“आबा, आज निघायचे?”, सुमितने पृच्छा केली.
“चला, सुमितशेट! आज भारता बाहेरची मंदिरे पाहूच! दुर्गाबाई!! तुमची भाकरी राहू दे थोड्यावेळ, आमच्याबरोबर सूर्य मंदिराच्या यात्रेला चला! विमान आले आहे हो!”, आबांनी दुर्गाबाईंना स्वयंपाकघरातून बोलावले.
दुर्गाबाई हात पुसत पुसतच बाहेर आल्या. “चला शंकर बुवा! तुमचे विमान वैकुंठाला नेणार नाही म्हणल्यावर माझ्या जीवात जीव आला!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“चला तर मग! मागे आपण मुलतान येथील आदित्य मंदिर पाहिले आहेच. आज आपण पाकिस्तानातील अजून एक सूर्य मंदिर पाहू. पंजाब प्रांतातील टिल्ला जोगिया किंवा गोरख टिल्ला.
“अगदी सुरवातीपासून सुरवात करू ... दोन हजार वर्षांपूर्वी! पुन्हा एकदा उज्जैनी पासून ही कथा सुरु होते! राजा गंधर्वसेनचा ज्येष्ठ पुत्र, भर्तृहरि उज्जैन वर राज्य करीत होता. काही कारणाने त्याला घोर वैराग्य आले. तेंव्हा त्याने सर्वस्वाचा त्याग करून, धाकट्या भावावर, विक्रमादित्यावर राज्य सोपविले.
“भर्तृहरिची मोठी बहिण मैनावती, ही बंगाल जवळील एका प्रांताची राणी होती. ही देखील एक थोर साध्वी होती. तिचा मुलगा गोपीचंद या सुमारास संसारच्या फोलपणाने उद्विग्न झाला होता.
“विश्वामित्र, गौतम बुद्ध व वर्धमान महावीरच्या उज्जवल परंपरेत, या मातीतले अनेक राजपुत्र राज्य त्याग करून राजर्षी झाले! त्याच उज्जवल परंपरेतले हे मामा-भाचे भर्तृहरि व गोपीचंद. हे दोघे पंजाबातील गोरखनाथांच्या मठात दाखल झाले. गोरखनाथांकडून दीक्षा घेऊन हे दोघेही मोठे नाथपंथी साधू झाले. सुमित, नाथ संप्रदायाचा भारताच्या जडण घडणीवर फार मोठा प्रभाव आहे. आद्य शंकराचार्यांच्या नंतर जर कुणाचा ठसा भारतावर उमटला असेल तर तो गोरखनाथांचा!
“तर, गोरखनाथांचा मठ हे सूर्य मंदिर होते! पुढे या मठात इतरही १०-१२ मंदिरे बांधली गेली. अनेक नाथपंथी साधू, हटयोगी, जोगी, सुफिं संत, शीख गुरू यांची ही तपोभूमी होती. या मठाला ‘टील्ला जोगीयां’ असेही म्हणत. आणि इथे येणारे भक्त - हिंदू, मुस्लीम व शीख या तिन्ही पंथातले होते.
“या सूर्य मंदिरात आलेले वेगवेगळ्या पंथातील काही जोगींना भेटू. १३ व्या शतकातील एक सुफी संत होते – बाबा शेख फरीद. यांचे अनेक श्लोक गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट केले आहेत. तुला त्यांच्या अंत:करण पिळवटणाऱ्या दोन ओळी सांगतो. ईश्वराच्या भेटीसाठी तळमळणारा मरणोन्मुख जीव, कावळ्याला म्हणतो –
कागा सब तन खाईयो मोरा, चून चून खाईयो मास |
दो नयना मत खाईयो, मोहे पिया मिलन की आस ||बाबा शेख फरीद | PC: mygodpictures.com
“गोरक्षनाथांच्या परंपरेतील गहनिनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर. त्यांचे शिष्य विसोबा खेचर. आणि विसोबांचे शिष्य संत नामदेव. या गुरु-शिष्यांनी धर्म संस्थापनेचे फार मोठे कार्य केले. एक कार्य होते, गीता मराठीत आणायचे. चौरंगीनाथांच्या उपासनेने पावन झालेल्या नेवासे गावी ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली.
“संत ज्ञानेश्वर, संत नामदेव व इतर मराठी संत १३ व्या शतकाच्या शेवटी उत्तर भारताच्या यात्रेला गेले होते. या यात्रेत त्यांनी गोरक्षनाथांच्या मठातील सूर्य मंदिराला नक्कीच भेट दिली असणार. तुर्की, अफघाणी आक्रमणाचा काळ तो! काळाच जणू भारतापुढचे उभा ठाकलेला! या यात्रेहून परत आल्यावर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. कदाचित त्यांच्याच आज्ञेने, साठीतले नामदेव पंजाब मध्ये गेले. गोरख मठापासून जवळ असलेल्या घुमान या गावी, नामदेव जवळ जवळ २० वर्ष राहिले. त्यांचेही पुष्कळ अभंग गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ठ आहेत.
नामदेवांची पंजाबी प्रतिमा. भगत नामदेवजी PC: mygodpictures.com
“@१५०० मध्ये गुरु नानकांनी या सूर्य मंदिरात कैक वर्ष तपस्या केली. अनेक शीख धर्मगुरू या सूर्य मंदिरात राहून गेले. १७ व्या शतकाच्या सुरवातीला अकबर व जहांगीर सुद्धा येथे दर्शनाला आले होते.
“पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या आसपास, १८ व्या शतकात, अफघाण अहमद शहा अब्दालीने टील्ला जोगीयां मंदिर लुटले. १९ व्या शतकात महाराजा रणजीत सिंगने या मठाची डागडुजी केली. फाळणी नंतर, येथील मठाधिपतींनी टील्ला जोगीयां मठ हरियाणातील अंबाला येथे हलवला. १९९२ ते १९९४ च्या दरम्यान, बाबरी ढांचा पाडल्यावर, इथल्या लोकांनी, या मठातील जवळ जवळ २० – २५ योग्यांच्या समाधी उखडून टाकल्या आणि मंदिराची भरपूर तोडफोड केली.“
PC: Wikimedia
“आबा, मागे आदित्य मंदिराबद्दल आपण बोलल्यानंतर थोडा शोध घेतला, तेंव्हा या प्रकरणाला एक लहानशी न्यायाची झालर सापडली. मागच्या वर्षी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने एक पाडलेले मंदिर पुन्हा बांधण्याचा आदेश पाकिस्तान सरकारला दिला.”, सुमित म्हणाला.
“हंम्म! या जोगिया टील्ला बद्दल सुद्धा काही पाकिस्तानी लोकांना आपले heritage आहे असे वाटते. हा एक टील्ला जोगीयाचा video पहा.
“सुमित, मला वाटले होते आज अनेक मंदिरांबद्दल सांगेन, पण ह्या एकाच मंदिरा बद्दल बोलेपर्यंत जेवायची वेळ झाली. चल सुमित, दुर्गाबाईनी केलेली भाजी भाकरी खाऊनच जा. पुढच्या भेटीत आणखीन मंदिरे पाहू!”
-दिपाली पाटवदकर