महिला सुरक्षेसाठी राज्यात सज्ज होणार “शी टीम्स”

    24-Jul-2016   
Total Views |

 

 

राज्यात महिला सुरक्षा व सबलीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी अभिनव संकल्पना राबविण्याचे योजिले आहे. तेलंगणा येथील हैदराबाद आणि सायबराबाद येथे पोलिसांनी नवीनच सुरु केलेल्या “शी टीम्स” या संकल्पनेपासून प्रेरित होवून महाराष्ट्र पोलिसांनी देखील ही संकल्पना राज्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी महाराष्ट्रातील पोलिसांचे एक शिष्टमंडळ काल तेलंगणाला पाठवले. या शिष्टमंडळात एक अतिरिक्त पोलिस आयुक्त तसेच सोलापुर, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापुर येथील ४ पोलिस उपअधीक्षकांचा समावेश होता.

 

या शिष्टमंडळाने सायबराबाद येथील महिला सुरक्षेसंबंधी 'शी टीम'चे कार्य जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. या वेळी सायबराबाद येथील पोलिस आयुक्तांनी शिष्ट मंडळासोबत संवाद साधला. तसेच “महिला संबंधित गुन्हे” या विषयावर सर्व माहितीचे सादरीकरण केले.

"मी माझ्या कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प लवकरच अंमलात आणणार आहे. हैदराबादला गेलेल्या पाच जणांच्या पथकाचे प्रशिक्षण सुरू असून आज समुपदेनाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, उद्या त्यांचे शहरातील गस्त घालण्यासंबंधीचे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षित अधिकाऱ्यांचा गट परत आला की, हा गट सुमारे शंभर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना `शी टीम्स` संकल्पनेचे प्रशिक्षण देईल. आणि शक्य तेवढ्या लवकर आम्ही ही संकल्पना अंमलात आणणार आहोत.

सध्या हैदराबादचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली `शी टीम्स` उत्तम काम करते आहे. या `टीम्स`ची कामगिरी पाहून तेथील नागरिकांनी या टीम्सची संख्या वाढविण्याचे आणि त्यांना इतरही गुन्ह्यांमधील तपासाचे काम देण्याची मागणी केली आहे. "

- विश्वास नांगरे पाटील

  विशेष पोलिस महानिरीक्षक,

  कोल्हापूर परिक्षेत्र.

या नंतर महाराष्ट्र पोलिस शिष्ट मंडळ ‘शी टीम’च्या समुपदेशन सत्राला ही उपस्थित होते. या वेळी त्यांनी आरोपी आणि त्यांच्या परिवारांसोबत संवादही साधला.   

 

कशी असेल शी (ती) टीम :

महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची अनेक पथके या योजनेंतर्गत कार्य करतात. यामध्ये महिलांसंबधी कुठल्याही गुन्ह्यांविरुद्ध १०० क्रमांक डायल करुन तक्रार नोंदवता येवू शकते. या तक्रारींवर तत्काळ पाऊल उचलण्यात येते. आरोपींना पकडून शी टीम्स च्या कार्यालयात आणण्यात येते. तसेच येथे त्यांचे समुपदेशनही करण्यात येते. एकाच व्यक्ति विरुद्ध एका पेक्षा अधिक किंवा अनेक वेळेला गुन्हे दाखल झाल्यास त्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येते.

महाराष्ट्रात देखील महिला सुरक्षेसाठी अशा पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे. तसेच महिला सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रात अधिक सक्षम योजना राबिवण्यात आल्या पाहिजेत. या उद्देशाने महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातही ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शी टीम्सचे प्रमुख कार्य :

१. तेलंगाना येथे सध्या १०० शी टीम्स काम करत आहेत.

२. ज्या ठिकाणी सर्वात जास्त महिला छेड छाडच्या घटना घडत आहेत अशा ठिकाणांवर लक्ष ठेवणे.

३. छेडछाड करणाऱ्या आरोप्यांना पकडून शी टीम्सच्या कार्यालयात आणणे.

४. त्यांना व त्यांच्या परिवारांना समुपदेशन करणे.

५. सर्व आरोप्यांची नोंद ठेवणे.

६. आरोप्यांच्या कारवायांवर दर रोज लक्ष ठेवणे.

७. एकाच व्यक्ति विरुद्ध अनेक वेळेला तक्रार आल्यास त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करणे.

८. पीडितांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवणे.

९. महिला सुरक्षएविषयी विविध गावांमध्ये जावून जनगाजृतिपर कार्यक्रम आयोजित करणे.

१०. सार्वजनिक वाहनांच्या चालकांना अशी घटना घडल्यास लगेच १०० क्रमांवर कळविण्याचे आवाहन करणे. .

 कोपर्डी सारख्या अनेक घटना सध्या महाराष्ट्रात घडत आहे. राज्यातील महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पोलिसांनी या आधी देखील दामिनी पथक, तसेच प्रतिसाद अॅप अशा अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र अधिक प्रभावी पद्धतीने या समस्येचा तोडगा काढण्यासाठी या योजनेचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महिला विषयक गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121