"इस्लामी राष्ट्रच काय, पण तुर्की जातीच्या राष्ट्रांचा संघ करण्याची कल्पनाही मला अमान्य आहे. स्वत:च्या मतानुसार वागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे; परंतु शासनाला काही विशिष्ट धोरण असावे लागते. असे धोरण वस्तुनिष्ठ असले पाहिजे. भावना आणि स्वप्नरंजन याचा त्याला स्पर्शही होता कामा नये. अशा गोष्टींना टर्की लोकांनी यापूर्वी अवास्तव किंमत दिली आहे.’’ आधुनिक टर्कीचा राष्ट्रनिर्माता असलेल्या मुस्तफा केमाल अतातुर्क याचे हे विधान आहे. राष्ट्रे कशी उभी राहतात किंवा ती कशी कोसळतात? किंबहुना राष्ट्रजीवनाच्या प्रवाहात घडणार्या घटनांना कोण जबाबदार असते? या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना ती राष्ट्रे उभी करणार्या राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहावे लागते. त्यांना बाजूला सारून राष्ट्रजीवनात घडणार्या महत्त्वपूर्ण घटनांकडे पाहाता येत नाही. टर्कीमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या उठावाचे वर्णन सगळीकडे लष्करी बंड म्हणून करण्यात येत आहे. ते लष्करी बंड आहेच; परंतु लष्कराने बंड का केले याचा सूक्ष्मात जाऊन विचार करावा लागतो. असे बंड टर्कीत यापूर्वीही झाले आहे; परंतु अन्य ठिकाणी होणारी लष्करी बंडे आणि इथले बंड यातील फरक असा की, इथले लष्कर सत्ता किंवा देश ताब्यात घेण्यासाठी बंड करीत नाहीत. झिया उल हक ते मुशर्रफ हा जो पाकिस्तानला लष्कराचा सत्ता मिळविण्याचा इतिहास आहे, त्यापेक्षा हा वेगळा इतिहास आहे. टर्की हे मुस्लीमराष्ट्र असले तरी त्याला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र म्हणून उभे करण्यात केमाल अतातुर्कचा मोठा वाटा आहे. मध्ययुगीन इस्लामी समाजरचना नष्ट करून त्याने टुर्कीचे आधुनिकीकरण केले. सुलतानशाही रद्द केली. आधी ‘खलिफा’ पदाचे महत्त्व नगण्य केले आणि संधी मिळताच खलिफाला सीमापार देखील करून टाकले. केमाल पाशांनी राजनैतिक डावपेच खेळून तुर्कस्तान प्रजासत्ताक करून घेतले. टर्कीचे पहिले अध्यक्षही तेच झाले. समाजजीवन,भोजनपद्धती, वेश, शिक्षण, दिवाणी आणि फौजदारी कायदे हे सगळे इस्लामी धर्मगुरूंनी निश्चित केले होते. त्याजागी केमालनी वैज्ञानिक विचारसरणीनुसार कामकरणारे कायदे व व्यवस्था आणल्या. शासनसंस्था आणि धर्मगुरूंचे कायदे यांना त्याने पूर्णपणे वेगळे केले. प्रजासत्ताक निधर्मी होईल याची पूर्ण काळजी घेतली. मुस्लीमपरंपरेचे लक्षण असलेली फेज टोपी सर्वप्रथमत्यांनी हटवली. लष्कराने सैनिकी टोप्या घालाव्या, असे त्याने फर्मावले व त्याची अंमलबजावणी केली. जनतेनेही हा बदल स्वीकारावा म्हणून त्यांनी स्वत:च हॅट घालून फिरायला सुरुवात केली.
‘‘ज्यांचा राज्य करण्याचा वकूब कमी असतो त्यांना राज्य करण्यासाठी सोबतीला संप्रदाय लागतात,’’ असे केमाल यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी मौलवींचे साम्राज्य पूर्णपणे मोडून काढले. त्यांच्या संपत्ती आणि सुपीक जमिनी जप्त केल्या आणि इस्लामी धर्मगुरूंनाही चरितार्थासाठी सामान्य माणसासारखे कामाला जुंपले. इस्लामी कायदा रद्द करून त्या ठिकाणी जर्मन धाटणीचा व्यापारी कायदा, इटलीकडून फौजदारी कायदा आणि स्वित्झर्लंडकडून दिवाणी कायदा घेतला. बहुपत्नीत्व व जनाना बंद करण्यात आला. महिलांनाही नागरिकत्व देण्यात आले. युरोपियनांचा देश चालविण्याचा खाक्या त्यांनी पूर्णपणे आत्मसात केला होता. हे सारे केवळ पंधरा वर्षांच्या अवधीत केले. राष्ट्रपुरुषांनी राष्ट्रीय प्रश्न एका निश्चित भूमिकेतून सोडवायचे ठरविले की, ते कसे सोडविले जाऊ शकतात याचे टर्की हे उदाहरण ठरले. इस्लामी धर्मांधतेच्या पाशातून सोडवून केमालनी तुर्की अस्मिता अंगिकारायला लावली.