नाद बागेश्री- देववृक्ष

    29-Dec-2016   
Total Views |

 

माझं झाडांचे प्रेम गॅलेरीतून कधी ओसंडून वाहू लागले ते कळलेच नाही. फुलझाडे लावायच्या नादात कधीतरी एका झाडाचे रोप रुजले. त्या लहानशा लुसलुशीत पानांच्या रोपाला, लहान कुंडीतून मोठ्या कुंडीत हलवले. वर्षभरात ती मोठी कुंडी पण पुरेना. त्या होऊ घातलेल्या वृक्षाला माझी गॅलेरी कशी पुरणार? मग Green Hills या संस्थे मार्फत पुण्यातील ARAI च्या टेकडीवर हे जांभळाचे झाड लावले, तेंव्हा मला हायसे झाले! मिळालं त्याला स्वतःचे घर-अंगण, आणि हात पसरून मोठ्ठं वाढायला स्वतःचे आकाश. या रोपाचे नाव ठेवले होते ‘महाबाहू जांभूळ’!

हे ‘महाबाहू’ प्रकरण यशस्वी झाल्याने माझा उत्साह वाढला. पुढच्या प्रत्येक पावसाळ्यात जांभळाच्या बिया लावल्या. दर वर्षी ५० ते ७० रोपे तयार होत होती. पुढच्या ५-६ वर्षात Green Hills, जलतरू मित्र, Tree Public आणि सेवा सहयोग या संस्थांच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांतर्गत ही रोपे लावली. ५०० तरी झाडे त्या दरम्यान गॅलेरीत वाढली आणि लावली. रोपांच्या गर्दीत काही स्वयंभू पाहुणेही अवतरले! १०-१२ पिंपळ, काही चिंचा आणि औदुंबर. एकदा औदुंबराची तीन रोपे एकत्र वाढली होती. हे ‘ब्रह्मा-विष्णू-महेश’ रोप कोणीतरी देवळात  लावायला मागून नेले.

सेवा सहयोग Team, ऑगस्ट २०१० 

वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांनी मला खूप सोयरे जोडून दिले. तसे पहिले तर माणसाचे वृक्षप्रेम आणि वृक्षारोपण ही फार जुनी प्रथा आहे. ते या भविष्य पुराणातील श्लोकातून दिसते -

अश्वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्यग्रोधमेकं दश चिञ्चिणीकाः।
कपित्थबिल्वामलकत्रयं च पञ्चाम्रनाली नरकं न पश्येत्॥

जो मनुष्य वड, पिंपळ व नीम प्रत्येकी एक, १० चिंच, ३ बिल्व, ३ आवळा आणि ५ आम्रवृक्ष लावतो त्याला स्वर्ग मिळतो! मेल्यावर कशाला? अशी झाडे आजूबाजूला असतील तर इथे पृथ्वीवरच त्याला स्वर्ग मिळेल!

दोन वर्षांमागे ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरु झाल्यावर कॉलनीतील आम्ही काही उत्साही मंडळींनी कॉलनीचा रस्ता स्वच्छ करण्याचे मनावर घेतले. काही ज्येष्ठ नागरिक, काही गृहिणी, आणि काही शाळा, कॉलेजातील मुले अशी गटागटाने स्वच्छता केली. पण रस्त्यात कचरा टाकणे  बंद होईना आणि स्वच्छता काही केल्या टिकेना. मग स्वच्छता करून फुलांची झाडे लावायचे ठरले. ही झाडे न बोलता संदेश देतात - ‘या! फुले तोडा!’ आपोपाच त्यांच्या अवतीभवतीचा परिसर स्वच्छ राहू लागला. त्या शिवाय कडूनिंब, पिंपळ, वड, आवळा अशी मोठी झाडे पण लावली. वर्षभर पाठपुरवठा केल्याने आता कॉलनीतला रस्ता बऱ्याच अंशी स्वच्छ राहतो.

Before आणि After फोटो


स्वच्छ भारत junior गट व senior गट 

झाडे लावल्यावर त्यांना पाणी घालणे जितके गरजेचे आहे तितकंच त्याचं संरक्षण गरजेचे आहे, हे काही प्रसंगांनी शिकवले. एका ठिकाणी वृक्षारोपणासाठी ५० रोपे दिली होती. नंतरहून कळले की कसल्याशा बांधकामासाठी तिथे लावलेली सर्व झाडे तोडली. अजून एक नीमचे झाड लावलय, कोण की त्याची पाने ओरबाडून नेते कळेना. वर्ष झालं पण त्या झाडावर एक पान टिकेल तर शपथ! रस्त्यात लावलेले झाड कोलमडून पडेल की काय, अशा प्रकारे लहानशा झाडाला खेटून काही महाभाग गाड्या लावतात. त्याचे काय करावे काही कळत नाहीये.

काही झाडे मोठी झाल्यावर भेटली, तेंव्हा त्या भेटीने कोण आनंद झाला! एकदा सेवा सहयोग बरोबर वृक्षारोपण केल होते, त्या ठिकाणी ५-६ वर्षांनी पुन्हा जाण्याचा योग आला असता, मागे लावलेल्या झाडाचे आवळे खायला मिळाले! आणि एकदा ARAI वर लावलेले झाड बऱ्याच वर्षांनी पहिले तर आधी ते ओळखलेच नाही! अंगाखांद्यावर खारी, पक्षी, सरडे आणि ४-२ घरटी मिरवणारे ते झाड, सासरी रमलेल्या लेकुरवाळ्या पोरीसारखे भासले. 

आणिक शिकले ते वृक्षारोपण यशस्वी करायची एक स्वस्त आणि मस्त पद्धत. ती अशी - उन्हाळ्यात खड्डा  खणून ठेवायचा. जमीन तयार करून ठेवायची. पाऊस सुरु झाल्यानंतर त्या खड्ड्यात २ ते ३ वर्षांचे रोप लावायचे. त्या झाडाला आधाराला एखादा मोठा बांबू झाडा बरोबरच खड्ड्यात रोवायचा. त्या खड्ड्यात, तोंड वर राहील असा एक मोठा माठ गाडायाचा. झाडाभोवती खोलगट खळगा राहील अशा पद्धतीने compost व मातीचे मिश्रण भरायचे. झाड बांबूला बांधायचे. त्या बरोबरच वाळलेली काटेरी वेल त्या भोवती गुंडाळायची. या पद्धतीने झाडाला गुरांपासून संरक्षण मिळते, सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण मिळते, आणि काही काळापुरते पोषक द्रव्य मिळते. पावसाळा संपल्यावर झाडाला पाणी घालावे लागते, तेंव्हा गरजे प्रमाणे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा गाडलेल्या माठात पाणी भरायचे. वरून झाकण ठेवणे आवश्यक! २ ते ३ वर्ष थोडी काळजी घेतली की मग ते झाड स्वतःच्या पायावर उभे राहते.

पुराण काळी मनु राजाला एक पिटुकला देवमासा सापडला होता म्हणे. मनुने त्या पिटक्या जीवाचे पालन पोषण केले. तो मासा थोडा मोठा झाल्यावर त्याला विहिरीत हलवले. तिथून तळ्यात. आणि मग समुद्रात सोडले. मनुने देवमास्याला त्याच्या गतीने वाढायला सुरक्षित वातावरणात दिले. अंध प्रेमाने, त्याला हौदात डांबले नाही, किंवा ‘मला काय करायचं? मरू दे तिकडे!’ असे दुर्लक्ष पण केले नाही! आणि तेही बरेच झाले, कारण पुढे आलेल्या प्रलयात त्या देवमास्यानेच मनुला वाचवले.

त्या देवमास्यासारखे हे माझे देववृक्ष! छोट्या कुंडीतून, मोठ्या कुंडीत, तिथून माळरानात किंवा मैदानात  मनसोक्त वाढत आहेत, मोकळ्या हवेत श्वास घेतायत, आकाशाच्या छताखाली रहातायत! आणि प्रलयापासून आपले रक्षण करत आहेत!

-दिपाली पाटवदकर


दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121