'अल्झायमर्स डिसीज', फक्त दोनच शब्द, पण केवळ एका व्यक्तिचंच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचंच आयुष्य पार ढवळून टाकणारे. अल्झायमर्स झालेली व्यक्ती शरीराने धडधाकट असेल कदाचित पण त्या व्यक्तीचं मन मात्र दिवसागणिक कोरं होत जातं. लहान बाळ मनाची कोरी पाटी घेऊन जन्माला येतं. जशी वर्षे उलटतात तसतशी त्या पाटीवर अक्षरे उमटत जातात, शिक्षणाची, आठवणींची, कर्तृत्वाची, नात्यांची, मैत्रीची, शत्रुत्वाची, रागा-लोभाची, आनंदाची, दुःखाची. पुढे आयुष्याची संध्याकाळ होते तेव्हा माणसं ती अक्षरं परत परत गिरवण्यात रंगून जातात कारण त्यांच्या आयुष्याचा आख्खा आलेख त्या अक्षरांमधून उमटलेला असतो. वय वाढत जातं तशी त्यातली काही अक्षरं काळाबरोबर पुसट होत जातात हे खरंय, पण काही कारणाने ती मनाच्या पाटीवरची ती सारी अक्षरे ओला बोळा फिरवल्यागत पार पुसली गेली तर? त्या माणसाचं काय होतं? त्याची काळजी घेणाऱ्या त्याच्या कुटुंबातल्या लोकांची कशी फरफट होते हे दाखवण्याचा एक सेन्सिटिव्ह प्रयत्न म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ह्या दिग्दर्शक द्वयीचा नितांतसुंदर चित्रपट, अस्तु.
चित्रपटाची कथा डॉ. मोहन आगाशे ह्यांनी अत्यंत समर्थपणे रंगवलेल्या डॉ. चक्रपाणी शास्त्री ह्या व्यक्तिरेखेभोवती फिरते. त्यांना अल्झायमर्स झालाय. त्यांचा मेंदू त्यांना दगा देतोय. संस्कृतचे पंडित असलेल्या शास्त्रींना गीतेतले, उपनिषदातले उतारेच्या उतारे मुखोद्गत आहेत पण स्वतःचं, स्वतःच्या पोटच्या मुलीचं नाव त्यांच्या लक्षात रहात नाही, इतकंच काय स्वतःचा चेहेरा देखील त्यांना अनोळखी वाटतो. म्हणून ते भिंतीवरच्या त्यांच्या मुलींच्या फोटोंवर 'ह्या माझ्या मुली, चि. ईरा आणि चि. राही असं लिहून ठेवतात. स्वतःच्या फोटोवरती, इतकंच काय आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबावरती देखील त्यांना स्वतःचं नाव लिहून ठेवावं लागतं. चित्रपटातल्या एक प्रसंगात ते आपल्या मुलीला, इराला झेन तत्वज्ञानाबद्दल सांगताना म्हणतात की माणसाने नेहमी वर्तमानात जगावं. भूतकाळ, भविष्यकाळ काहीच नसतो. आपल्या हातात असतो तो फक्त आपण त्या त्या वेळेला जगतो तो क्षण. अल्झायमर्स झालेले शास्त्री खऱ्या अर्थाने झेन तत्वज्ञान जगत असतात कारण त्यांच्या भूतकाळाने त्यांची साथ सोडलेली असते.
शास्त्रींची मोठी मुलगी ईरा हिची स्वतःचा संसार, मुलं सांभाळून शास्त्रींनाही सांभाळायची कसरत चालू असते. तिच्या व्यवहारी, तार्किक बहिणीचं सोपं तत्वज्ञान असतं की अप्पा जर आता अप्पाच राहिलेले नाहीत तर त्यांना एखाद्या संस्थेत ठेवायला काय हरकत आहे? ईराच्या वाढत्या वयातल्या मुलीचंही तेच मत असतं पण ईरा मात्र अप्पानीच सांगितलेल्या पुत्रधर्मापासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. तिचा डॉक्टर नवरा तिला समजून घेत अप्पांचीही तेव्हढीच काळजी करत असतो. एक दिवस ईरा अप्पानां त्यांच्या घरातून तिच्या घरी घेऊन येत असताना त्यांना एक हत्ती दिसतो. अप्पा लहान मुलासारखे हरखून जातात. अप्पानां गाडीत थोडा वेळ एकटं ठेवून ईरा काही खरेदी करायला म्हणून बाहेर पडते. तेव्हढ्या वेळात अप्पा गाडीबाहेर पडून हत्तीच्या मागे मागे जातात. त्यांची मुलगी आणि जावई त्यांचा सगळीकडे शोध घेतात. हत्तीचा माहूत त्यांची परिस्थिती बघून त्यांना आपल्या वस्तीच्या ठिकाणी घेऊन येतो. अशिक्षित, गरीब माहूत आणि त्याची बायको अप्पानां आहे तसे स्वीकारतात. ते त्यांच्या मनाची, त्यांच्या वागण्याची चिकित्सा करत बसत नाहीत. माहुताच्या बायकोच्या, चेन्नम्माच्या डोळ्यातली अथांग माया अप्पानां जाणवते म्हणून ते तिला 'आई' अशी आर्त हाक मारतात. चेन्नम्माही त्यांना मूल समजूनच वागवते. शेवटी ईरा आणि तिचा नवरा माधव जेव्हा अप्पानां घ्यायला येतात तेव्हा चेन्नमा ईराला सांगते 'त्यांना कशाचाच भेद उरला नाही. ते देव झाले'.
अस्तु हा चित्रपट अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला भिडत जातो. अप्पांच्या मनाची पाटी हळूहळू कोरी होत जाते. अश्या माणसांच्या घरातल्या माणसांपुढे कसली आव्हानं असतात? समोर आहे तो माणूस देहाने आपल्यात असला तरी मानाने किती आपला उरलाय आणि किती परका झालाय? आणि जो माणूस मनाने आपला राहिलेलाच नाही त्याला घरी ठेवायचं, सगळे कष्ट सोसून डोळ्यांदेखत त्याच्या मनाच्या पाकळ्या हळूहळू मिटताना बघत राहायचं की व्यावहारीक विचार करून त्याची रवानगी एखाद्या संस्थेत करायची? हे सगळे प्रश्न कठीण आहेत, त्या प्रश्नांचा मागोवा घ्यायचा एक तरल, संवेदनशील प्रयत्न म्हणजे अस्तु.
चित्रपटाचा मूळ गाभा आहे अल्झायमर्स मुळे झालेला अप्पांचा स्मृतीभ्रंश, पण चित्रपटाची कहाणी उलगडते ती ईराच्या स्मृतीपटातून. त्यातही ईराचं आणि तिच्या बहिणीचं नातं, दोघींमधली सूक्ष्म स्पर्धा, ईराच्या आईचा अप्पांच्या हाताखाली काम करणाऱ्या गुप्तेबाईंबद्दल झालेला गैरसमज आणि त्यातून ईराने अकारण उराशी कवटाळून ठेवलेल्या काही कडू आठवणी ह्या सगळ्या गोष्टी कथानकात खूप समर्पक रित्या गोवल्या गेल्या आहेत. कुठेही उगाच भावनांचे उमाळे न आणताही चित्रपट अत्यंत भावस्पर्शी बनलेला आहे.
सगळेच कलाकार कसलेले असल्यामुळे अस्तु मनाला भिडतो. डॉ. आगाशे स्वतः मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे असेल कदाचित पण चक्रपाणी शास्त्रींचं स्वतःच्याच आठवणींपासूनचं, अस्तित्वापासूनचं तुटलेपण त्यांनी अत्यंत समर्थपणे रंगवलंय. इरावती हर्षेची ईरा पुत्रधर्म निभावू पहाणाऱ्या लेकीच्या मनातली घालमेल व्यवस्थित उभी करते. अमृता सुभाषची चेन्नम्मा तर निव्वळ अप्रतिम! तिला ह्या कामासाठी २०१३ साली अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालाय. अश्या ह्या अप्रतिम, भावस्पर्शी चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत यायला चक्क तीन वर्षे वाट बघावी लागली हे मराठी चित्रपट रसिकांचे दुर्दैव!