?' राष्ट्रपतीपद भूषवून देखील कलाम जसे होते तसेच राहिले, साधे, सरळ, ऋजु, निगर्वी आणि आपल्या कामात परमेश्वर शोधणारे कर्मयोगी.
आजही त्यांच्या वेबसाईटवरती रोज विद्यार्थ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या हजारो व्हिजिट्स असतात. डॉ. कलाम यांचे विचार, त्यांची पुस्तकं, त्यांचं कार्य आज त्यांच्या मृत्यूनंतर देखील लाखो भारतीयांना प्रेरणा देत आहे. असे प्रेम, असा आदर खूप कमी लोकांच्या वाट्याला येतो. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मला इतकंच म्हणावंसं वाटतं की निव्वळ पुतळे उभारून ह्या माणसाचं स्मारक होणार नाही, त्याचे विचार आचरणात आणणं हीच खरी देशाने त्याच्या ह्या लाडक्या राष्ट्रपतीला वाहिलेली श्रद्धांजली ठरेल!
"मिसाईल मॅन" अब्दुल कलमांच्या पहिल्या स्मृतीदिनी भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे ट्विट: