तरुण तुर्क गोंधळात गर्क?

    20-Jul-2016   
Total Views |

गेल्या आठवड्यात टर्कीमध्ये सशस्त्र क्रांतीचा अयशस्वी प्रयत्न झाला. अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान समुद्रकिनारी सुट्टी घालवायला गेले असताना टर्कीच्या सैन्यातल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले. अंकारा आणि इस्तंबूल ह्या टर्कीमधल्या दोन प्रमुख शहरात रणगाडे रस्त्यावर आले. युरोप आणि आशिया खंडांना जोडणारा बॉस्फरस नदीवरचा एक महत्वाचा पूल बंडखोर सैनिकांनी ताब्यात घेतला. काही प्रमुख सरकारी वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्या बंडखोर सैनिकांनी ताब्यात घेतल्या . पण हे बंड यशस्वी झाले नाही कारण एकतर सर्व लष्कराचा ह्यात सहभाग नव्हता आणि ही बातमी कळताच एर्दोगान ह्यांनी त्यांच्या फोनवरच्या फेसटाईम ह्या व्हिडियो अँप मधून त्यांच्या समर्थकांना आणि टर्कीच्या सामान्य जनतेला 'लोकशाही' जिवंत ठेवण्याचं आवाहन केलं.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लाखो लोक रातोरात रस्त्यावर उतरले. एर्दोगान ह्यांच्यावर निष्ठा असलेल्या पोलिसांच्या आणि लष्करातल्या काही सैनिकांच्या मदतीने बंडाचा पूर्ण बिमोड केला गेला. पण ह्या औटघटकेच्या राज्यक्रांतीत जवळ जवळ तीनशे लोक मारले गेले. जवळ जवळ तीन हजार सैनिक कैद केले गेले. अडीच हजार न्यायाधीशांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.

अजूनही टर्कीमध्ये एर्दोगान विरोधकांचा समूळ नायनाट करण्याचं काम चालू आहे. गेल्या आठवड्यात जवळ जवळ २१००० शिक्षकांना राजद्रोहाच्या आरोपावरून कामावरून काढण्यात आलं. विविध सरकारी खात्यांमधल्या एर्दोगान विरोधकांची कसून चौकशी चालू आहे. एर्दोगान ह्यांचे एकेकाळचे सहकारी आणि आता कट्टर विरोधक फेथउल्ला गुलेन ह्यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवल्याच्या आरोपावरून गेल्या एकाच आठवड्यात जवळ जवळ हजारो लोकांना कामावरून काढण्यात आलं. एर्दोगान ह्यांच्या मते ह्या फसलेल्या बंडाचे सर्वेसर्वा सध्या अमेरिकेत निर्वासित म्हणून राहात असलेले फेथउल्ला गुलेन हेच आहेत. गुलेन ह्यांना अमेरिकेने ताबडतोब टर्कीच्या हवाली करावं म्हणजे त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून कारवाई करता येईल अशी मागणी एर्दोगान ह्यांनी अमेरिकेकडे केली आहेअर्थात अमेरिकन सरकार ह्याला सहजासहजी तयार होईल असं वाटत नाही. सध्या तरी अमेरिकेने 'आम्ही टर्कीत लोकशाही सरकारचे समर्थन करतो' असा सावध पवित्रा घेतलेला आहे. मध्य-पूर्वेत सध्या इतक्या ठिकाणी यादवी चालू आहे की अमेरिकेला अजून एखादा देश त्या माळेत जाऊन बसलेला नको आहे, आणि तोही टर्कीसारखा बऱ्यापैकी पुढारलेला, नाटोचा सदस्य असलेला, इस्राएलशी राजनैतिक संबंध असलेला मुस्लिम बहुसंख्यांक देश.

खरं तर टर्कीला सशस्त्र बंड हा प्रकार मुळीच नवीन नाही. टर्कीमध्ये लष्कराने चार वेळा सशस्त्र क्रांती घडवून आणलेली आहे आणि तीन वेळा सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न असफल झालेले आहेत. टर्किश लष्कर बहुतांशी प्रगत विचार असलेल्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे आणि धर्मावर आधारित राजवट, मग ती लोकशाही मार्गाने निवडून का आलेली असेना, खूप जास्त प्रबळ होताना दिसली की की टर्किश लष्कर बंड करून उठतं हा इतिहास आहे. पण केवळ सत्ता हातात घेणं हे टर्किश लष्कराचं ध्येय नसल्यामुळे टर्कीमध्ये काही काळानंतर परत निवडणूका घेतल्या जातात आणि लोकशाही मार्गाने निवडलेलं सरकार परत सत्तेवर येतं. ह्या आधी जवळ जवळ दहा वर्षांपूर्वी टर्कीमध्ये लष्करी क्रांतीचा शेवटचा प्रयत्न झाला होता

ह्यावेळेला टर्कीमध्ये सशस्त्र क्रांतीचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण एकतर पोलीस एर्दोगान ह्याच्या बाजूने होते आणि खुद्द लष्करातही ह्या बाबतीत एकमत नव्हतं. एर्दोगान हे लोकशाही पद्धतीने रीतसर निवडणूक लढवून सत्तेवर आले खरे, पण त्यांचा प्रवास हुकूमशाहीच्याच दिशेने चालू आहे असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. टर्कीच्या राजकारणात ते इस्लामिस्ट विचारसरणीचं समर्थन करतात. त्यांना ५२ टक्के मतं मिळून ते निवडून आले खरे पण प्रागतिक, निधर्मी विचार असणारे टर्किश लोक त्यांचा कसून विरोध करतात. टर्कीचे लष्कर हे अश्या पाश्चिमात्य, प्रागतिक विचारांच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं ही वस्तुस्थिती आहे. एर्दोगान ह्यांच्या देशांतर्गत असलेलया विरोधकांना भीती वाटतेय की ह्या फसलेल्या बंडाचा फायदा घेऊन एर्दोगान लष्करामध्ये व इतर सरकारी संस्थांमध्ये आपल्याशी निष्ठा बाळगून असलेल्या इस्लामिस्ट विचारसरणीच्या लोकांचा भरणा करतील आणि देशातला प्रागतिक आवाज अधिकाधिक क्षीण होत जाईल. अमेरिका आणि यूरोप मधल्या लोकशाहीवादी देशांनाही नेमकी हीच भीती सतावत आहे. सध्या तरी हे देश एर्दोगान ह्यांनाच पाठिंबा देतील असे दिसते आहे पण मध्य-पूर्वेत अजून एक इस्लामिस्ट हुकूमशहा उदयाला येणं जगाला परवडण्यासारखे नाहीये. मध्य-पूर्वेत जे अराजक चालू आहे त्यात अजून एका गोंधळाची भर पडणं कुणाच्याच हिताचं होणार नाही.

 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा
बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121