एक धागा सुखाचा..

    16-Jul-2016
Total Views |

 काही माणसं कशी जुनी नाणी जमवतात, पेंटिंग्स, मूर्ती, शिल्पांचा संग्रह करतात, तशी मी साड्या जमवते.  एखाद्या प्रदर्शनात एखादी सुंदर रेशमी हातमागावरची साडी, एखादी नाजूक धारवाडी कशिदा काढलेली  इरकली साडी, एखादी झुळझुळीत, वेगळ्या रंगाची माहेश्वरी वगैरे दिसली तर आसोसून मी ती विकत घेतेच.  माझं हे साड्यांचं वेड तसं बरंच जुनं. अगदी लहानपणापासूनचं. माझी आई महिन्यातून एकदा तरी तिचं साड्यांचं  कपाट आवरायची. तिच्या आगेमागे लुड्बुडायला मला भारी आवडायचं. तिच्या रेशमी ठेवणीतल्या साड्यांचा  तो नाकात भरून ठेवावासा वाटणारा वास, त्यांचा मऊ, मुलायम स्पर्श, माझ्या आईचा प्रेमाने उजळून निघालेला  सात्विक, सुंदर चेहेरा, माझ्या केसातून फिरणारी तिची आश्वासक, वत्सल, लांबसडक बोटं, सगळंच कसं छान,  हवंहवंसं वाटायचं. आई तिचं कपाट आवरायची ती वेळ खास आम्हा माय-लेकींचीच असायची. तिच्या साड्यांनी  वेढलेल्या त्या रंगीत, रेशमी, मऊ, उबदार कोशात आम्हा दोघींशिवाय तिसऱ्या कुणाला प्रवेश नव्हता.

  आईने तिचं कपाट उघडलं की जुन्या रेशमी वस्त्रांचा, वाळ्याच्या अत्तराचा, कापराच्या वड्यांचा असा एक सुंदर,  संमिश्र दरवळ खोलीभर पसरायचा. माझंचिमुकलं डोकं त्या वासाने हलकेच झिंगल्यासारखं व्हायचं. आई  सगळ्या साड्याकपाटातून काढून नीट सतरंजीवर पसरायची आणि एकेक साडी उलगडून, परत नीट  घडी करून, निगुतीने आत ठवून द्यायची. एकेक साडीची घडी घालता घालता माझी आई एका वेगळ्याच विश्वात  हरवून जायची. भिजलेल्या, हळव्या स्वरात आई प्रत्येक साडीविषयी बोलायची. तिचं ते बोलणं थोडंसं माझ्याशी  अन बरंचसं स्वतःशी असायचं. 'हा बघ शेफू, माझ्या आईचा बनारसी शालू, इतकी वर्षं झाली तरी कसा छान  दिसतोय, नाही?' एक सुरेख, गर्द जांभळा, रेशमी, नऊवारी शालू हलक्या हाताने उलगडत आई म्हणायची.  खरंच, त्या रेशमाची झळाळी इतक्या वर्षानंतर देखील तश्शी तजेलदार होती. शालू सुरेखच होता, गर्द जांभळा,  पदरावर नाजूक चंदेरी वेलबुट्टी आणि अंगभर इवले इवले जरीचे ठिपके. अमावास्येच्या काळोख्या रात्री आभाळ  चांदण्यांनी फुलून यावं तशी भासायची ती साडी मला.माझ्या लग्नात मी तीच साडी नेसून बोहोल्यावर चढले.

 माझी आई साडीच्या एकेक घडीबरोबर जणू तिच्या आयुष्याचाच पट उलगडत जायची. 'ही बघितलीस, ही  गुलाबी साडी मला तुझ्या बाबांनी दिल्लीहून आणलेली, हा रंग मला आवडतो हे माहित आहे त्यांना', आई  सांगायची, त्या साडीइतकाच गडद गुलाबी रंग तिच्या चेहऱ्यावर पसरत असायचा. 'ही निळी कांजीवरम  शैलेशच्या खेपेला दिवस गेले होते ना, तेव्हा घेतली होती', ' ही पिवळी म्हैसूर सिल्क तुझ्या मामाने भाऊबीजेला  भेट म्हणून दिलेली', आई सांगत जायची, मी ऐकत जायचे. निळ्या, पिवळ्या, हिरव्या, लाल, गुलाबी अश्या त्या  रंगीबेरंगी साड्या म्हणजे माझ्या आईच्या भावनांचं इंद्रधनुष होतं. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेयस नात्यांचे  ताणेबाणे मला असे तिच्या साड्यांमधून उकलले.

 माझं लग्न ठरलं तेव्हा मला खूप आवडलेल्या माझ्या आईच्या एक-दोन साड्या मी मुद्दाम तिच्याकडून मागून  घेतल्या. त्या साड्यांना अलगद स्पर्श करताना मी मनाने पार लहान होऊन जाते परत एकदा. दुपारी दुसरं काही  काम नसलं की मी माझं कपाट उघडून आतल्या साड्या आवरत बसते. घरात असली, तर माझी लेक हमखास  येतेच बघायला. माझ्या शेजारी मला अगदी बिलगून बसते. तिला माझ्या तोंडून माझ्या साड्यांच्या गोष्टी ऐकायच्या असतात. एका गर्द हिरव्या रेशमी साडीवरून आपली कोवळी बोटं फिरवत ती लाडीकपणे विचारते, 'सांग ना  मम्मा, ही साडी कधी घेतलेली'? मी हसते आणि तिच्या कुरळ्या रेशमी बटांमधून माझी बोटं गुंफत सांगायला  सुरवात करते. ' ही साडी ना, ही मला तुझ्या अप्पाने घेऊन दिलेली पहिली साडी'. आम्हा दोघी माय-  लेकींमधल्या रेशमी नात्याची वीण त्या साडीच्या पदराइतकीच घट्ट, पक्की गुंफत जाते.


 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121