आबांनी सुमितला विचारले, “मागे तुला कृष्णाच्या सांब नावाच्या मुलाची गोष्ट सांगितली होती, ती आठवतंय?”
सुमित म्हणाला, “हो तर! सांबला महारोग झाला तेंव्हा त्याने सूर्याची उपासना केली. १२ वर्षांच्या तपानंतर, सांब रोगमुक्त झाला. तेंव्हा सांबने मुलतान येथे सूर्याचे आदित्य मंदिर बांधले.”
“आज आपण सांबने बांधलेले दुसरे सूर्य मंदिर पाहणार आहोत! या मंदिराचे वैशिष्ठ्य असे आहे की ते कालमापन सूर्य देवतेचे मंदिर आहे!
“तर, सांबने भुवनेश्वरला सूर्याचे दुसरे मंदिर बांधले. ‘अर्क’ या सूर्याच्या नावावरून या मंदिराचे नाव आहे - कोणार्क. ओडिशा मध्ये सांबची आठवण अजूनही रुजलेली आहे. पौष शु. १० – सांब दशमी म्हणून साजरी करतात. त्या दिवशी मुलांच्या आरोग्यासाठी आई सूर्याची पूजा करते. या शिवाय सांबने लिहिलेली सूर्यस्तुती पुष्कळांच्या नित्य वाचनात असते.
“असो! तर आपले कोणार्क मंदिर! ७ व्या शतकात बांधलेले मंदिर अगदीच मोडकळीस आले तेंव्हा १३ व्या शतकात त्याच जागेवर आत्ताचे मंदिर बांधले. राजा नरसिंहदेवाने बंगालच्या तुघन खानचा दणदणीत पराभव केला व त्या विजयाच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले.
“काय सांगू तुला! हे मंदिर म्हणजे – स्थापत्य, तंत्रज्ञान, धातू शास्त्र, ज्योतिष शास्त्र, शिल्प, कला, कारागिरी या सर्वांचा परमोच्च अविष्कार आहे! या मंदिरात लोहाच्या तुळई व त्यांना बांधण्यासाठी लोहचुंबक वापरले होते. ६० टनाचे मग्नेट या मंदिराच्या पायात आणि कळसात होते. या शक्तिशाली मग्नेटमुळे, जवळून जाणाऱ्या जहाजांमधले compass चालत नसत. या मग्नेटच्या शक्तीने गाभाऱ्यातील सूर्याची मूर्ती अधांतरी राहत असे, असे म्हणतात.
“मंदिराचे शिखर ७० मीटर उंच होते. साधारण २० मजली इमारती इतके. या मंदिराची रचना सूर्याच्या रथाप्रमाणे आहे. या रथात आरूढ आहेत ३ सूर्य – एक उगवतीचा, एक मध्यानाचा व एक मावळतीचा. हे रथमंदिर ओढतात ७ दिवसांचे ७ घोडे! आणि प्रत्येक महिन्यासाठी २ अशी रथाला २४ चाके आहेत. प्रत्येक चाकाला ८ प्रहाराचे ८ आरे आहेत. ३ मीटर व्यासाचे प्रत्येक चाक, एक एक काल मापन यंत्र आहे. त्यातील एक Sun Dial दिवसाची वेळ अचूकपणे सांगते. इतर यंत्र – Moon Dial, नक्षत्र Dials असतील असा अंदाज आहे. पण ती कशी वाचायची हे कुणालाच ठाउक नाही!”, आबा म्हणाले.
“आबा, म्हणजे एक गूढच आहे की हे!”, सुमित म्हणाला.“त्या मंदिराची किती गुपिते होती ते काळच जाणे! मंदिराचा अर्धाधिक भाग पडला आहे. त्यामध्ये काय रचना होती आणि काय यंत्र होती ती सर्व काळाच्या पोटात गडप झाले आहेत!
“आता हे मंदिर एक World Heritage Site आहे. आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखी खाली आहे.
“कोणार्क मंदिराचा एक भाग आहे नाट्य मंदिर. येथे पूर्वी नृत्य सदर केले जात असे. नाट्य मंदिराची प्रत्येक भिंत गायक, वादक व नृत्य करणाऱ्या शिल्पांनी सजलेली आहे. त्या कलाविष्काराचा उत्सव दर डिसेंबर मध्ये ‘Konark Dance Festival’ म्हणून साजरा होतो. या नाट्य-मंदिरात भारतातील अनेक गुणवान कलाकार आपली कला सदर करतात.”
“आबा, इथल्या सूर्याच्या मूर्तीचे काय झाले?”, सुमितने विचारले.
“बऱ्याच वर्षांपूर्वी, हे मंदिर मोडकळीस आले, तेंव्हा येथील सूर्याची पूजेतली मूर्ती व अरुणस्तंभ जग्गन्नाथ पुरीच्या मंदिरात हलवले. स्वातंत्र्या नंतरच्या काळात सूर्याची एक मूर्ती दिल्लीच्या museum मध्ये हलवली. दोन सूर्य मूर्ती कोणार्क मध्ये पाहायला मिळतात. या सर्व मूर्ती अतिशय सुंदर आहेत, आणि विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीच्या पायात बूट दिसतात!”
“मागे सांगितले तसे पर्शियाच्या प्रभावामुळे सूर्य भारतभर सुटा बुटात हिंडत होता!”, सुमितने आबांचे वाक्य पूर्ण केले!