प्रतिमा निर्मितीची मानसिक भूक

    08-Dec-2016   
Total Views |
 


प्रतिमा निर्मितीची एक सम्राज्ञी परवा काळाच्या पडद्याआड गेली. वास्तव आणि प्रतिमा या दोघांचा संघर्ष मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबरच चालत आला आहे. लोकशाही व्यवस्थाच प्रतिमाप्रेमी व्यवस्था आहे; किंबहुना तिच्या जनुकीय रचनेतच या प्रतिमाप्रेमाचे गमक दडले आहे. जयललिता या अशाच प्रतिमा निर्मितीच्या तंत्रावर हुकूमत मिळविलेल्या राजकारणी होत्या. सिनेमाचं खरे जीवन मानणार्‍या तामिळनाडूत त्यांची राजकीय कारकिर्द घडली. जनसंवादाचे विद्यार्थी सिनेमा ही जरी कला असली तरी त्याला अत्यंत महत्त्वाचे संवादमाध्यमही मानतात. या माध्यमामध्ये कामकरणार्‍या मंडळींना सिनेमाचे जनसंवादातले विद्यापीठीय आकलन करता आले नाही तरी त्याचे फायदे आणि लाटेवर स्वार होण्यासाठी त्यातून मिळणारी ऊर्जा नक्कीच समजते. एमजीआर, जयललिता, करुणानिधी ही मंडळी तामिळनाडूच्या राजकारणात कॉंग्रेसला प्रभावी पर्याय उभा करू शकली ती याच प्रतिमा निर्मितीतल्या कौशल्यामुळे. लोकशाही समाजव्यवस्थेत लोकांच्या समस्या तुम्ही कितपत सोडविल्या, यापेक्षा त्यांच्या समस्यांचे प्रातिनिधिक का होईना, परंतु थेट प्रतिबिंब तुमच्या राजकीय व्यवस्थेत पाहायला मिळावे लागते, ही मजेशीर प्रकारची गरज आहे. इंग्रजीत ज्याला ‘सबकॉन्शियस लेव्हल’ म्हणतात, त्या ठिकाणाहून ती सुरू होते. जशी सुरू होते ती तशीच राहाते असेही नाही. अलगदपणे परंतु स्वत:च्या गतीने ती बदलत राहाते. कारण त्याचा संबंध मानवी भावभावनेशी आहे. जी मंडळी या गतिमान प्रक्रियेला आपल्या भावविश्वात स्थान देतात तीच जनमानसांचे प्रतिनिधी बनतात. कोळ्यांचे, शेतकर्‍यांचे, कामगारांचे प्रश्न ज्वलंत असण्याच्या काळात करुणानिधींनी एमजीआर व जयललितांना नायक-नायिकेच्या भूमिकेत केंद्रस्थानी ठेवून सिनेमाची कथानके लिहिली. या जोडीची लोकप्रियता वाढली ती अशा प्रकारच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांना सिनेमासारख्या प्रभावी माध्यमातून उत्कटपणे हात घातल्याने. जयललितांनी ३०० सिनेमांत कामकेल्याची तळटीप अनेक टीव्ही चॅनलवर त्यांच्या निधनाच्या दिवशी धावत होती. पण ३०० सिनेमांत कामकेले, यामुळे जयललिता लोकप्रिय झाल्या नव्हत्या, तर ज्या विषयांना त्यांनी हात घातला त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचल्या. ३०० सिनेमांचं काय, पण तीन हजार आठवडे चाललेल्या सिनेमात कामकेलेेल्या अनेक नटनट्या आपल्याकडे आहेत, मात्र त्यांना सिनेमाच्या पलीकडे फारसे यश लाभू शकलेले नाही. लोकांचे प्रतिनिधी होण्याचे भाग्य तर त्यांना कधीच लाभू शकले नाही. जयललितांचे यश हे इथे आहे. आंध्रमध्ये एनटीआरनी सिनेमात देवतांच्या प्रतिमा साकारल्या होत्या आणि नंतर त्याला लोकांनी राजकीय देवत्व बहाल केले. ही लोकप्रियता इतकी होती की, इंदिरा गांधींनाही खूप प्रयत्न करून एनटीआरला संपवता आले नाही.

         प्रतिमा निर्मिती तिच्या आधारावर जनमानसापर्यंत पोहोचविले जाणारे नेतृत्व ही अत्यंत सुप्तपणे चालणारी प्रक्रिया आहे. लोकशाहीत तिचे महत्त्व मोठे आहे. नेत्याला प्रत्यक्षात कधीही न भेटताही त्यांचा अनुनय करणारी माणसे आपल्याला भेटतात, परंतु एका विलक्षण सहभावनेची प्रचिती ही मंडळी घेत असतात. जनमानस तयार होण्याची प्रक्रिया ही अशी असते. नव्वदच्या दशकात जयललितांची प्रतिमा एखाद्या खलनायकाप्रमाणे होती. भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे घडलेला तुरुंगवास, वाजपेयींसारख्या लोकांच्या लाडक्या पंतप्रधानाचे पाडलेले सरकार यामुळे जयललिता देशभरात नकारात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी होत्या. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांची जी काही प्रतिमा माध्यमांनी रंगविली ती देखील तपशीलवारपणे समजून घेण्याची प्रक्रियाच आहे. जयललितांचा राजकारणी म्हणून कारभार हा खरे तर महाराष्ट्रातल्या ‘रिमोट कंट्रोल’ कारभारापेक्षाही कितीतरी अधिक हुकूमशाही पद्धतीचा होता. माध्यमांना तर त्यात स्थानही नव्हते. दिल्लीतून देशावर राज्य करणार्‍या तथाकथित मोठ्या पत्रकारांना जयललितांनी कसे वागविले याचे व्हिडिओ आता व्हॉट्‌स ऍपसारख्या माध्यमातून चवीचवीने पाहिले जात आहेत. मात्र, जयललितांच्या पश्र्चात आजही माध्यमे त्यांची अनोखी प्रतिमा निर्माण करण्याच्या कामातच हरवली आहेत. त्याचे मूळ कारण म्हणजे माध्यमेदेखील लोकांचाच एक भाग असतात आणि त्यांना देखील प्रतिमाच लागतात. ज्याला आपली प्रतिमा निर्माण करायची आहे तो हा डाव कसा मांडतो, त्यावर हे सगळे अवलंबून आहे. करुणेची मूर्ती म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभी राहाते ती मदर तेरेसांची प्रतिमा. मिशनर्‍यांच्या सेवाकार्यामागचे धर्मांतरणाचे वास्तव काही केल्या पुसता येत नाही. मात्र, मदर तेरेसांनी जाणीवपूर्वक ख्रिस्तावर बोलण्यापेक्षा सेवेवर बोलणे पसंत केले. त्यांचा वावर, त्यांच्याविषयी सांगितल्या जाणार्‍या गोष्टी, त्यांच्याभोवती गुंफलेली कथानके ही ‘सेवेची मूर्ती’ अशीच प्रतिमा निर्मिती करणारी आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे ही एक प्रकारची सामूहिक व मानसिक भूक आहे जी भागवावी लागते. त्यावर बौद्धिक चर्चा करता येत नाही. मदर तेरेसांची जी प्रतिमा निर्मिती झाली आहे, तिच्यामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतरणाच्या विषयावर कुणीही बोलू लागले, तर ते माध्यमांना आणि पर्यायाने समाजालाही आवडत नाही. इथे प्रश्न चूक की बरोबर, असा नाही. कारण, माध्यमातले वास्तवही प्रतिमा निर्मितीतूनच निर्माण झालेले असते. ही माध्यमे लोकशाहीत जनमानसाचे अभिमत निर्माण करण्याचे कामकरतात. ज्यांना यात वाघावर स्वार व्हायचे असेल त्यांना ती प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीने समजून घ्यावी लागते. ही प्रक्रिया समजलेल्या नेत्यांत बाळासाहेब ठाकरेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रतिमा निर्मितीचे कामहे अत्यंत गुंतागुंतीचे आणि लवचिक असते. अनेकदा एकातून दुसर्‍या प्रतिमाही यातून जन्माला येतात. अनेक माध्यमे यासाठी वापरावी लागतात. भाषा, संवाद, शब्द, अक्षरे आहेतच, पण त्याचबरोबर रंग, चित्र, फोटो, आकार यांचाही वापर केला जातो. बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना या पक्षाच्या नावाची अक्षरे, सुवाच्च अक्षरात लिहिलेले शिवसेनेचे फलक, बाळासाहेबांनी स्वत: रेखाटलेला कृष्णधवल असला तरीही आक्रमकतेचे प्रतीक ठरलेला डरकाळी फोडणारा वाघ, या सगळ्या गोष्टी बाळासाहेबांना इंग्रजीत म्हणतात तसे ‘लार्जर दॅन लाईफ’ करून गेल्या. त्यांनी मराठी माणसांचे किती प्रश्न सोडविले? हा मुद्दाच इथे अप्रस्तुत होऊन जातो.
 
  एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रतिमा निर्मितीची प्रक्रिया अचूक समजलेला नेता म्हणजे नरेंद्र मोदी. महत्त्वाचे म्हणजे प्रतिमा निर्मितीला प्रामुख्याने हातभार लावणार्‍या पारंपरिक माध्यमांचा फोलपणा त्यांनी अचूकपणे हेरला आणि अपारंपरिक नवमाध्यमांवर आपली पकड घट्ट केली. थ्रीडी सभा करणारे मोदी भारतातले पहिलेच राजकारणी ठरले. फेसबुक, ट्विटरसारख्या मुक्त माध्यमांवर आजही मोदींच्या विरोधात काहीही बोलणार्‍या लिहिणार्‍यांच्या आभासी का होईना, पण चिंध्याच केल्या जातात. पक्ष, संघटना याच्या पलीकडे जाऊन मोदींनी स्वत:भोवती एक वेगळे वलय निर्माण केले आहे ते अशाच प्रतिमा निर्मितीच्या माध्यमातून. कॉंग्रेसच्या कंटाळवाण्या एकसुरी नेतृत्वाने पलीकडच्या बाजूला एक पोकळी निर्माण केली होती आणि नरेंद्र मोदींनी ती अचूकपणे भरून काढली. प्रतिमा निर्मितीची प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारी प्रतीके ही अशी गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा भाग आहे. त्यावर हुकूमत मिळविण्यासाठी जयललिता, ठाकरे असेच अनोखे असावे लागते. प्रतिमा निर्मितीची भूक अनेक प्रक्षिप्त क्रियांना जन्मदेत असते. फेसबुक किंवा व्हॉट्‌स ऍपसारख्या माध्यमातून अनेक संदेश येतात. त्यातील काही तर इतके अफलातून असतात की, ते पुढे पाठविल्याशिवाय थांबताच येत नाही. माध्यमांची प्रक्रिया ही अशी अविरतपणे चालत राहते. एक अत्यंत साधा, परंतु परिणामकारक राजकारणी म्हणून मनोहर पर्रिकर ओळखले जातात. पर्रिकरांचा साधेपणा हा केजरीवालसारखा विकृत नाही. त्यांचा साधेपणा हा फेसबुक, व्हॉट्‌स ऍप येण्यापूर्वीचा आहे. मात्र आता या साधेपणाचे किस्से मुक्त माध्यमातून भरपूर फिरत असतात. कोणीचीही फिकीर न करता स्वत:ला पटलेल्या गोष्टी जीव ओतून करणारा माणूस म्हणून पर्रिकरांना त्यांच्या जवळचे लोक ओळखतात. माध्यमांचा वापर करून प्रतिमा निर्मिती वगैरे हे त्यांच्या गावीही नाही. मात्र आता मुक्त माध्यमांवर त्यांच्या साधेपणाचे जे संदेश लोक एकमेकांना पाठवत असतात त्यात कथा किती? आणि दंतकथा किती? हे पर्रिकरच सांगू शकतात, परंतु याची फार बौद्धिक चिकित्सा न करत बसता प्रतिमा निर्मितीची भूक म्हणूनच हे स्वीकारले पाहिजे.
 
- किरण शेलार 

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121