"पृथ्वी भोवती फिरतांना जर चंद्राला असे वाटले की आपण आपल्या मर्जीने गिरक्या घेत पृथ्वी भोवती बागडतोय तर तो त्याचा भास आहे. तसेच मनुष्याला जर वाटत असेल की तो त्याच्या मर्जीने जगतो तर तो पण एक भास आहे. असे आईनस्टाईनने म्हणले आहे."
"काहीही हं!", सुमित म्हणाला.
"अरे, अगदी वर वर जरी पहिल तरी त्यात तथ्य आहेच. आपलं जीवन सूर्य-चंद्र-ग्रह-नक्षत्रां प्रमाणे चालत असते." मी म्हणालो.
"कसं शक्य आहे? मी माझ्या मर्जीने उठतो, हिंडतो, फिरतो, काम करतो, खातो-पितो, विचार करतो. मला हव तेंव्हा, हव ते करतो."
"वर वर पाहता असं वाटू शकते की तू तुझ्या इच्छेने हे सगळ करतोस. आता पहा - तू रोज सकाळी ७ ला उठतो. आवरून १० च्या आत office ला जातोस. १ ला जेवणाची सुटी असते तेंव्हा जेवतोस. संध्याकाळी ७ च्या ठोक्याला office मधून निघतोस. रात्री जेवण करून, TV पाहून, वाचन करून १२ पर्यंत झोपतोस."
सुमित तावातावाने म्हणाला, "मग, तेच तर मी म्हणत आहे. मी हे सगळ मी माझ्या मर्जीने करतो."
"आता त्यातली गंमत पहा - तुझी दिनचर्या पूर्णपणे आकाशाशी निगडीत आहे. किंबहुना आकाशातील काही घटनाच तुझा दिनक्रम चालवतात. Office सुरु होण्याची वेळ सूर्योदयावर अवलंबून आहे. जेवणाची सुटी माध्यानावर अवलंबून आहे. office सुटायची, झोपायची वेळ सूर्यास्तावर अवलंबून आहे.
"Peak traffic ची वेळ पण सूर्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ - इकडे सूर्यास्त झाला, की तिकडे हिंजेवाडीच्या रस्त्यावर traffic jam होतो!
“आकाशात सूर्य उगवतो, मावळतो आणि त्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व प्राणी उठतात, निजतात, गातात, खेळतात, खातात, विहार करतात, उमलतात, कोमेजतात वगैरे. मग आहे की नाही सूर्याची मर्जी?"
"खर आहे आबा! दिनचर्या सूर्या प्रमाणे चालते हे पटलं! सूर्याच्या शक्तीचा उपयोग माझ्या दिनचर्येसाठी कसा करून घेऊ शकतो?" सुमितने विचारणा केली.
"त्याचे बरेच मार्ग आहेत. एक आहे - आपली दिनचर्या सूर्या प्रमाणे बांधणे. असे करणारा दिवसभर सूर्याच्या energy wave वर तरंगतो. सहजच त्याला त्या wave चा फायदा करून घेता येतो. जसे - सूर्योदयाच्या तासभर आधी उठणे, सूर्य माथ्यावर आल्यावर जेवण करणे, सूर्यास्तानंतर पोटभर न खाणे, सूर्यास्तानंतर फार जागरण न करणे, इत्यादी. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेचे भान ठेवणे हे महत्वाचे."
"ते कसे ठेवता येइल?" सुमितचा पुढचा प्रश्न.
"सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेला काहीतरी ठराविक कृती केल्याने त्या वेळा पाळल्या जातात. पूर्वी सूर्योदय व सूर्यस्तला अग्निहोत्र करत, किंवा उगवत्या सूर्याला अर्ध्य अर्पण करत, किंवा त्रिकाळ संध्या करत (सूर्योदय, माध्यान व सूर्यास्त). ह्या सर्व प्रथा एक प्रकारे मनुष्याला दिवसाच्या चक्राशी बांधून ठेवत असत. आजच्या घडीला ते कसे अंमलात आणता येईल, त्यातले फायद्याचे काय आहे ते पाहून, ते आपापल्या सोयीने करावे.”
"दिनचर्या सूर्याप्रमाणे चालते, हे तर ठीक आहे. त्या पलीकडे आपल्या आयुष्यात सूर्या प्रमाणे काय काय चालते?" सुमितचे प्रश्न संपत नाहीत या गोष्टीचा आबांना फार आनंद होतो!
"निश्चित! त्या बद्दल पुढच्या भेटीत बोलू!"
If the moon, in the act of completing its eternal way around the Earth, were gifted with self-consciousness, it would feel thoroughly convinced that it was traveling its way of its own accord…. So would a Being, endowed with higher insight and more perfect intelligence, watching man and his doings, smile about man’s illusion that he was acting according to his own free will.” - Albert Einstien.