आज २६ जुलै. कारगिल विजय दिवस. बरोबर १७ वर्षांपूर्वी ह्याच दिवशी भारताने निर्णायक लढाई करून द्रास आणि कारगिल ह्या जम्मू काश्मीरमधल्या दुर्गम भागातली महत्वाची शिखरे पाकिस्तानी सैन्याकडून परत जिंकून घेतली होती. भारत आणि पाकिस्तान मध्ये जवळ जवळ साठ दिवस चाललेले कारगिल युद्ध ह्या दिवशी समाप्त झाले.
१९९९च्या मे महिन्यात पाकिस्तानच्या ISI ह्या संघटनेच्या आशिर्वादाने पाकिस्तानी सैनिकांनी कारगिल मध्ये भारताच्या हद्दीत घुसून काही भारतीय ठाण्यांवर कब्जा केला. स्थानिक धनगरांकडून ही बातमी भारतीय सैनिकांना समजली. जिहादी दहशतवाद्यांची किरकोळ घुसखोरी असेल ह्या समजुतीने कॅप्टन सौरभ कालिया ह्या तरुण सैन्याधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पेट्रोलिंगला गेलेली भारतीय सैन्याची तुकडी शत्रूच्या हातात अलगद सापडली. सगळे आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवून पाकिस्तानी सैन्याने पाच भारतीय सैनिकांचा अनन्वित छळ करून त्यांना ठार मारले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पठाणकोटच्या हवाईदलाच्या बेसवरून कारगिलमध्ये लढाऊ विमाने पाठवण्यात आली, पण खराब हवामान आणि कारगिल-द्रासच्या अत्यंत दुर्गम डोंगररांगा ह्यामुळे भारतीय हवाईदलाला दोन विमाने आणि एक हेलिकॉप्टर गमवावे लागले. पाकिस्तानी हवाई हद्दीत इमरजेंसी लॅण्डिंग केलेले फ्लाईट लेफ्टनंट नचिकेत युद्धबंदी झाले. त्यांच्या बरोबर असलेल्या स्क्वा. लीडर अजय शुक्ल ह्यांनीही इमरजेंसी लॅण्डिंग केले होते पण पाकिस्तानी सैनिकांनी त्यांनाही हाल-हाल करून ठार मारले.
ह्यामुळे चिडलेल्या भारतीय सैनिकांनी नेटाने चढाई करून पाकिस्तानी सैन्याने काबीज केलेली सर्व ठाणी परत जिंकून घेतली. १३ जम्मू काश्मीर रायफल्स, गोरखा रेजिमेंट, जाट रेजिमेंट आणि १८ ग्रेनेडीयर्स ह्या भारतीय सैन्याच्या रेजिमेंटनी ह्या लढाईत अतुलनीय शौर्य गाजवले. १३ जम्मू काश्मीर रायफल्सच्या शूर सैनिकांनी हातघाईच्या लढाईत जिंकून घेतलेले टायगर हिलचे शिखर ही लढाई भारतीय जनतेच्या नित्य स्मरणात राहील.
भारताने हे युद्ध जिंकले खरे पण त्यासाठी कित्येक तरुण भारतीय सैनिकांना बलिदान द्यावे लागले. अत्यंत दुर्गम पर्वतरांगा, कमालीचे प्रतिकूल तापमान, दिवसरात्र चाललेली डोंगरांवरची चढाई ह्या कशाचीही पर्वा न करता भारतीय सैन्य लढले. जागरण झाल्यामुळे डोळ्याखाली खोल खड्डे पडलेला कॅप्टन विक्रम बात्रा हा तरुण सैन्याधिकारी अत्यंत थकलेल्या अवस्थेत देखील हसतमुखाने 'ये दिल मांगे मोर' म्हणताना आख्ख्या देशाने बघितला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना वीरमरण आलं. कॅप्टन बात्रा पुढे परमवीर चक्राचे मानकरी ठरले.
कारगिल युद्ध झाले तेव्हा खासगी प्रसारमाध्यमांनी ही बातमी लाईव्ह कव्हरेज करून लोकांपर्यंत पोचवली. त्यामुळे न्यूज मीडिया मधल्या बऱ्याच लोकांची करियर्स घडली पण कित्येक तरुण सैनिकांना त्यासाठी आपला जीव गमवावा लागला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज जवळजवळ १७ वर्षानंतर मीडियामधले हेच लोक टीव्हीवरून काश्मिरी दहशतवाद्यांची भलावण करताना दिसतात.
पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेल्या विश्वासघाताची जबर किंमत पाकिस्तानला तर मोजावी लागलीच, पण भारतीय सैन्याचं देखील खूप नुकसान झालं. आपण ही लढाई निर्णायक रित्या जिंकली खरी पण फार मोठी किंमत देऊन. आपल्या सैनिकांनी केलेल्या अपार त्यागाची कदर म्हणून आपण हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो.