इंग्रजीमध्ये 'कॉट नॅपिंग' नावाचा एक वाक्प्रचार आहे. 'कॉट नॅपिंग' चा शब्दशः अर्थ घेतला तर तो 'डुलकी काढताना पकडले जाणे' असा होतो पण हा वाक्प्रचार इंग्रजी भाषेत एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामात कुचराई करताना रंगेहाथ पकडणे अश्या अर्थी वापरला जातो. काँग्रेसचे तहहयात 'युवा' नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबतीत मात्र हा शब्दप्रयोग दोन्ही अर्थांनी खरा ठरतोय.
दोन दिवसांपूर्वी लोकसभेत त्यांच्याच पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे दलित अत्याचारांबद्दल बोलत असताना त्यांच्या मागच्याच बाकावर बसलेले खासदार राहुल गांधी चक्क डोळे मिटून डुलक्या काढत होते. खर्गे बोलताना कॅमेरा सतत त्यांच्यावर रोखलेला होता त्यामुळे राहुल यांची योगनिद्रा सतत फ्रेममध्ये येत होती. अर्थात लोकसभेत एखाद्या गंभीर विषयावर चर्चा चालू असताना झोपा काढण्याची राहुल गांधी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. बरोबर दोन वर्षांपूर्वी लोकसभेत वाढती महागाई ह्या विषयावर चर्चा चालू असतानाही राहुल गांधी असेच निद्रादेवीच्या राज्यात हरवले होते आणि तेव्हाही खूप गदारोळ माजला होता.
अर्थात एखाद्या अवजड विषयावर कुणी खूप वेळ चर्चा करत असेल आणि ती चर्चा मानसिक दृष्ट्या झेपत नसेल तर एकाद्या व्यक्तीचं थकलेलं मन आणि शरीर काही काळ झोपेच्या अधीन होऊ शकतं. आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकानेच कॉलेज मध्ये असताना एखाद्या खूप लांबलेल्या लेक्चरमध्ये असा अनुभव घेतलेला असेलच, पण 'हो, थकलो होतो, लागली खरी झोप', अशी प्रांजळ कबुली राहुल गांधी किंवा त्यांच्या समर्थकांनी दिली असती तर राहुल गांधींची झोप हा एवढा वादाचा मुद्दा झालाच नसता. पण काँग्रेस पक्षाच्या दरबारी संस्कृतीत असा प्रांजळपणा शक्यच नाही. त्यामुळे राहुल गांधी झोपले कसे नव्हते हे सांगण्याची त्यांच्या पक्षामधल्या खुषमस्कऱ्यांची अहमहिकाच चालू आहे.
पुण्यातले काँग्रेसचे एक पदाधिकारी तेहसीन पूनावाला जे आपल्या बाष्कळ विधानांसाठी नेहमीच लक्ष वेधून घेतात. त्यांच्यामते राहुल झोपले नव्हते तर ते 'ध्यान करत होते. विपासना ह्या ध्यानपद्धतीत असं डोळे मिटून मन एकाग्र करता येतं हे मी स्वानुभवाने सांगतो', असे अकलेचे तारे पूनावाला ह्यांनी त्यांच्या ट्विटद्वारे तोडलेत.
आक्रस्ताळेपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या रेणुका चौधुरी तर राहुल गांधी ह्यांची भलावण करण्यात एक पाऊल पुढेच गेल्या. त्यांच्या मते राहुल गांधी झोपले नव्हते तर ते 'उन्हातून चालून आल्यामुळे डोळे मिटून आपल्या कोरड्या, तापलेल्या डोळ्यांना आर्द्रता द्यायचा प्रयत्न करत होते'.
काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी ह्यांच्या मते राहुल झोपले नव्हते तर खाली मान घालून ते हातातला मोबाईल फोन बघत होते तर ऑस्कर फर्नांडिस ह्यांच्या मते युवराज 'रिलॅक्स' करत होते. एक अलिमुद्दीन खान नावाचे कोणीतरी स्वघोषित 'राजकीय विश्लेषक' आहेत, त्यांनी तर कहरच केला. त्यांच्या मते राहुल गांधी झोपले नव्हते तर ते दलितांच्या विचारात गढून गेले होते!
इतकी सगळी हास्यास्पद कारणं देताना काँग्रेस नेत्यांच्या हेही लक्षात आलं नाही की किमान जे सांगतोय त्याच्यात एकवाक्यता ठेवावी. काँग्रेस पक्ष सतत राहुल गांधींना पक्षाचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार असंच प्रोजेक्ट करत आलाय. एखाद्या गंभीर विषयावर लोकसभेत चर्चा चालू असताना डुलक्या काढणारे हे ४६ वर्षांचे 'युवा' नेते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीचं केविलवाणं समर्थन करणारे काँग्रेस पक्षाचे दरबारी हे समीकरण निश्चितच कुणाच्याच हिताचं नाहीये, ना देशाच्या, ना पक्षाच्या!