ऐतिहासिक संस्मरणे

    30-Dec-2016   
Total Views |
 
 
मुंबईत नुकताच शिवस्मारकाचा भूमिपूजन आणि जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. गेल्या वर्षी इंदू मिलच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्याही भूमिपूजन कार्यक्रम झाला होता. या निमित्ताने स्मारकांच्या उपयुक्ततेसंबंधी आणि त्यावर किती व कसा खर्च व्हावा या संदर्भात चर्चा झाली. चर्चा होणे हे जिवंत समाजाचे लक्षण असावे. अशी चर्चा होण्याबाबत कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. या निमित्ताने समाजाच्या भविष्यकाळासाठी भूतकाळाच्या स्मरणाची कशासाठी आणि किती गरज असते, याचा विचार करणे आवश्यक आहे.
 
जो समाज मानसिक आणि भावनिकदृष्ट्या भक्कम पायावर एकत्रित आलेला असतो, त्याच समाजाला विचारस्वातंत्र्याची भीती वाटत नाही. ही दोन्ही विधाने परस्पर विसंगत वाटली, तरी त्यात सुसंगती आहे. शालेय जीवनात ब्रिटिश आणि अमेरिकन राष्ट्रभावनेची तुलना करणारा एक धडा वाचल्याचे स्मरते. दुसर्‍या महायुद्धापूर्वी लिहिला गेलेला हा निबंध असावा. त्यात म्हटले होते की, ’’इंग्लंडवर कोणीही व कितीही तिखट शब्दांत टीका केली तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागतील, कारण इंग्लंडचा राष्ट्रवाद हा परिपक्व आहे आणि अशा दोनचार जणांच्या टीकेने त्याच्या राष्ट्रवादावर कोणताही परिणाम होणार नाही याची प्रत्येक इंग्रजाला खात्री असते. याउलट अमेरिकेत तेथील राष्ट्रवादाबाबत थोडी जरी टीका केली तरी लोकांचा संताप उफाळून वर येतो. याचे कारण तेथील राष्ट्रवाद अजूनही अपरिपक्व अवस्थेत आहे.’’ भारत या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे. भारत स्वतंत्र झाला त्याला, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आज जसा भारत आहे तसा ऐतिहासिक काळात एका राजकीय प्रशासनाखाली कधीही एकत्र नव्हता. सम्राट अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्तानात आणि रशियामध्येही विस्तारले होते. परंतु, दक्षिण भारताचा काही भाग त्या साम्राज्यात नव्हता. एका राजकीय प्रशासनाखाली नसला, तरी या समाजात सांस्कृतिक ऐक्याची बीजे घट्टपणे रुजलेली असल्यामुळे जगातील इतर देशांप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे तुकडे पडले नाहीत. भारत स्वतंत्र होत असताना धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली, त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले, तरी त्या पेचप्रसंगांतून भारताने मार्ग काढला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, भारतीय समाजात घट्टपणे रुजलेले सांस्कृतिक ऐक्य होय. अशा प्रकारचे ऐक्य प्रदीर्घकाळ चाललेल्या सांस्कृतिक जडणघडणीतून निर्माण होत असते. भारताच्या दृष्टीने या जडणघडणीत ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या सांस्कृतिक ग्रंथांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अगदी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत सर्व साहित्य व कलाप्रकारांवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही महाकाव्यांचा पगडा आहे.

 
परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर या सांस्कृतिक ऐक्याच्या आधारे आधुनिक राष्ट्रवादाचे संस्कार भारतीयांच्या मनावर रुजविण्याचे शासकीय पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न झाले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्राचीन इतिहासापासून भारताला आधुनिक राष्ट्रवादाशी जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत. तसे पाहायला गेले, तर शिवाजी महाराजांच्या हयातीत त्यांनी निर्माण केलेले राज्य खूप छोटे होते. परंतु, त्यामागचा दृष्टिकोन अखिल भारतीय सत्ता स्थापन करण्याचा असल्याने आणि तो दृष्टिकोन समाजावर बिंबविण्यात ते यशस्वी झाल्याने आणि त्यानंतर आलेल्या मराठी साम्राज्याने मुगल सत्ता अस्ताला गेली. अगदी प्रतीकात्मक भाषेत बोलायचे असेल, तर दिल्ली ही इंग्रजांनी मुगलांकडून नव्हे, तर दौलतराव शिंद्यांकडून जिंकून घेतली. दिल्लीचा मुगल बादशहा केवळ नामधारी राहिला होता. आधी तो मराठ्यांच्या ताब्यात होता, नंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. परंतु, केवळ ‘साम्राज्यनिर्मिती’ हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा उद्देश नव्हता, तर मध्ययुगीन काळातील सत्तातंत्र कसे असावे, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. त्यामुळे मराठी मनाची क्षितिजे अखिल भारतीय झाली. इंग्रज सत्तेनंतर भारतात जे प्रबोधन पर्व सुरू झाले, त्यातील जवळजवळ सर्व अखिल भारतीय चळवळींचा प्रारंभ महाराष्ट्रात झाला. कॉंग्रेस स्थापनेनंतर त्यातील ‘जहाल’ आणि ‘मवाळ’ अशा दोन्ही गटांचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. जर शिवाजी महाराज झाले नसते, तर रामायण आणि महाभारताची परंपरा आजच्या काळापर्यंत पोहोचलीच नसती, एवढे भीषण संकट भारतावर कोसळले होते. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात मध्ययुगीन मूल्यांकडून आधुनिक मूल्यांकडे जो सामाजिक बदल झाला, त्यातून अनेक देशांना यादवी युद्धे, हिंसाचार, रक्तपात क्रांती आदी गोष्टींना तोंड द्यावे लागले. भारतातील हे मूल्यसंक्रमण होत असताना समाज तळापासून ढवळून काढणारी खळबळ माजली, परंतु हे मूल्यसंक्रमण काही अपवाद वगळता घटनात्मक चौकटीतूनच झाले. याचे महत्त्वाचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना होय. शेकडो वर्षांच्या परंपरेतून झालेल्या शोषणाच्या अंगारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ उभी होती. परंतु, त्या अंगारातून समाज जाळणारा ज्वालामुखी निर्माण करण्यापेक्षा त्याला रचनात्मक आणि घटनात्मक चौकटीत बसवून या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज देशातील वेगवेगळ्या भागांतून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले अनेक नेते राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत, याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या सर्वसमावेशक आणि सर्वांना न्याय देणार्‍या घटनेत आहे. भारतीय राष्ट्रवादाचे सामर्थ्य असलेल्या खोलवरच्या सांस्कृतिक, राष्ट्रीय एकात्मतेची त्यांना कल्पना होती आणि त्यामुळे या एकात्मतेवर परिणाम न होऊ देणारा बुद्ध धम्माचा मार्ग त्यांनी निवडला. जेव्हा सामाजिक ऐक्य असेल तेव्हाच भविष्याची भव्य स्वप्ने पाहता येऊ शकतात. आपल्या परंपरेचा कालसुसंगत अर्थ लावता आला नाही, तर सामाजिक ऐक्य टिकू शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन व्यक्तिमत्त्वे प्राचीन काळापासून मध्ययुगातून आधुनिक युगात आपल्या समाजाला आणणारे ‘युगपुरुष’ म्हणता येतील. या दोघांची स्मारके त्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. परंतु, जेव्हा स्मारकामधल्या प्रेरणा समाजात जिवंत असतात, तेव्हाच त्या स्मारकांना खरा अर्थ प्राप्त होतो, नाही तर केवळ त्यांचे महत्त्व दगडा-सिमेंटच्या कलाकृतीएवढेच मर्यादित राहते. या दोन्ही स्मारकांची यशस्विता केवळ त्यांच्या भव्यतेत नसून आजच्या काळाच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबविण्यात आहे. ते बिंबविण्यासाठी स्मारके साहय्य करतील, परंतु त्याला ती पर्यायी होऊ शकणार नाहीत. या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक कशा ठरतील, हे पाहणे गरजेचे आहे.
-दिलीप करंबेळकर

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय. 

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121