सुंदर आशय सांगणारी ही शॉर्टफिल्म जरूर बघा..

    30-Dec-2016   
Total Views |



आयुष्यात एका स्मित हास्याची किंमत काय असेल? आपल्याला कधीतरी याचा हिशोब लावता येईल का? पण एक जेन्युअन आणि खरं स्मित हास्य उमलण्यासाठी बरच काही सहन करावं लागतं. आणि त्यानंतरच त्या एका स्मित हास्याची, 'स्माईल' ची किंमत कळते. अगदी असाच आशय दाखवणारी ही शॉर्टफिल्म म्हणजे 'बिहाईंड द स्माईल्स'.


मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात होऊन दोन वर्ष झाली. त्याआधी गावातील परिस्थिती फारच भीषण होती. आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास कुणाला सहन करावा लागला असेल तर ते म्हणजे या सरकारी शाळेत जाणाऱ्या मुलींना. शौचालये नसल्याने आणि इतर कुठली जागा नसल्याने गावापासून, शाळेपासून लांब कुठेतरी ओसाड रस्त्यावर नित्यकर्म करणं आलं. मग तिथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या भेदक नजरा, पुरुषांची बघण्याची विशिष्ट पद्धत आणि या सगळ्यामुळे ओशाळलेल्या, घाबरलेल्या तरी नाईलाज झालेल्या या मुली. या मुलींच्या परिस्थितीचं अगदी जीवंत चित्रण उभं करणारा हा लघुपट आहे.

या लघुपटात संवाद नाहीत, खूप कलाकार नाहीत, ओळखीचा चेहरा ही नाही तरी देखील या लघुपटाला काकटिया फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. त्याचे कारण म्हणजे, या लघुपटात असलेला संदेश. दोन मुलींवर रोज येणारी समस्या मात्र नंतर त्याचा काढण्यात आलेला उपाय, याचे उत्तम चित्रण या लघुपटात करण्यात आले आहे. लघुपटाच्या शेवटी त्या मुलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य सगळं काही एका क्षणात सांगून गेलं.

आजही ग्रामीण भागात काही ठिकाणी ही परिस्थिती आहे. मुलींच्या आयुष्यातील रोजच्या समस्यांपैकी सगळ्यात मोठ्या समस्येवर अत्यंत उत्तमपणे या लघुपटात संवाद नसूनही भाष्य करण्यात आलं आहे. या लघुपटाचं दिग्दर्शन एम. शंकर राजू यांनी केलं आहे. सरकारी शाळांमधील मुलींसमोर उद्भवलेल्या समस्यांवर संवेदनशीलपणे भाष्य केल्यामुळे या लघुपटाला पुरस्कार मिळाला.

शहरात राहणाऱ्या, आलीशान शाळेत आणि कॉलेजेस मध्ये पॉश बाथरूम्स वापरणाऱ्या मुलींना कदाचित या समस्येची भीषणता लक्षात येणार नाही. मात्र अशाच प्रेक्षकांच्या मनात संवेदनशीलता निर्माण करुन या घटनेची भीषणता त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे चोख कार्य या लघुपटाने केले आहे. ग्रामीण भागातील समस्या समजून घेण्यासाठी हा लघुपट एकदा तरी नक्कीच बघावा.

 

 

 

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121